-->
गुन्हेगारीचा चिंतादायक ग्राफ

गुन्हेगारीचा चिंतादायक ग्राफ

संपादकीय पान शनिवार दि. २२ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गुन्हेगारीचा चिंतादायक ग्राफ
गुन्हेगारी म्हटली म्हणजे आपल्याला बिहार व उत्तरप्रदेश या दोन राज्यांची सर्वात पहिल्यांदा आठवण होते. अर्थात तसे होण्यामागे तेथील गुन्हेगारीही कारणीभूत होती. चित्रपटात ज्या धर्तीवर गुन्हेगारी दाखविली जाते तशी किंवा त्याहूनही हिंसक प्रमाणातील गुन्हेगारी या दोन राज्यात नेहमीच होते. त्यातुलनेत महाराष्ट्र राज्य हे तुलनेने शांत, गुन्हेगारीपासून बर्‍यापैकी मुक्त असल्याचे चित्र होते. त्यातल्या त्यात मुंबई हे महानगर देशातील अन्य कोणत्याही शहरांच्या तुलनेत अत्यंत सुरक्षित शहर असल्याचे नेहमीच बोलले जात होते. एक कोटीच्या वर लोकसंख्या असूनही मुंबईतील सुरक्षा ही नेहमीच तैनात असते, तसेच मुंबईत महिला कोणत्यावेळी मुक्तपणे फिरु शकतात. देशाची राजधानी असलेले दिल्ली हे शहर मात्र पहिल्यापासून असुरक्षित होते व आजही आहे. रात्री आठ नंतर दिल्लीत महिलांना एकट्याने फिरण्याचे धारिष्ट आजही करवत नाही. परंतु मुंबईतील वाढती गुन्हेगारी हा एक आणखी एक चिंतेचा विषय ठरला आहे. एकूणच पाहता महाराष्ट्र राज्याचा एक सुरक्षित राज्य म्हणून असलेला लौकिक आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्र हे गंभीर गुन्ह्यामध्ये आता आघाडीवर असल्याचे आढळले आहे. त्यात प्रामुख्याने विवाहबाह्य संबंधातून झालेल्या खूनांमध्ये व सहा वर्षाखालील मुलांच्या झालेल्या हत्येत महाराष्ट्र राज्य आता प्रथम क्रमांकावर तसेच बलात्कार व ऑनर किलिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. पूर्वी राज्यात अपहरणाचे गुन्हे जवळपास नव्हतेच. काही अपवादात्मक परिस्थितीत अपहरणे होत होती. आता मात्र महाराष्ट्रात अपहरण करुन हत्या करण्याचे प्रकार सर्वाधिक झाले आहेत. अपहरण करण्यामागे वैयक्तिक फायदा, मालमत्तेचा वाद, हुंडा ही कारणे मुख्य आहेत. एकीकडे राज्यात गुन्हेगारी वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत गुन्हे झपाट्याने वाढले आहेत. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी ६.५ टक्के गुन्हे मुंबईत झाले आहेत. अर्थात शहराची लोकसंख्याही आता सव्वा कोटीच्या घरात गेल्याने या महानगरीचा आवाका जबरदस्त वाढला आहे. त्यामुळे गुन्हेगारीही वाढत चालली आहे. २०१४ साली शहरातील गुन्ह्यांमध्ये दिल्ली खालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो. बलात्कारांमध्ये दिल्लीनंतर मुंबईचा दुसरा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षात मुंबईतील बलात्काराच्या गुन्ह्यात ५५ टक्के व राज्यात बलात्काराच्या गुन्ह्यात ७८ टक्के वाढ नोंदविली गेली. राज्यात रेल्वेतही चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रेल्वेतील चोर्‍यांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आले आहे तर त्याखाली उत्तरप्रदेश व तिसर्‍या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. रेल्वेतील चोर्‍या या प्रवाशांना धाकदपटशहा दाखवून चोरी करण्याप्रमाणेच गुंगीचे औषध टाकून सामान पळविणे अशा विविध प्रकारच्या होतात. रेल्वेत होणार्‍या गंभीर गुन्ह्यांमध्ये बंगाल आघाडीवर आहे तर त्या खालोखाल महाराष्ट्र राज्याचा क्रमांक आहे. रेल्वेमधील हत्या, बलात्कार, मारहाण, जीवघेणा हल्ला या सारख्या गुन्ह्यांना गंभीर गुन्हे असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारी हा एक चिंतेचा विषय झाला आहे. यात होणार्‍या गुन्हेगारींचे स्वरुप व यामगचे तंत्रज्ञान हे शोधून काढण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ गेला. देशात जशी तंत्रज्ञान विषयक क्रांती होऊ लागली तसे त्याच्याशी संबंधीत गुन्हेगारी ही झपाट्याने वाढली. सायबर दहशतवाद ही एक नवीन संकल्पना उदयाला आली आहे. या सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात होणार्‍या प्रत्येकी पाच सायबर गुन्ह्यांमधील चार गुन्हे हे महाराष्ट्रात होतात. गेल्या दोन वर्षात ही गुन्हेगारी दुपट्टीने वाढली. हा एक गंभीर विषय आहे व अनेकदा पोलिसांना या गुन्ह्यांना आळा घालणे हेच एक मोठे आव्हान ठरीत आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांची पिळवणूक, बदनामी, विनयभंग असे नेक प्रकार घडीत आहेत. याला आळा घालणे व या गुन्हेगारांना जेरबंद करणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रातील ही वाढती गुन्हेगारी ही राज्यातील एक शरमेची बाब ठरावी व त्याला कसा आळा घालावयाचा हे एक आव्हान राज्यकर्ते व पोलिसांना आहे. मुळातच गेल्या काही वर्षात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक गुन्हे राज्याला माहित नव्हते त्यात आपण देशात पहिला क्रमांक गाठण्यापर्यंत पोहोचलो आहोत. राज्यातील या गुन्हेगारीला आळा आगावयाचा असेल कर राज्यातील पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात वाढविली पाहिजे. सध्या आपल्याकडे लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दल कमीच आहे. त्याबरोबर आपण पोलिस दलाला सुसज्ज करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. तसेच पोलिसांचे जे प्रश्‍न असतील ते सोडविले गेले पाहिजेत. मग त्यांचा पगारवाढीचा प्रश्‍न असो किंवा निवार्‍याचा. पोलिसांचे प्रश्‍न सोडविले गेले तर पोलिस दल    गुन्हेगारीचा निपटारा करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज होऊ शकेल. अन्यथा गुन्हेगारीचा हा ग्राफ वाढतच जाणार आहे.
--------------------------------------------------    

0 Response to "गुन्हेगारीचा चिंतादायक ग्राफ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel