-->
संपादकीय पान बुधवार दि. २३ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
----------------------------------------
सेलिब्रेटींच्या खासदारकीचा फ्लॉप शो
-----------------------------------------
सेलिब्रेटींची खासदारकी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा असो किंवा राज्यसभा अनेक सेलिब्रिटींची खासदारकी हा मात्र फ्लॉप शो ठरला आहे. लोकसभेत निवडून आलेले सेलिब्रेटी खासदार मात्र काही तरी काम करताना दिसतात. मात्र राज्यसभेतील सेलिब्रेटींचा वावर हा एखाद्या त्यांच्या सिनेमातील एखाद्या छोट्याश्या भूमिकेप्रमाणे किंवा क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास एखाद्या नाईट वॉचमनसारखेच झाले आहे. गानकोकिळा लता मंगेशकर या १९९९ते२००५ या काळात राज्यसभेवर नियुक्त होत्या. तर नेहमीच वादग्रस्त ठरलेले जागतिक दर्ज्याचे चित्रकार एम.एफ. हुसेन हे १९८६ ते १९९२ या काळात राज्यसभेवर होते. या दोघांचीही या काळातील राज्यसभेतील उपस्थिती ही अतिशय नगण्यच होती. आता या दोन महान कलाकारांच्या पावलावर पाऊल टाकून सचिन तेंडूलकर व रेखा या दोन सध्या राज्यसभेवर नियुक्त असलेले सेलिब्रेटी फारच अल्प काळ सभागृहात उपस्थित असतात. अभिनेत्री रेखाची नियुक्ती एप्रिल २०१२ साली करण्यात आली, तेव्हांपासून रेखा राज्यसभेत केवळ सात दिवसच उपस्थित होती. तर क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडूलकर आजवर डिसेंबर २०१३ साली नियुक्त झाल्यापासून केवळ ३५ वेळाच सभागृहात हजर राहिला आहे. सचिन प्रथम दर्ज्याच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राज्यसभेत जादा लक्ष घालेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र हा अंदाजही खोटा ठरला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून तर झालेल्या अधिवेशनात तर हे दोन्ही सेलिब्रेटी अनुपस्थित राहिले आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षातील खासदारांनी याची नोंद घेतली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रेमचंद गुप्ता यांनी तर अशा प्रकारे हे राज्यसभेवर नियुक्त झालेले खासदार बुट्या मारीत असले तर त्यांच्या नियुक्तीची गरज आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. राज्यसभेवर प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनाही यापूर्वीच्या सरकारने नियुक्त केले होते. मात्र जावेद अख्तर यांची रेखा व सचिनच्या तुलनेत उपस्थिती चांगली आहे. अनेकदा जावेद अख्तर हे  फारच कमी वेळा राज्यसभेतील चर्चेत सहभागी झालेले दिसले आहेत. दोन वर्षापूर्वी कॉपीराईट विधेयकावर चर्चेत मात्र जावेद अख्तर सहभागी झाले होते. त्यांच्या विरुध्द मात्र त्यांची पत्नी शबाना आझमी हिचे होते. शबाना आझमी राज्यसभेत अनेक चर्चेत सक्रिय असायची. १९९७ ते २००३ या काळात राज्यसभेवर शबाना आझमी राज्यसभेवर नियुक्त होत्या. मात्र काही वेगळ्या क्षेत्रातून नियुक्त करण्यात आलेले खासदार मात्र राज्यसभेत बर्‍यापैकी सक्रिय असतात. उद्योगपती व समाजसेविका अनु आगा, पत्रकार एच.के. दुआ, नाट्यकलाकार बी जयश्री, नामवंत वकिल के.टी.एस. तुलसी हे मात्र राज्यसभा सुरु असताना सक्रियपणे त्यात सहभागी होतात. तर त्यांची उपस्थितीही चांगली आहे. घटनेच्या ८०व्या कलमानुसार राष्टपतींना विविध क्षेत्रातील नामवंतांची नियुक्ती राज्यसभेवर सहा वर्षासाठी करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे एकूण १२ जणांची नियुक्ती करण्याच अधिकार राष्ट्रपतींना आहे. अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर, संशोधक अशोक गंगुली, माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांची देखील राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. अय्यर व मुणगेकर यांनी नंतर कॉँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. रज्यसभेत सेलिब्रेटींची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला असताना लोकसभेतील सेलिब्रेटी खासदारही फारशी कामगिरी करत नाहीत असचे चित्र आहे. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत मथुरा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या हेमामालिनी निवडून आल्यानंतर पुन्हा मतदारसंघात न फिरकल्याने तेथील लोक जाम भडकले आहेत. मथुरा मतदारसंघात हेमामालिनी गायब असून तिला शोधून द्या असे पोस्टर लागले आहेत. हेमामालिनीकडून मथुरावासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा भंग पावल्याने हे लोक नाराज आहेत. एकूणच काय तर सेलिब्रेटींची खासदारकी फ्लॉप ठरली आहे.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel