-->
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे ‘मापन करणारा’ भारतीय

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे ‘मापन करणारा’ भारतीय

 For pratima 13august2011

प्रसाद केरकर, मुंबई
अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पतमापन दर्जा घसरल्यावर जगातील सर्वच शेअर बाजारांची घसरण सुरू होऊन जगात चिंता व्यक्त झाली. मात्र, अमेरिकेच्या आर्थिक ‘तब्येतीचे मापन’ करणार्‍या ‘स्टँडर्ड अँड पूर्स’ या पतमापन संस्थेच्या अध्यक्षपदी चक्क भारतीय व्यक्ती आहे आणि त्यांचे नाव आहे देवेन शर्मा! पतमापन दर्जा घसरल्यावर अमेरिकेने या संस्थेच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मात्र, शर्मा यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता आपल्या मतावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. केवळ आम्हीच नव्हे, तर अन्य कोणत्याही संस्थेने अमेरिकेबाबत हाच निर्णय घेतला असता, असे स्पष्ट मत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या पतमापनाबाबत त्यांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे पतमापन करणारे हे देवेन शर्मा आहेत तरी कोण? झारखंडमधील धनबाद येथे शालेय शिक्षण झालेल्या देवेन यांनी मेसरा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीतील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉनसिनमधून उच्च पदवी घेतली. त्यापाठोपाठ ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतून व्यवस्थापनातील डॉक्टरेट मिळवली. सध्या 55 वर्षांचे असलेल्या शर्मांनी 1977 मध्ये पदवी संपादन केल्यावर भारत सोडला; परंतु त्यांचा भारताशी संपर्क विविध निमित्ताने कायम आहे. पदवीनंतरचे त्यांचे शिक्षण व सुरुवातीपासून ते आजपर्यंत करिअर अमेरिकेतच झाले. सुरुवातीला त्यांनी ड्रेजर इंडस्ट्रीज व त्यांनतर अँडरसन स्टॅचक्लाइड, बुझ अलेन या नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांत जबाबदारीच्या पदांवर कामे केली. त्यानंतर ते 2002 मध्ये मॅक-ग्रा या नामवंत प्रकाशन कंपनीत दाखल झाले. तेथे ग्लोबल स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी चार वर्षे काम पाहिले. त्यानंतर ते स्टँडर्ड अँड पूर्स (एस.अँड पी.)मध्ये गुंतवणूक सेवा व जागतिक विक्री विभागाचे उपाध्यक्ष या पदावर रुजू झाले. त्यांनी कंपनीच्या उत्पन्नात मोठी वाढ करून दाखवली. त्यामुळे त्यांच्या कामाची चमक सर्वांच्या लक्षात आली. त्यांना लवकरच बढती मिळाली आणि ते स्टँडर्ड अँड पूर्सच्या अध्यक्षपदी ऑगस्ट 2007 मध्ये नियुक्त झाले. स्टँडर्ड अँड पूर्सची भारतातील उपकंपनी असलेल्या क्रिसिल लि.,चे ते अध्यक्षही आहेत. ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहत असल्याने त्यांच्या या नियुक्तीची फारशी कुणी त्या काळी दखलही घेतली नव्हती. शांतपणे काम करीत राहणे व कामात पारदर्शकता असण्याचा आग्रह ठेवणारे म्हणून ते स्टँडर्ड अँड पूर्समध्ये ओळखले जाऊ लागले. अमेरिकेसारख्या देशाचा पतमापन दर्जा कमी करण्याचा निर्णय घेताना त्यांनी आपल्या कामातील कठोरपणा व पारदर्शकता जगाला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या समितीवर तसेच कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सचे ते सदस्य आहेत. त्याशिवाय यू. एस. चायना बिझनेस कौन्सिल, एशिया बिझनेस कौन्सिलच्या संचालक मंडळावर आहेत. अर्थशास्त्र तसेच ग्राहक या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. अमेरिकेचा पतमापन दर्जा कमी करण्याच्या निर्णयात त्यांनी जो कणखरपणा दाखवला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे ‘मापन करणारा’ भारतीय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel