-->
शुभशकुन !( अग्रलेख )

शुभशकुन !( अग्रलेख )

दिव्य मराठी | May 30, 2013 Edit
दरवर्षी लग्नसराईची धामधूम सुरू होणार, असे म्हटले तरी लगेचच सोन्याच्या किमती वाढू लागतात. अगदी मराठवाड्यासह राज्यातल्या दुष्काळी भागातही लग्नसराईची लगबग काही कमी झालेली नाही. सोन्याची मागणी लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढते. यंदा ही मागणी कायम असतानाही सोन्याच्या किमती मात्र डोके वर काढत नाहीत. महिनाभरात सोन्याच्या किमती झपाट्याने घसरल्या त्या वेळी आता सोन्यातली या दशकातली तेजी संपुष्टात आली, असे अनेकांनी भाष्य केले होते. मात्र सोन्याच्या किमती वाढण्याचे तर सोडाच, किंबहुना घसरणीला लागलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा शुभशकुन ठरावा. आपण जगातील सर्वात मोठे सोन्याचे ग्राहक असलो तरीही सोन्याच्या किमती मात्र लंडनच्या बाजारात ठरतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती जशा हेलकावे खातात तसे आपल्या अर्थव्यवस्थेला हादरे सहन करावे लागतात. कारण दरवर्षी सुमारे 800 टनांहून जास्त सोन्याची आयात करीत असल्याने सोन्याच्या किमती वाढल्यास आपल्याला जास्त विदेशी चलन खर्च करावे लागते व पर्यायाने अर्थसंकल्पीय तूट वाढते.
अर्थसंकल्पीय तूट वाढली की, त्याचा परिणाम विकासाच्या वाढीवर होतोच. ‘काळ्या सोन्या’च्या म्हणजे खनिज तेलाच्या बाबतीतही असेच सूत्र लागू होते. मात्र भविष्यात जर खनिज तेल व सोन्याच्या किमती नियंत्रणात राहिल्या तर आपल्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होईलआणि आपली  विकासाची चाके वेग घेऊ शकतील. अर्थात या जर-तरच्या गोष्टी असल्या तरीही सध्या तरी जागतिक परिस्थिती त्या दृष्टीने सकारात्मक दिसत आहे. सोन्याची जागतिक पातळीवरील खरेदी ही मुख्यत:आर्थिक स्थैर्य आणि चलनवाढीचा मुकाबला करण्यासाठी केली जाते. मात्र याबाबतची सर्वच गणिते आता बदलत आहेत. 2008 मध्ये अमेरिकेसह विकसित देशांत आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाल्यावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची पावले असुरक्षिततेच्या भावनेतून सोन्याच्या खरेदीकडे वळली. आपल्याकडेही पारंपरिक सोन्याच्या खरेदीबरोबरच एक गुंतवणुकीचे साधन म्हणून या काळात सोन्यातील गुंतवणूक चांगला लाभ मिळतो म्हणून वाढली.
यंदा युरोपातील आणखी काही अर्थव्यवस्था संकटात आल्यावर त्यांनी सोन्याची विक्री करून पैसे उभारण्यास सुरुवात केली. सायप्रसने 400 दशलक्ष युरो एवढ्या किमतीचे सोने बाजारात आणले. याचा परिणाम सोन्याच्या किमतीत घसरण होण्यावर होणे क्रमप्राप्त होते. त्याचबरोबर जगात महागाईचा पारा उतरू लागला आहे. यंदा महागाई 3.8 टक्क्यांवर घसरल्याने सोन्याची मागणीही कमी होत आहे. आपल्याकडेदेखील गेल्या तीन वर्षांत ज्या वेगाने महागाई होती त्या तुलनेत ती आता कमी होत चालल्याचे चित्र दिसते. गेल्या वर्षात महागाईचे प्रमाण 4.1 टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे महागाईला लागलेला लगाम, युरोपातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांनी सोन्याची केलेली बेलगाम विक्री हे घटक जसे सोन्याच्या किमती उतरायला कारणीभूत आहेत तसेच यंदा अमेरिकेने डॉलर कमी छापल्याने सोन्याचे महत्त्व कमी झाले आहे.
अमेरिकेची ही डॉलर छपाई कमी झाल्यानेच डॉलरची घसरण झालेली नाही. मात्र याचा सर्वात मोठा फटका सोन्याला बसला. जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या विकासदर वाढीला यंदा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था 7.7 टक्क्यांवर स्थिरावली असून त्यापेक्षा हा वेग पुढील वर्षात घसरल्यास आश्चर्य वाटता कामा नये. भारतीय अर्थव्यवस्था सहा टक्क्यांचा वेग गाठण्यात यशस्वी ठरेल, असे सध्या तरी दिसते आहे. युरोप व अमेरिकेतील मागणी जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत भारत व चीन या झपाट्याने विस्तारणा-या अर्थव्यवस्थांमध्ये ख-या अर्थाने चैतन्य येणार नाही, हे वास्तव आता या दोन्ही देशांनी स्वीकारले आहे.
अमेरिका आपल्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी खनिज तेलाऐवजी नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या 12 वर्षांत अमेरिकेत वायूचा वापर 24 टक्क्यांनी वाढला असून हा वापर जसा वाढेल तसा खनिज तेलाच्या किमतीला आळा बसणार आहे. हळूहळू खनिज तेलाला पर्यायी इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला की अमेरिकन मॉडेलची ‘कॉपी’ जगातील अन्य देश करू लागतील. याचा परिणाम असा होईल की, काळ्या सोन्याचे ग्लॅमर टिकणार नाही. आपल्याकडेही याची सुरुवात झालीच आहे. याचा परिणाम तेलाच्या किमतीवर होईल आणि या किमती घसरणीला लागतील. अर्थात ही दीर्घकालीन प्रक्रिया झाली. सध्या मात्र सोन्याच्या किमती घसरल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फायदा होईल. अर्थात किमती घसरल्याने सोन्याची खरेदी करून त्याचे दागिने करण्याचे प्रमाण वाढूही शकेल. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमती घसरल्यावर पुणे, नाशिकला सोने खरेदीची झुंबड उडाली होती आणि रांगा लावून लोकांनी सोने खरेदी केले, हे वास्तवही आपल्याला नाकारता येणार नाही. तरीही सोन्याच्या किमती उतरल्याने चालू आर्थिक वर्षात आपला सोने आयातीचा खर्च 40 अब्ज डॉलरवर घसरेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खर्चात 10 अब्ज डॉलरची कपात होईल. यामुळे आयात-निर्यात व्यापाराची तूट 0.5 टक्क्यांनी घटू शकेल. अर्थव्यवस्थेसाठी ही सकारात्मक बाजू ठरेल. सोन्याची व खनिज तेलाची आयात कमी झाल्याने आयात-निर्यातीवरील ताण कमी होईल. यामुळे देशातील विकासाला गती मिळेल. देशासाठी हा शुभशकुनच ठरावा.

0 Response to "शुभशकुन !( अग्रलेख )"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel