-->
आर्थिक संकटाची नांदी

आर्थिक संकटाची नांदी

संपादकीय पान बुधवार दि. २६ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आर्थिक संकटाची नांदी
आशिया खंडात मजबूत आर्थिक ताकद असलेल्या चीनसह जगातील बहुतेक शेअर बाजार सोमवारी मोठ्या प्रमाणात गडगडल्याने जगात आर्थिक संकटाची नांदी खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. चीनचे चलन युआनचे गेल्या काही दिवसात टप्प्याने अवमूल्यन करण्यात येत आहे. त्याचा जबरदस्त हादरा केवळ चीनलाच नव्हे तर विकसीत देशांनाही बसला आहे. आपला मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स १७०० अंशांनी कोसळल्याने सर्वत्र चिंता व्यक्त झाली. गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अर्थातच हे नुकसान कागदावरीलच आहे. आपल्याकडील शेअर बाजारातील आजवरची ही तिसरी मोठी घसरण ठरली आहे. भारतात शेअर बाजाराने ज्या १० मोठ्या गटांगळ्यांपैकी ७ त्याने सोमवारी मारल्या आहेत. हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. २००८ च्या जागतिक आर्थिक पेचप्रसंगामुळे व जून २००९ मध्ये जी पडझड झाली होती, त्यानंतरची ही सर्वात मोठी आणि आतापर्यंतची तिसर्‍या क्रमांकाची पडझड ठरली आहे. आपल्याकडे अलिकडच्या काळात आलेल्या तेजीमुळे भारतीय बाजाराने १०० लाख कोटी रु.चा पल्ला गाठल्याचा जो आनंद या वर्षी साजरा केला होता, त्यावरही पाणी पडले आहे. २१ ऑगस्टला या बाजाराचे मूल्य १०२ लाख कोटी रु.वर पोहोचले होते, ते सोमवारी एकदम ९५ लाख ३४ हजार ५४० कोटी रु.वर येऊन थडकले. असो. शेअर बाजारातील ही वध-घट ही नित्याचीच बाब म्हटली पाहिजे. सध्याची पडझड ही अजून काही काळ सुरु राहिल व कालांतराने जागतिक पातळीवरील अर्थकारणाचा वेग घेत बाजार स्थिरावेल. सोमवारचा जागतिक शेअर बाजारांना बसलेल्या दणक्याचे कारण ही चीनी युआनच होते. चीनने आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी सर्व तर्‍हेने उपाययोजना आखल्या आहेत. त्यातूनच त्यांच्याकडे अनेक उत्पादनांच्या क्षमता या सर्वोच्च पातळीला पोहोचल्या आहेत. म्हणजे चीनकडे आज प्रत्येक माल हा भरपूर आहे व त्याला खरेदीदार नाही, अशी स्थिती आहे. चीनचा मुख्य खरेदीदार हा विकसीत देश आहेत. सध्या या देशांमध्ये मंदीचा फेरा सुरु असल्यामुळे चीनच्या या मालाला खरेदी कोण करणार अशी स्थिती आहे. जगात २००८ ला अमेरिकेतून मंदीने प्रवेश केला, तिने गेल्या सहा-सात वर्षांत धुमाकूळ घालून म्हणजे अगदी अलीकडे काढता पाय घेतला. अर्थात मंदी अजूनही विकसीत देशातून हद्दपार झालेली नाही. चीनने आपली निर्यात वाढवण्यासाठी युआनचे अवमूल्यन केले. म्हणजे चीनचा माल आणखी स्वस्त झाला. म्हणजेच भारतासारख्या देशांतील माल महाग झाला. निर्यात वाढावी म्हणून भारत करत असलेल्या धडपडीवर चीनने असे पाणी टाकले. एकदा का चीनसारखा जागतिक पातळीवरील मोठा निर्यातदार आपला माल खालच्या पातळीला जाऊन स्वस्तात विकत असेल तर अन्य देशांचा महाग माल घेणार कोण अशी परिस्थिती आहे. गेली तीन दशके चीन निर्यातीसाठी सबसिडी देऊन जगात माल खपवतो आहे. चीनी युआन हे काही आपल्या वा अन्य देशांतील चलनाप्रमाणे बाजारपेठांवरील घडामोडींवर वध-घट होणारे नाही. आजही युआनच्या किंमतीवर सरकारचा पूर्णपणे ताबा आहे. आता आपला माल खपविण्यासाठी चीनने युआनचे अवमूल्यन करुन जगाला एक धक्का दिला आहे.यासाठी चीनने जागतिक पातळीवरली एकदर योग्य वेळ निवडली आहे. जगात सर्वत्र मागणी कमी होत असून त्यात कच्च्या तेलाने मोठी गटांगळी घेतली आहे. कच्च्या तेलाचे प्रति बॅरल दर ४० डॉलरच्या खाली आले. म्हणजे हे दर गेल्या एक वर्षात तब्बल ६१ टक्यांनी घसरले आहेत. चीनच्या या अवमूल्यनाचा आपल्याला फार मोठा धक्का बसणार नाही. मात्र जागतिक पातळीवर जी हलचल उडाली आहे त्याच भाग म्हणून आपली निर्यात स्वस्त करावी लागणार आहे. तरच आपण या स्पर्धेत टिकाव धरु शकतो. म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरणार आहे. आज भारताकडे डॉलरचा साठा पुरेसा आहे म्हणून बरे, नाही तर ही पडझड रुपयाला फारच महाग पडली असती. तरी डॉलरच्या तुलनेत रुपया ६६. ६४ वर जाऊन पोहोचला आहे. जागतिक पातळीवर बहुतांश देश आपली तूट कमी करण्यासाठी चलन छापण्याचा सपाटा लावीत आहेत. जगात त्यामुळे चलनयुद्ध होऊ घातले आहे. हे चलनयुद्ध जगाला एका मोठ्या संघर्षाकडे घेऊन जाऊ शकते. चीनच्या घडामोडी सध्या तरी हेच सांगतात. जगात सध्या अस्थिरता आहे. अमेरिकेतील मंदी संपलेली नाही, युरोप अस्थिर आहेच. अशा परिस्थितीत चीनी युआनचे अवमूल्यन झाल्याने जगाला हादरा बसला आहे. खर्‍या अर्थाने युआन हे चलन किंमतीने लहान असले तरी मठे झाले आहे. कारण त्याच्या अवमूल्यनामुळे जगाला हादरा बसतो, ही मोठी घटना ठरावी.
-------------------------------------------------------------

0 Response to "आर्थिक संकटाची नांदी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel