-->
प्रसारमाध्यमे आणि वास्तव

प्रसारमाध्यमे आणि वास्तव

मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्रसारमाध्यमे आणि वास्तव
कोल्हापूर येथील एका नवीन चॅनेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराषट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील प्रसारमाध्यमांची सध्या असलेली स्थिती वर्णन करणारे केलेले भाषण हे जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरणार आहे. सध्याची ही प्रसारमाध्यमांची असलेली स्थिती पत्रकारांना ठाऊकच आहे, परंतु त्यांच्याही हातात काही नाही, त्यामुळे केवळ नोकरी करीत राहणे यापलिकडे त्यांच्याही हातात काही नाही. परंतु जनतेला हे वास्तव समजले पाहिजे. कारण यातून दिशाभूल होते ती सर्वसाामान्य जनतेचीच. एक बरे झाले हे वास्तव राज ठाकरे यांनी जनतेपुढे मांडले आहे. जर एखाद्या कॉँग्रेसच्या नेत्याने हे विचार मांडले असते तर त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारण्यात आला असता. राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेली चार वर्षे कट्टर विरोधक आहेत व केवळ आकसाने ते टीका करीत आहेत असे नव्हे. त्यांनी एकेकाळी मोदींची गुजरात मॉडेलवरुन स्तुती देखील केली होती. मात्र ठाकरे हे संवेदनाक्षील आहेत, कारण ते एक कलाकार आहेत, त्यांच्यात एक व्यंगचित्रकार असल्याने समाजात जे चुकते ते दाखविण्याची त्यांची धडपड असते. राज ठाकरे हे पहिले व्यंगचित्रकार व राजकारणी नंतर आहेत, म्हणूनच त्यांनी प्रसारमाध्यमांची सध्याची बाजू निर्भीडपणे जनतेपुढे मांडली आहे. राज यांच्या भाषेत सांगावयाचे तर सध्या बातम्या या पुरविल्या जातात. अनेकदा अर्थातच सरकारच्या विरोधातली बातमी विसरली जावी यासाठी एखादी नवीनच उपस्थित झालेली बातमी प्रोजेक्ट केली जाते. गेल्या साडेचार वर्षात याची अनेक उदाहरणे दिली जातील. ज्यावेळी निरव मोदी व चोक्सी हे देशातून करोडो रुपये घेऊन पसार झाले त्यावेळी अभिनेत्री श्रीदेवी हिचे निधन जाले आणि सर्वच चॅनेलवरुन निरव मोदी व चोक्सी याच्या बातम्या बंद झाल्या व केवळ श्रीदेवीच्याच बातम्या सुरु झाल्य. हे सर्व जाणून बुजून केले जात आहे. वृत्तपत्रे व चॅनेल्सचे मालक विकले जातात हे देशात पहिल्यांदा घडले आहे. सरकार या मालकांना आपल्या खिशात घालून आपल्याला हव्या तशा बातम्या फिरवित असते, हे वास्तव पत्रकारांना माहित होते. अनेकदा त्यांची यासंदर्भात असमर्थताही होती, पण हे वास्तव राज यांनी जनतेपुढे या भाषणातून आणले आहे. गुजरात समाचार हे गुजराती दैनिक निर्भीडपणे सरकारच्या विरोधात लिहित असते. अनेक दडपणे त्यांनी झुगारली आहेत. पण त्यांना देशद्रोही म्हटले जात आहे. एन.डी.टी.व्ही. या चॅनेलचेही तसेच आहे. त्यांनी सरकारविरोधी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी प्रणब रॉय यांच्या घरावर व कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. मात्र ते मुरलेले पत्रकार असल्यामुळे सरकारच्या विरोधात जोमाने मोहीम चालू ठेवली. याचा अर्थ देशातील सर्वच चॅनेल्स सरकारला विकली गेली आहेत असे नव्हे. परंतु धीरुभाई अंबानी यांचा न्यूज चॅनेल्सपैकी 70 टक्के चॅनेल्सवर ताबा आहे. झीचे सर्वसर्वा सुभाषचंद्रा हे तर भाजपाचेच खासदार आहेत. त्यांच्याकडून सरकारचेच कौतुक व भाजपाला पाहिजे तशा बातम्या देण्याचे काम सुरु असते. आजवर प्रसारमाध्यमात एवढ्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप कधी झालेला नाही. कॉँग्रेस तर याबाबतीत बेफीकरच असे. अनेकदा आपल्या विरोधात असणार्‍या वृत्तपत्रांसाठी केंद्र सरकारच्या जाहीराती थांबविण्याचे कामही या सरकारने केले आहे. नुकत्या झालेल्या पुलवामा येथील बॉम्बस्फोटात बी.एस.एफ.चे 40 जवान शहीद झाले. मात्र ही बातमी समजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेटमध्ये डिस्कव्हरी चॅनेलसाठी शुटींग करण्यात मग्न होते. त्यासाठी त्यांनी वारंवार आपले कपडे बदलले. नंतर दुसर्‍याच दिवशी नवीन वेगवान रेल्वेला हिरवा कंदीलही दाखविला. मात्र याबाबत कुणीही टीका केली नाही. या बातम्या फारशा कुठेही प्रसारित झाल्या देखील नाहीत. एकीकडे शहीद झालेल्या जवानांसाठी देश शोकमग्न असताना भाजपाच्या प्रचार सभा जोरात सुरु होत्या. याबाबतील कुणीही चॅनेल्स बोलत नाहीत, हे दुर्दैवी आहे. देशी जेम्स बॉण्ड म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या डाओल यांची चौकशी केल्यास पुलवामा संदर्भात मोठे वास्तव जनतेपुढे येईल हे राज ठाकरे यांनी ठणकावून जे आपल्या भाषणात सांंगितले त्यात तथ्यच आहे. सध्या निवडणुकीच्या काळात एखादी मोठी घटना घडवून आणून सरकार आपल्या अपयशाकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न करेल ही राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली भीतीही स्वाभाविकच आहे. कारण नोटाबंदी, बेकारी, विदेशी पैसा भारतात आणणे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मल्ल्यापासून चोक्सी असे 20च्या वर आर्थिक गुन्हेगार पसार झाल्याने सरकारकडे या विविध प्रश्‍नांवर उत्तरे द्यायला तोंड नाही. मग या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी सीमेवर तणाव निर्माण करणे व त्यातून युद्दाचे ढग असल्याचे भासवून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे काम हे सरकार करु शकते. त्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रसारमाध्यमांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला जाऊ शकतो, ही राज यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरु शकते. आपल्याकडे आणीबाणीत वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली असा आरोप केला जातो. मात्र ही तर आणीबाणीपेक्षाही भयानक स्थिती आहे. राज ठाकरे यांनी हे वास्तव जनतेपुढे आणले आहे, त्यातून जनतेने बोध घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------   

0 Response to "प्रसारमाध्यमे आणि वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel