-->
तांडव आणि तारतम्य (अग्रलेख)

तांडव आणि तारतम्य (अग्रलेख)

दिव्य मराठी | May 24, 2013 EDIT
केंद्रातील कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील यू.पी.ए. सरकारच्या दुसर्‍या कालखंडातील सत्तेची पूर्ण झालेली चार वर्षे किंवा सलग पूर्ण केलेला गेल्या नऊ वर्षांचा कालखंड जरी घोटाळे व भ्रष्टाचार प्रकरणांनी गाजला असला तरी विरोधकांच्या (प्रामुख्याने भाजपच्या) छातीत धडकी भरणारा ठरला आहे. गेली किमान तीन वर्षे विरोधकांनी यू.पी.ए.चे सरकार केव्हाही उन्मळून पडू शकते, अशी भविष्यवाणी वेळोवेळी व्यक्त केली होती. संघ परिवारातील ज्योतिषांनी भाजपला हे भविष्य कानात सांगितले. या भविष्याने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. या भविष्याच्या तालावर काही मीडियावाले नाचू लागले. हे भविष्य खरे करण्यासाठी भाजपची धडपड सुरू झाली. भाजप आणि संघ परिवाराने अण्णा हजारे, केजरीवाल यांची टीम हाताशी धरून सरकार किती भ्रष्ट आहे आणि आता देशात या मुद्दय़ावरून क्रांतीच करून टाकू, असे वातावरण तयार केले. काहींना तर ही नव्या स्वातंत्र्याची चळवळ वाटू लागली. शेवटी याचाही काही उपयोग झाला नाही. या ‘क्रांतीच्या वणव्यातून’ डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार सहीसलामत बचावले. अण्णांच्या टोळक्याची क्रांती किती बोगस होती, हे वास्तव लवकरच लोकांना उमगले. उलट भ्रष्टाचारामुळे बरबटलेल्या कर्नाटकातील भाजपचा सत्तेचा बुरूज गेल्याच महिन्यात ढासळला आणि संपूर्ण दक्षिणेत पक्षाचा पसारा वाढवण्याचे भाजपचे स्वप्नही धुळीला मिळाले. खरे तर यातून धडा घेऊन यापुढे तरी भाजपने दुसर्‍याच्या घरातील भ्रष्टाचारावर चर्चा करण्यापेक्षा आपल्या घरातील भ्रष्टाचार्‍यांना गंगेत नेऊन बुडवणे शहाणपणाचे ठरेल. केंद्रात पुढची सत्ता आपलीच येणार, अशी पक्की खूणगाठ बांधलेला भाजप यातून काही धडा घेत नाही, असे दिसते. त्यामुळे त्यांनी आणि काही पत्रकारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात मतभेद झाल्याचे मोठे ‘टी.आर.पी. वादळ’ निर्माण केले; परंतु यू.पी.ए.च्या बुधवारी झालेल्या नवव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सोनिया व मनमोहनसिंग या दोघांनी आपसात कोणतेही मतभेद नाहीत, नऊ वर्षांपूर्वी जे सलोख्याचे संबंध होते ते आजही कायम असल्याचे सांगताच पुन्हा एकदा भाजपचे अवसान गळाले आहे. ज्या डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला 91मध्ये आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि ते यशस्वी करून दाखवले, त्याच मनमोहनसिंग यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देश आता मंदीच्या गर्तेत गेला आहे, अशी विरोधकांची टीका आहे. ही टीका करताना हे विरोधक जागतिक आर्थिक परिस्थिती नजरेआड करत आहेत. गेली तीन वर्षे जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था, प्रामुख्याने झपाट्याने विकसित पावणार्‍या आघाडीच्या चार देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या फेर्‍यात सापडल्या आहेत. युरोपातील अनेक अर्थव्यवस्था संकटात आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या पाच वर्षांत ‘सी-सॉ’प्रमाणे वर-खाली होत आहे. याचा परिणाम आपल्यालाच नव्हे, तर जगातील प्रत्येक देशाला भोगावा लागत आहे. आपल्या शेजारचा कम्युनिस्ट चीनदेखील याला अपवाद नाही. अशा जागतिक नैराश्याच्या आर्थिक स्थितीत भारताने आपला विकासदर नऊ टक्के राखावा, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचेच ठरावे; परंतु काँग्रेस व सोनियांविरोधात आकंठ बुडालेल्यांना हे जागतिक वास्तव कळत असूनही वळत नाही. आता ही शेवटची संधी आहे. केवळ एक वर्ष हातात आहे, डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या विरोधात आपण जेवढा विषारी प्रचार करू तेवढय़ा आपल्या लोकसभेत जागा वाढतील, अशी भाजपची समजूत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी व सर्व पातळ्यांवर सरकारला, प्रामुख्याने सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांना बदनाम करण्याचा विडा भाजपने उचलला आहे. अलीकडच्या काळात मध्यमवर्गीयांच्या गळ्यातील ताईत झालेल्या सोशल मीडियात तर दररोज सरकारच्या विरोधात विखारी प्रचार चालू आहे. मात्र, एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, सोशल मीडियावाले फक्त आपल्या घरात किंवा ए. सी. कार्यालयात बसून एका वाक्याची किंवा एका शब्दात प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानतात. घराबाहेर पडून मतदान करण्यास किती जण उतरतात? विरोधकांनी अशा प्रकारे कितीही टीका केली तरी आपण आपले काम शांतपणे, संयमाने व निश्चयाने करण्याचे डॉ. मनमोहनसिंग काही सोडत नाहीत. त्यांचे बुधवारी झालेल्या कार्यक्रमातील भाषण त्याची साक्ष देते. सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेत आपण आपली अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे, विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजेत, विकासाच्या योजना गरजवंतांपर्यंत पोहोचणे तसेच बदलत्या जगाचा वेध घेत देशांशी संबंध सुधारणे, अशी सूत्रे पंतप्रधानांनी जी जाहीर केली आहेत ती वास्तवतेचे भान दाखवणारी आहेत. सरकारने सुरूकेलेल्या नरेगा योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती झाली आणि तळागाळातल्या माणसाच्या हातात चार पैसे खेळू लागले. त्यामुळे दारिद्रय़ पाच टक्क्यांनी कमी झाले, हा सरकारचा दावा योग्य ठरतो. 2008मध्ये ज्या वेळी असेच जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण आले होते, त्या वेळी उद्योगांना सवलती देऊन विकासाच्या गतीला चालना देण्याचा प्रयत्न डॉ. मनमोहनसिंग सरकारने दिला होता आणि त्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर मंदीचे मळभ काही काळ दूर झाले आणि पुन्हा मंदीचे उचल खाल्ली. आतादेखील सरकारने यावर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेतली आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. यंदाच्या वर्षीच विकासाचा थांबलेला वेग हलू लागला आहे. पुढील आर्थिक वर्षात आणखी काही सकारात्मक परिणाम दिसतील. यू.पी.ए. सरकारची मुदत बरोबर आजपासून एक वर्षाने संपणार आहे. त्यामुळे पुढच्या मे महिन्यात निवडणुका होऊन निकाल हाती आलेले असतील. त्यापूर्वी चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होतील. ही लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरेल. सरकारच्या दृष्टीने पुढील दहा महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. शिल्लक राहिलेली कामे करणे तसेच विरोधकांच्या आडमुठेपणामुळे संसदेत पडून राहिलेली विधेयके संमत करणे यात कसोटी लागणार आहे. विरोधकांनी कितीही सरकारच्या विरोधात तांडव केले तरी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तारतम्य बाळगले. मात्र, डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, यात काहीच शंका नाही.

0 Response to "तांडव आणि तारतम्य (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel