-->
स्टेशनच्या शोधात इंजिन

स्टेशनच्या शोधात इंजिन

संपादकीय पान सोमवार दि. १४ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्टेशनच्या शोधात इंजिन
दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील आपल्या दहाव्या स्थापना मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना, नवीन रिक्षा जाळा, असा आदेश दिला खरा परंतु त्यानंतर लगेचच हे आंदोलन तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आणि पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही हिंसक कृती करू नये, असे आदेश दिले. राहुल बजाज यांच्याकडील रिक्षा बाजारात आणण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा आरोप करून मुंबईमध्ये नव्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यानंतर त्यातील प्रवाशांना आणि चालकाला खाली उतरवून त्या जाळून टाकण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या या हिंसक आदेशाचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. अनेकांनी या आदेशाचा तीव्र शब्दांत निषेध करीत राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले होते. त्यांचे अशा प्रकारे आदेश देणे व त्यानंतर दोनच दिवसात हे आदेश मागे घेणे यात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रसिध्दी कशी मिळवायची व त्यातून डाव कसा साधायचा यात माहीर आहेत. सध्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका या जेमतेम एक वर्षांवर आल्या असताना त्यांनी हे आदेश काढल्याने मनसे आता सक्रिय झाली असे सर्वांना वाटले होते. परंतु अचानक पुन्हा एकदा त्यांनी माघार घेतली. मनसेच्या गेल्या दहा वर्षाचा स्थापनेपासूनचा आढावा घेतल्यास त्यांची सुरुवातीच्या काळात प्रगती व नंतर आता अधोगतीच सुरु झाली आहे, असे एकंदरीत चित्र दिसते. सुरुवातीला राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेऊन बंडाचे निशाण रोवले त्यावेळी राजसाहेब काहीतरी वेगळे करु इच्छितात असे अनेकांना वाटू लागले होते. त्यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करुन स्वतंत्र पक्ष स्थापन करणे ही काही सोपी बाब नव्हती. परंतु ते डेअरिंग राज यांनी केले. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेला आव्हान देत असल्याचे वातावरणही तयार केले होते. मनसेचे इंजिन जोरात धावणार व धनुष्यबाणाचा मुकाबला करणार असे वाटू लागले होते. त्यातून त्यांना विधानसभेत डझनभर जागाही मिळाल्या होत्या. नाशिकसारख्या महानगरपालिकेची सुत्रे त्यांच्या हातात आली. ही एक त्यांना चांगली संधी चालून आली होती. मात्र ही संधी त्यांनी गमावली आहे असेच म्हणावे लागेल. कारण नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यात मनसे अयशस्वी झाली आहे. रत्नागिरीतील खेडमध्येही त्यांना जनतेने सत्ता दिली. खेडचा झपाट्याने विकास करुन एक चांगले मॉडेल शहर म्हणून विकसीत त्यांनी करुन दाखविले असते तर त्यांच्या व अन्य पक्षातील फरक जनतेला ठसठशीतपणे दिसला असता. पण तसेही झाले नाही. विधानसभेतही राजसाहेबांचे मोहोरे फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना यावेळी शून्यही भेदता आले नाही. मध्यंतरीच्या काळात त्यांनी मराठी माणसाचे प्रश्‍न म्हणजे मराठी पाट्या लावणे, मराठी माणसांच्या उध्दारासाठी भैयांना मारहाण करणे अशा प्रकारची शिवसेना स्टाईल आंदोलने केली व आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले. परंतु अशा राजकारणाने जागा जिंकता येत नाहीत हे पुन्हा एकदा सिध्द झाले. राज ठाकरे यांच्याकडे उत्कृष्ट वकृत्वशैली आहे. लोकांना खिळवून ठेवून आपले भाषण एैकविण्याची त्यांच्याकडे किमया आहे. एखाद्या नेत्याची सहजरित्या खिल्ली उडविण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्यामुळे त्यांची भाषणे एैकण्यासाठी हजारो लोक येतात. त्यांच्या या भाषणशैलीचे कौतुक करतात, स्वत:ची करमणूक करवून घेतात, मात्र मते त्यांना देत नाहीत असेच चित्र गेल्या निवडणुकीपासून दिसते. राजसाहेब यांचे राजकीय धोरण किंवा राजकीय बैठक कधीच पक्की नसते. कधी मोदींचे ते कौतुक करतील तर कधी त्यांच्यावर टीका करतील. शिवसेना हा त्यांचा नेहमीचाच टिकेचा आवडीचा विषय. त्यामुळे मनसेची एखाद्या प्रश्‍नी नेमकी भूमिका कोणती हे कधीच सांगता येत नाही. त्यांच्या भाषणातून ते लोकांच्या मनातील बोलतात असेच जाणवते. अनेकदा त्यांची चमकदार वाक्ये लोकांना भूरळ पाडतात. परंतु अनेकदा त्यांची एखाद्या प्रश्‍नावर भूमिका ठाम नसल्याने लोकांना त्यांच्यावर विश्‍वास वाटत नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा शिवसेनेसारखीच भूमिका घेतल्यामुळे लोकांना त्यांच्यात व ह्यांच्यात फरक तो काय असे वाटते, मग त्यापेक्षा आपली जुनी बाळासाहेबांची शिवसेनाच बरी असे वाटते. शिवसेनेसारखीच तोड फोड करायचीच, हाप्तेगीरी करायची असे जर मनसेतही चालत असले तर शिवसेनेला पर्याय देणार कसा? राज ठाकरेेंचे मन हे कलाकाराचे आहे. नेतृत्व करण्याची त्यांच्याकडे धमक आहे, मग नेमके मनसेचे चुकते कुठे याचा विचार आता दहा वर्षानंतर करण्याची वेळ आली आहे. मनसेच्या इंजिनाला आता नवीन स्टेशन गाठावेच लागेल अन्यथा सध्याचा ट्रॅक सोडून जाणे फार काळ मनसेला परवडणारे नाही.
---------------------------------------------------------------

0 Response to "स्टेशनच्या शोधात इंजिन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel