-->
संपादकीय पान बुधवार दि. २३ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
राणेंचे तिसरे बंड
------------------------------
कॉँग्रेसचे नेते, उद्योगमंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागून व मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बंडाचा झेंडा रोवला आहे. अर्थात राणेंचे हे काही पहिले बंड नाही. त्यांनी ज्यावेळी शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळचे त्यांचे पहिले बंड होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाने जाहीर करताच बंडाचा पवित्रा घेतला होता. मात्र लगेचच तीन महिन्यात पुन्हा ते कॉँग्रेसच्या प्रवाहात सामिल झाले होते आणि आताचे हे तिसरे बंड आहे. आता बंड करताना त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर जास्त टीका न करता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. तसेच गेल्या आठवडाभरात त्यांनी जे काही वातावरण तयार केले होते ते पाहता सोमवारच्या पत्रकारपरिषदेतील त्यांचा पवित्रा मवाळ होता. त्यामुळे बहुदा वेळ पडल्यास त्यांनी बंड करुन काही तरी पदरात पडते का ते पाहत नंतर तलवार म्यान करण्याचा विचार दिसतो. आगामी निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव अटळ असून या पराभवाचे वाटेकरी न होण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत हे राणे यांचे म्हणणे कुणालाही पटणारे नाही. कॉँग्रेसचा पराभव होणार असल्याचे त्यांचे भाकित खरे असले तरीही आता केवळ दोन महिन्यांवर निवडणुका आल्यावर राणेंना हे का सुचले. अगदी अलिकडेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा दावा करणारे व आपल्याला मुख्यमंत्री केल्यास पुन्हा कॉँग्रेसला सत्तेत बसविण्याचे आव्हान स्विकारणारे राणे अशा नैराश्येच्या गप्पा का करीत आहेत. यामागचा अर्थ सरळ आहे, कॉँग्रेसने त्यांना गेल्या नऊ वर्षात मुख्यमंत्री न केल्याने राणेंची नाराजी आहे. ती नाराजी त्यांनी अनेकदा व्यक्तही केली होती. त्यातच आपल्या पुत्राचा झालेला लोकसभा निवडणुकीतील पराभव त्यांच्या जीव्हारी लागला आहे. राणे म्हटले म्हणजे तळ कोकण, अशी परिस्थिती असतानाही डॉ. निलेश राणे यांचा पराभव व्हावा यामागची कारणे राणे यांनी शोधली पाहिजेत. राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात काम केले हे उघड सत्य असले तरीही एवढे वर्षे राणेंची तळकोकणात निर्विवाद सत्ता असताना त्याला अचानक कसे भगदाड पडले, हा प्रश्न उपस्थित होतो. एक तरुण खासदार म्हणून निलेश राणे यांनी नेमकी कोणती कामे केली की केवळ वडिलांच्या कामाच्या पुण्याईवर पुन्हा खासदारकी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, याचा विचार नारायणरावांनी केला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा शिवसेनेला कोकणात झाला असला तरीही राणेंच्या विरोधात तेथील वातावरण जास्त तापले होते, हे सत्य आहे. त्यामुळे राणे असोत किंवा कोणत्याही राजकीय नेत्यांनी जनतेला गृहीत धरुन राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. राणेंनी ज्यावेळी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांची शिवसेनेत घुसमट होत होती. ही घुसमट लोकांनाही स्पष्ट दिसू लागली होती. राणे खरे तर मुख्यमंत्री बनण्याच्या इराद्याने कॉँग्रेसमध्ये आले असले तरीही हा मुद्दा लोकांच्या दृष्टीने गौण ठरला आणि त्यांचा हा हेतू उघड असूनही लोकांनी त्यांचा हा निर्‍णय मनापासून स्विकारला. आता मात्र राज्यात सरकार पुन्हा कॉँग्रेसचे येण्याची चिन्हे एकीकडे दिसत नाहीत, दुसरीकडे आपल्याला मुख्यमंत्रीही करीत नाहीत असा वेळा भाजपाचे दरवाजे ठोठावणे लोकांना रुचणार नाही. कारण यावेळी राणे केवळ सत्तेसाठी पक्षांतर करीत आहेत असे चित्र तयार होईल आणि यातून त्यांची राजकीय कारकिर्द पणाला लागेल. कॉँग्रेस हा पक्ष अन्य पक्षांपेक्षा वेगळा आहे, त्याची एक वेगळी सत्तेची संस्कृती प्रस्थापित झाली आहे. कॉँग्रेस नेतृत्वाबाबत टीका करणे हे एक मोठे पाप समजले जाते. कॉँग्रेस नेतृत्व म्हणजे प्रामुख्याने गांधी घराण्याची चाकरी ही सर्व कार्यकर्त्यांनी करणे यालाच कॉँग्रेस संस्कृती असे गोंडस नाव आहे. कॉँग्रेसमध्ये आज अनेक लोकांमध्ये पाया नसलेले, किंवा कोणतेही बुड नसलेले नेते केवळ गांधी घराण्याची चमचेगिरी करीत सत्तेत टीकून आहेत. तोंडाने फटकळ व स्पष्टवक्ते असणार्‍या नारायणरावांना कॉँग्रेसची ही संस्कृती कधी उमगलीच नाही किंवा ते स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नसावी. त्यामुळेच नारायण राणे कॉँग्रेसमध्ये गेल्या नऊ वर्षात मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. भाजपामद्ये गोपीनाथ मुंढेच्या मध्यस्थिती राणे भाजपाच्या दारी पोहोचले होते. मात्र तेवढ्यात मुंढेंचा दुदैवी अंत झाला आणि राणेंचे ते दरवाजे बंद झाले. आता ते एका उद्योगपतीच्या मदतीने भाजपाचे दरवाजे पुन्हा उघडतील का ते पहात आहेत. ते जर शक्य झाले नाही तर कॉँग्रेसवर तोपर्यंत दबाव ठेवावा व जमल्यास काही पदरात पडते का ते पहावे असा त्यांचा राजकीय डाव असावा. मात्र एक लक्षात ठेवले पाहिजे की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणे यांचे राजकीय वजन कमी झाले आहे. त्यांच्यामागचे पाठीराखेही शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. अशा वेळी त्यांना भाजपाने जरी आपल्या पदरी स्वीकारले तरीही त्यांना निश्चितच मुख्यमंत्री करणार नाहीत हे नक्की. कारण आता भाजपातच मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून आहेत. अशा वेळी राणेंना नंबर लागणे कठीण आहे. त्यापेक्षा राणेंनी कॉँग्रेसमध्ये राहणे केव्हांही शहाणपणाचे ठरणार आहे. अगदीच विरोधात बसायची वेळा आली तर विरोधी नेतेपद मिळू शकते. राणेंनी आता पुढील पाच वर्षे गप्प बसून आपली गमावलेली ताकद कशी पुन्हा मिळविता येईल त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एकदा राणेंची ताकद वाढली की त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालत येणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel