-->
संपादकीय पान गुरुवार दि. २४ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
--------------------------------------------
महागाईला हिरव्या मिरचीचा ठसका
-------------------------------------
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची नव्याची नवलाई आता हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. आता घोषणा करुन जनतेला भुलविण्याचे दिवस संपले असून सत्तेत आल्यावर प्रत्यक्षात कृती करुन दाखविण्याचे दिवस आता सुरु झाले आहेत. पहिल्या टप्प्यात तर महागाईचा प्रश्न सोडविण्यात केंद्रातील नवीन सरकार सफशेल अयशस्वी ठरत आहे. महागाईला आटोक्यात आणण्याचा सवार्त कळीचा प्रश्न असून लोकांच्या दृष्टीने तो जीव्हाळ्याचा प्रश्न आहे. यापूर्वीचे सरकार भ्रष्टाचार निर्मूलनात तसेच महागाई आटोक्यात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले होते. महागाईने जनता इतकी त्रस्त झाली होती की कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार ही महागाई आटोक्यात आणणार नाही अशी ठाम समजूत झाल्यानेच त्यांनी अच्छे दिनचा वादा करणार्‍या नरेंद्र मोदींना सत्तेत आणले. परंतु आता सत्तेत आल्यावर मोदी सरकारकडून आता भ्रमनिरास होण्यास सुरुवात झाली आहे. कारण महागाई आता पुन्हा एकदा डोके वर काढू लागली आहे. कांदा, टॉमेटो, बटाट्याच्या किंमती गगनाला भिडल्या असताना हिरवी मिरची आता ८० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गंमतीचा भाग म्हणजे महागाई उतरण्यासाठी सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करीत असल्याचा दावा करीत आहे. खरे तर कांदा, बटाटा, टॉमेटो व मिरची ही जेवणातील प्रत्येकाची आवश्यक बाब आहे. सरकारने याच्या किंमतीवर नियंत्रण आणणे ही अत्यंत गरजेची बाब होती. मात्र सरकारचे त्याकडे दुलर्क्ष झाले आहे. त्यामुळे सरकारची अच्छे दिनची घोषमा ही भंपक ठरली आहे. मिरचीच्या व्यापार्‍याच्या सांगण्यानुसार रमझानमुळे वाढलेली मागणी तसेच बुलढाणा व कोपरगाव येथून मिरच्याचे उत्पादन कमी आल्याने या किंमती वाढल्या आहेत. मात्र हे काही खरे नाही. मागणी वाढल्याचे निमित्त करुन व्यापारी नेहमीच किंमती वाढविण्याचा प्रयत्न करतात. यावेळी देखील तसेच झाले आहे. यंदा आता पावसाळा लांबल्याचे आणखी एक निमित्त व्यापार्‍यांना मिळाले आहे. सध्या मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवी मिरची राज्यातील कानाकोपर्‍यातून कमी येत असल्यामुळे कर्नाटकातून येण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरीही व्यापार्‍यांनी किंमती चढ्याच ठेवल्या आहेत. नाशिक बाजारपेठेत ५५ रुपये व नागपूरला किंमती ८० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. आजवर कांदा-बटाटा नेहमी महागाईत आघाडीवर असायचा आता मात्र टॉमेटोच्या जोडीने मिरची देखील कडाडली आहे. अर्थात या वाढलेल्या किंमतीचा प्रत्यक्षात शेतात राबणार्‍या शेतकर्‍याला काहीच फायदा होत नाही. हा शेतकरी मात्र आपला माल स्वस्ता विकून मोकळा झालेला आहे. त्यानंतर व्यापार्‍यांनी या किंमती चढविण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे व्यापार्‍यांनी आपल्या नेफेखोरीसाठी मिरच्यांच्या किंमती गगनाला भिडविल्या आहेत. सरकार या व्यापार्‍यांवर जोपर्यत कारवाई करीत नाही तोपर्यंत या किंमती खाली येणार नाहीत. मात्र भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अशी कारवाई करणार नाही. कारण त्यांचा मुख्य आधार हा व्यापारी आहे. या व्यापार्‍याला दुखावणे भाजपाला शक्य नाही. त्यामुळे मिरचीचा हा महागाईचा तडका कमी होणार नाही. ग्राहकांना महाग मिरची व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागणार असेच दिसते. नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या गप्पा करुन महागाई कमी करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. हे आश्वासन खोटेच होते. केवळ सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी दिलेले हे आश्वासन होते. आता सत्ता हाती आल्यावर हे सरकार व्यापार्‍यांच्या बाजूने उभे राहात आहे. लोकांची अशा प्रकारे फसवणूक यातून होत आहे. कांदे-बटाटे-टॉमेटो-मिरची या रोजच्या जेवणात लागणार्‍या वस्तू जर गगनाला भिडल्या तर लोक अच्छे दिन बघणार कसे, हा प्रश्न आहे. नव्या सरकारने सत्तेवर येताच रेल्वेची दरवाढ करुन पहिला धक्का दिला. आता रोजच्या खाण्यातील वस्तू महाग झाल्या आहेत. महागाईचा हिरव्या मिरच्यांचा हा ठसका सरकारला महाग पडणार हे नक्की.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel