-->
गुंतवणूकदारांनो, घाबरू नका

गुंतवणूकदारांनो, घाबरू नका

Source: प्रसाद केरकर   |  (12/08/11)
जगातील सर्वच शेअर बाजार सध्या घसरणीला लागले आहेत. निमित्त आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा पतदर्जा घसरल्याचे. अर्थातच या घसरणीतून भारतीय शेअर बाजार काही सुटलेला नाही. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ‘सेन्सेक्स’ तब्बल १४  महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा १७ हजारांच्या खाली कोसळला आहे. कोणताही शेअर निर्देशांक कोसळायला लागतो त्या वेळी एकूणच गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक मूड तयार होतो आणि निर्देशांक आणखी घसरणार अशी एक हवा तयार होते. आता सेन्सेक्स १७ हजारांच्या खाली गेल्यावर तो १५ हजारांच्या खाली जाईल असे भाकीत व्यक्त होत आहे. जर समजा खरोखरीच १५ हजारांच्या खाली गेला तर सेन्सेक्स १० हजारांच्या खाली जाईल अशी बाजारात चर्चा सुरू होईल. तेजीच्या बाबतीतही असेच असते. बाजारात एकदा तेजी सुरू झाली की, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढतात आणि निर्देशांक आणखी किती वर जाणार याचे रोज नवनवीन गॉसिप सुरू होतात. बाजारातील तेजी-मंदीच्या काळातील असे एकूण वातावरण हे नित्याचेच असते. एकूणच काय, बाजारात एकदा निराशेचे वातावरण सुरू झाले की त्यात भर पडत जाते आणि गुंतवणूकदारांचे नैराश्य वाढते. सध्या आपल्या देशातील गुंतवणूकदारांची मन:स्थिती याहून काही वेगळी नाही.

अशा स्थितीत लहान गुंतवणूकदाराने नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्थितीचा आपल्या देशातील गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम होणे आपण समजू शकतो. परंतु अशा स्थितीतही त्यांनी बाजारात आलेल्या अफवेच्या आधारावर कोणताही निर्णय घेता कामा नये. सध्या बाजारात विक्रीचा मारा सुरू झाल्याने घाबरून गुंतवणूकदाराने समभागांची विक्री करणे शहाणपणाचे ठरणार नाही. एक सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपली अर्थव्यवस्था अतिशय उत्तम स्थितीत आहे. सध्याची झालेली घसरण ही अमेरिकेतील निराशाजनक बातमीतून आलेली आहे. त्यातच या निराशेच्या घटनांचा फायदा उठवतात ते मंदीवाल्यांच्या टोळ्या ऊर्फ ‘कार्टेल्स’. हे मंदीवाले दलाल समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री करून समभागांच्या किमती नीचांकी पातळीवर कशा येतील ते पाहत असतात. सर्वात गंमत म्हणजे पुढे हेच मंदीवाले दलाल समभागांनी एकदा नीचांक पाहिला की त्या कमी किमतीला खरेदी सुरू करतात आणि भविष्यात नफा कमावण्याची बेगमी करतात. लहान गुंतवणूकदाराने बाजारातील हा तेजी-मंदीचा ‘खेळ’ लक्षात घेतला पाहिजे. सध्याच्या घडामोडींमुळे देशाच्या विकास दराच्या गतीला काही ब्रेक लागणार नाही. आपल्याकडील काही अपवादात्मक कंपन्या वगळता बहुतांश कंपन्यांच्या कारभारावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराने घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. आपल्या देशाचा जो सुमारे साडेआठ टक्के विकास दर प्रस्तावित आहे तो आजच्या जगाच्या तुलनेत जास्तच आहे. यात आपल्यापुढे फक्त चीनच राहणार आहे. ही आपली सर्वात जमेची बाजू आजपर्यंत होती, ती यापुढेही कायम राहील यात काहीच शंका नाही. २००८ मधील मंदीचा इतिहास आपण डोळ्यापुढे ठेवावा. अमेरिकेतील या मंदीचा आपल्यावर फार मर्यादित परिणाम झाला. त्या वेळी अशाच नैराशेच्या वातावरणातून आपल्याकडे निर्देशांकाने सात हजारांचा तळही गाठला होता. परंतु नंतर ज्या वेळी आपल्या अर्थव्यवस्थेची पाळेमुळे घट्ट असल्याचे सिद्ध झाले त्या वेळी हा निर्देशांक गुंतवणूकदारांचे पाते लवते न लवते तोच झपाट्याने वर गेला. आतादेखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये. म्हणूनच सध्या सगळेच समभागांची विक्री  करतात म्हणून आपणही करावी असा वेडेपणा गुंतवणूकदाराने करू नये. उलट प्रत्येक घसरणीला थोडीफार समभागांची खरेदी केल्यास तिचा फायदाच होईल.

लहान गुंतवणूकदाराने शेअर बाजारात गुंतवणूक करताना ती अल्पकालीन न करता दीर्घकालीन करणे नेहमीच शहाणपणाचे ठरते. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने तर ‘डे ट्रेडिंग’चा हव्यास टाळणे योग्य. शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे सट्टेबाजी असते असे एक वेळ आपण गृहीत धरले तरीही सट्टेबाजी न करताही आपण चांगल्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतो अणि त्याद्वारे चांगले लाभही मिळतात. त्याचबरोबर खरेदी-विक्रीची योग्य वेळ बाजारात साधणे फार महत्त्वाचे असते. अनेकदा गुंतवणूकदार तेजीचा बहर असताना खरेदी करणे पसंत करतात. ही एक गुंतवणूकदारांची मोठी चूक ठरते. कारण ज्या वेळी समभागांची घसरण सुरू असते त्या वेळी जो खरेदी करतो तो गुंतवणूकदार नेहमीच जास्त लाभ मिळवतो. त्यामुळे तसे पाहता गुंतवणूकदारांसाठी सध्याची वेळ ही विक्रीची नसून समभाग खरेदीची आहे. परंतु गुंतवणूकदार नेमके उलटे करतात आणि त्यांची फसगत होते. 

आपल्याकडील शेअर बाजारावर आता विदेशी वित्तसंस्थांचा वरचष्मा आहे. या वित्तसंस्था बाजारातील तेजी-मंदीची दिशा ठरवतात. सध्या अमेरिकेतील घडामोडींमुळे विदेशी वित्तसंस्था समभाग विक्रीचा मारा करीत आहेत. त्यांनी बाजारातून सध्या काढलेला पळ फार काही दिवस टिकणारा नाही. सध्या त्यांच्यापुढे भारताशिवाय अन्य देशांचा गुंतवणुकीसाठी पर्याय नाही. अमेरिकेतील व युरोपातील देशात मंदीची स्थिती असल्याने तेथे गुंतवणूक करणे या वित्तसंस्थांना परवडणारे नाही. त्यापेक्षा त्यांना भारत, चीन या देशात गुंतवणूक करून जास्त लाभ मिळवता येतात. त्यामुळे विदेशी वित्तसंस्था भारतात परतणारच   आहेत. गेल्या वर्षी विदेशी वित्तसंस्थांची आपल्याकडे सुमारे २९ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक झाली होती. सध्या चालू वर्षात त्यांनी केवळ  तीन अब्ज डॉलर गुंतवले आहेत. त्यामुळे त्यांची चालू वर्षातही बरीच मोठी गुंतवणूक करणे अजून शिल्लक आहे. अमेरिकेतील सध्याचे नैराश्याचे वारे कमी झाले तसेच भारतीय अर्थव्यवस्था दमदार स्थितीत आहे हे सिद्ध झाल्यावर देशातील शेअर बाजारात पुन्हा धो धो तेजी वाहू लागणार आहे ही बाब लहान गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावी.

0 Response to "गुंतवणूकदारांनो, घाबरू नका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel