-->
चोख प्रत्यूत्तर!

चोख प्रत्यूत्तर!

बुधवार दि. 27 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
चोख प्रत्यूत्तर!
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांंचा खातमा करण्यासाठी मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे 300 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. पुलवामा बॉम्बस्फोटानंतर भारताने याचा निषेध करुन याला प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधींचे सर्व अधिकार लष्कराकडे सोपविले होते. अखेर हवाई दलाने मंगळवारी भल्या पहाटे पाकच्या हद्दीत घुसून सुमारे एक हजार किलो बॉम्ब टाकून अनेक अतिरेक्यांचे गड उद्वस्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने हाय अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासूनच सीमेवर लढाऊ विमानांचा आवाज येत होता अशी माहिती सीमेवरील स्थानिक भारतीय नागरिकांनीही दिली आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर भारतीय हवाई दलाने पहिल्यांच सीमेपलिकडे जात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हवाई दलाने दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुजफ्फराबादमार्गे पाकिस्तानात प्रवेश करत हवाई दलाने मजैश-ए-मोहम्मदचे अल्फा-3 हे कंट्रोल रूम उद्ध्वस्त करून टाकले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात बालाकोट आणि चकोटीमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई दलाने पूर्ण तयारीनिशी हा हल्ला केला. हल्ल्यादरम्यान लढाऊ विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कारगिल युद्धात मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानी घुसखोरांना सळो की पळो करून सोडले होते. यावेळी देखील हवाई दलाने मिराज 2000 विमानांचा वापर करत पूर्ण तयारीनिशी हा हल्ला केला.
पाकिस्तानने देखील या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत भारताने नियंत्रण रेषा पार केल्याचा आरोप केला. अशा प्रकारे पुलवामा येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने मात्र भारताचा हल्ला परतवून लावल्याचे म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने त्याविरोधात कारवाई केल्यानंतर भारतीय विमाने परत गेली असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत भारतावर हा आरोप केला आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर गफूर यांनी आणखी एक ट्विट केले. भारतीय हवाई दलाने मुझफ्फराबाद भागातून घुसखोरी केली असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराने योग्य वेळी भारताला प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी दावा केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान सतत भारतावर युद्धस्थिती निर्माण करण्याचा आरोप करत आहे. भारताने अशा प्रकारे प्रत्यूत्तेर दिले ही घटना स्वागतार्ह असली तरी याचे रुपांतर युध्दात होणार नाही याची दखल आपण घेण्याची गरज आहे. याचा अर्थ आपण पाकिस्तानला घाबरतो असा होत नाही. उलट आपण चोख उत्तर देऊ शकतो हे दाखवून दिले आहे. यातून आता पाकने धडा घेण्याची गरज आहे. पाकने आता अतिरेक्यांचे अड्डे नेस्तनाबूत करावेत तसेच अतिरेकी कारवाायंना स्थान देऊ नये. कारण अतिरेकी हे जरे भारतात हल्ले करतात तसे पाकमध्येही अतिरेकी कारवाया या तेथील सरकारला डोकेदुखी झाली आहे. भारताने केलेल्या या कारवाईबाबत देशातून जोरदार स्वागत झाले आहे. कदाचित या हल्ल्याचा आगामी निवडणुकीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्नही केला जाईल. तसे होता कामा नये. कारण ही लष्कराची कारवाई होती व त्याचे सर्व श्रेय त्यांनाच दिले पाहिजे. त्याचा राजकीय फायदा घेणे चुकीचे ठरेल. मोदी भक्त आता पाकशी युध्दच करा व तो देश संपवून टाका अशी भाषा करतीलही. परंतु आपल्याला असे करण्याची घाई नाही. युध्द करणे आपल्याला व पाक या दोघांनाही परवडणारे नाही. त्याचबरोबर एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आपली लष्करी ताकद कितीही मोठी असली तरीही आपल्यालाही युध्द परवडणारे नाही. त्याचबरोबर आपण आपल्या सीमेवरील प्रत्येक देशांशी मतभेद निर्माण केल्याने सर्वच सीमांचे रक्षण करणे आपल्याला परवडणारे नाही. नेपाळ, भूतान व चीन या देशांशी आपले संबंध सध्या समाधानकारक नाहीत. जर पाकशी युद्द केलेच तर हे देश प्रामुख्याने चीन डोके वर काढेल व आपली तेथील सीमा असुरक्षीत राहिल. एकाच वेळी सर्वच शेजारच्या शत्रूंना आगांवर घेमे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे आजच्या सारखे पाकमधील अतिरेक्यांचे तळ उध्दवस्त करण्याचे धोरण स्वागतार्ह ठरावे.
-------------------------------------------------------------- 

0 Response to "चोख प्रत्यूत्तर!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel