-->
पावसाचा रुसवा कायम

पावसाचा रुसवा कायम

संपादकीय पान शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाचा रुसवा कायम
यंदा अधिक मासानंतर श्रीवण महिना सुरु झाला असला तरी पावसाने आपला रुसवा काही सोडलेला नाही. श्रावणात मध्येच ऊन-पावसाचा होणारा खेळ आता संपल्यात जमा आहे. यंदाच्या श्रावणात चक्क उन्हाळ्यात असते तसे ऊन पडलेले बघावयास मिळते आहे. पावसाळा संपायला अजून जवळपास दीड महिना बाकी असला तरीही अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस काही पडलेला नाही. जून महिन्यात पावसाने दडीच मारली होती. त्यानंतर जुलै महिन्यात बरा पाऊस झाला. शेतकर्‍यांच्या त्या पावसावर पेरण्या झाल्या खर्‍या परंतु अजून पुढे चांगला पाऊस पडला नाही तर पुन्हा एकदा सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरेल. राज्याचा पावसाळा लक्षात घेता कोकण किनारपट्टीवर पाऊस तसा चांगला आहे. मात्र मराठवाड्यात अजूनही पावसाने पाठच फिरविलेली आहे. विदर्भाला पावसाने एकदाच काय ते झोडपून काढले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने सुट्टी घेतली ती अजूनही कायमच आहे. आता देशातील पावसाळ्याच्या शेवटच्या दीड महिन्यामध्ये ८४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. एल निनोचा वाढता प्रभाव व हवामानाच्या रचनेत झालेल्या बदलांमुळे पावसाचे प्रमाण आणखी १६ टक्क्यांनी कमी होईल, असे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मॉन्सून हंगामातील ऑगस्ट ते सप्टेंबर या दुसर्‍या टप्प्यामध्ये सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यात उणे किंवा अधिक आठ अंशांची तफावत ग्राह्य धरण्यात आली आहे. मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८८ टक्के पाऊस पडण्याची प्राथमिक अंदाज होता. यात चार टक्क्यांची कमी अधिक शक्यता गृहीत धरण्यात आली होती, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या नऊ टक्के कमी-अधिक फरकाने ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता होती. दुसर्‍या टप्प्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ८६ टक्के असल्याचे हवामान विभागाच्या सुधारित अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील मोठ्या भागांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात देशातील सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या ४८ टक्के पाऊस कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रात हे प्रमाण ३३ टक्के असून, उत्तर कर्नाटक (४५ टक्के), पूर्व उत्तर प्रदेश (३६ टक्के) येथेही पावसाने ओढ दिली आहे. देशातील बर्‍याच भागांत चालू आठवड्यातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे, असा हवामान खिात्याच अंदाज आहेे. परिणामी खरिपातील कापूस, तेलबिया, धान आणि डाळी या पिकांच्या उत्पादनाविषयी चिंता वाढत आहे. भविष्यात त्याचा फटका शेती क्षेत्राला व एकूणच अर्थव्यवस्थेला बसणार आहे हे निश्‍चित आहे. कांद्याच्या भावाने आत्ताच सत्तरी पार केली आहे. त्यामुळे पावसाचे हे चित्र कायम राहिले तर यंदा महागाई आणखी वाढेल हे नक्की. देशात एक जून ते १७ ऑगस्ट या दरम्यान सरासरीच्या दहा टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यात खंडित झालेला मॉन्सून सक्रिय होण्यासाठी सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. तसा पट्टा तयार झाल्यास चांगला मुसळधार पाऊस पडू शकतो. परंतु सध्या तरी तसे चित्र नाही. मॉन्सूनचा फटका राज्यात मराठवाड्याला सर्वात जास्त आहे. ४८ टक्के मराठवाड्यातील पावसाची तूट आहे. आता ही तूट भरुन निघण्याची शक्यता कमीच आहे. त्याखालोखाल ३३ टक्के मध्य महाराष्ट्रातील पावसाची तूट आहे. लहरी पावसाचा शेतीला फटका सर्वात जास्त बसणार आहे. यंदा धान्योत्पादन २५.२६ कोटी टन अपेक्षित होते. मात्र त्यात सुमारे १.२३ कोटी टन घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता शेवटच्या टप्प्यात कितीही पाऊस पडला तरी संपूर्ण वर्षाची सरासरी भरुन निघणे कठीणच ठरणार आहे. अनेक धरणे जेमतेम बरली तरी अनेक भागातील पाण्याचा प्रश्‍न निकालात निघू शकेल. मात्र या जर तर च्या शक्यता झाल्या. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे हा हवामान खात्याच अंदाज खराच ठरला. मात्र अपेक्षेपेक्षा पएाऊस कमीच झाला आहे. अल् निओचा प्रभाव अजूनही भारतीय उपखंडावर कमी झालेला नाही. ऑस्ट्रोलियाच्या हवामान खात्यानेही अल् निओमुळे पाऊस कमी पडेल असा अंदाज वर्तविला आहे. २००९ साली असाच अल् निओचा प्रभाव पावसावर पडला होता. त्यामुळे त्या वर्षी ३७ वर्षानंतर सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावर्षी अन्नधान्यांच्या किंमतीही २० टक्क्यांनी वाढल्या होत्या. यंदा देखील ही परिस्थिती पुन्हा उद्दभवेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. रुसलेला हा पाऊस पुढील दीड महिन्यात पडल्यास दिलासा मिळेलच, मात्र तसे न झाल्यास वाईट दिवसांचा सामना करण्याची आत्तापासून मानसिकता केली पाहिजे.
------------------------------------------------------

0 Response to "पावसाचा रुसवा कायम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel