-->
सट्टेबाज आऊट!

सट्टेबाज आऊट!

संपादकीय पान गुरुवार दि. १६ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सट्टेबाज आऊट!
क्रिकेटची लोकप्रियता, झगमगाट, पैशाची उधळण, बॉलिवूडमधील तारेतारकांच्या रूपात मिळालेले संघमालक यातून आलेले ग्लॅमर यामुळे चौखूर उधळलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) वारूला सर्वोच्च न्यायालयाच्यानियुक्त समितीने मंगळवारी वेसण घातली. आयपीएल मधील नावाजलेला संघ म्हणून ख्याती मिळविणार्‍या चेन्नई सुपर किंग्जचा माजी टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मय्यपन आणि राजस्थान रॉयल्सचे माजी सहसंघमालक राज कुंद्रा यांच्या बेटिंगमधील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला, तसेच मय्यपन आणि कुंद्रा यांच्या क्रिकेटमधील सहभागावर आजीवन बंदीची कठोर कारवाईही केली. या निर्णयामुळे आपल्याकडील सट्टेबाज भूईसपाट झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्व आहे. मात्र यामुळे बी.सी.सी.आय.पुढे मोठा पंचप्रसंग उभा राहिला आहे. या दोन संघांऐवजी नवीन संघांना प्रवेश द्यावा की सध्याच्या या दोन संघांकडून मालकी काढून घेऊन त्याजागी नवीन मालक उभे करावेत का, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. आय.पी.एल. हे सध्या फरार असलेले तत्कालीन प्रमुख ललित मोदी यांनी सुरु केले. क्रिकेटमधील लोकप्रियता व ग्लॅमर याचा बेमालूनपणे वापर करुन लोकांना वेड लावले. परंतु यात सट्टेबाजठीने माजी मारली व हा खेळ पूर्णपणे त्यांच्या ताब्यात गेला. यातून मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी यासाठी सामने खेळले जाऊ लागले. एक प्रकारे क्रिकेटप्रेमींची यातून थट्टाच केली जात होती. त्यातून क्रिकेटच्या स्वच्छतेसाठी सुप्रीम कोर्टाने माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीकडून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर कोणती कारवाई होणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून होते. लोढा समितीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आयपीएल या सर्वोत्तम ब्रँडला मोठा हादरा बसला आहे. या दोन संघांशी संबंधित जबाबदार व्यक्ती बेटिंगमध्ये गुंतल्याचे सिद्ध झाल्याने क्रिकेट, बीसीसीआय आणि आयपीएल यांची प्रतिमा एवढी मलीन झाली की, क्रिकेट हा स्वच्छ खेळ आहे अथवा नाही, याविषयी क्रिकेट चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली, असा निष्कर्ष लोढा यांनी काढला. मय्यपन हा तरुण आहे आणि त्याने प्रथमच अशी चूक केली आहे, हा दावाही समितीने फेटाळला. त्याने १० दिवस तुरुंगात काढले आहेत आणि बेटिंग प्रकरणात ६० लाख रु. गमावले आहेत म्हणून त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवू शकत नाही, असेही लोढा म्हणाले. कुंद्रा यांच्याबद्दल समितीने निष्कर्ष काढला की, ब्रिटनचे नागरिक या नात्याने कुंद्रा यांच्यावर अधिक जबाबदारी होती. भारतात बेटिंग शिक्षेस पात्र आहे. शिवाय, बीसीसीआयच्या आचारसंहितेतही त्याला गुन्हा मानले गेले आहे, हे त्यांना ठाऊक असायला हवे होते. आपण सिनेतारका शिल्पा शेट्टीचे पती आहोत म्हणजे आपल्याला सर्व गुन्हे माफ आहेत. हेच जर कुन्द्रासाहेब परदेशात असते तर त्यांना कुणी माफ केले असते का, असा सवाल आहे. बीसीसीआयने यासंबंधीचा निर्णय स्वीकारला असून, यापुढील आयपीएलचा प्रवास कसा असेल हे ठरविण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक १९ जुलैला होणार आहे. या दोन संघांवरील बंदीमुळे रिकाम्या झालेल्या दोन जागा भरण्यासाठी दोन नव्या कंपन्यांना पाचारण करायचे की, केवळ चेन्नई आणि राजस्थानच्याच खेळाडूंना लिलावात उतरवायचे, की इंडिया सिमेंट या कंपनीपासून चेन्नई सुपर किंग्जला वेगळे करायचे अशा विविध प्रश्नांचा उहापोह या बैठकीत होईल. या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आल्यामुळे या संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक तसेच या संघाशी संबंधित पुरस्कर्ते यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मालक असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु याचा फार काही उपयोग होईल असे दिसत नाही. चेन्नई सुपर किंग्जवरील बंदीमुळे या संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीचे शेअर्स गडगडले. दोन संघ बाहेर पडल्यामुळे दोन नव्या कंपन्यांना या जागा भरण्यासाठी आमंत्रित करावे का, केवळ चेन्नई आणि राजस्थानच्या सर्व खेळाडूंचाच लिलावासाठी विचार व्हावा का किंवा चेन्नई संघाला इंडिया सीमेंट या त्यांच्या मालक कंपनीपासून वेगळे काढावे का असे प्रश्न बी.सी.सी.आय. पुढे आहेत. चेन्नई आणि राजस्थानचे संघ आपले फ्रँचाइझी विकण्याच्या तयारी असतीलही पण तेथे काही समस्या आहेत. जर त्यांनी या फ्रँचाइझी विकल्या तर त्याचा थेट भार नव्या कंपन्यांवर येईल. शिवाय, त्यांच्याबद्दलची प्रतिमाही पूर्वीसारखी राहिलेली नाही, त्यामुळे नवी कंपनी या फ्रँचाइझी विकत घेण्यासाठी किती इच्छुक असतील हा प्रश्न आहे. जर दोन नव्या कंपन्या घेण्यात आल्या तर त्यांच्यासाठी नव्याने टेंडर काढावे लागतील आणि या दोन संघांतील जवळपास ४५ खेळाडू मुक्त होणार असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र लिलाव करावा लागेल. या दोन नव्या कंपन्या या खेळाडूंना मग आपल्या ताफ्यात घेतील. पण केवळ याच खेळाडूंना घेण्याविषयी कंपन्यांना आक्षेप असल्यास पूर्णपणे नव्याने सर्व खेळाडूंचा लिलाव करावा लागेल. अर्थात हे सर्व बी.सी.सी.आय.चे प्रश्‍न आहेत. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे सट्टेबाजांना चांगलीच चपराक बसली आहे. याची आवश्यकता होतीच. कारण क्रिकेट हा खेळ आहे व तो खिलाडू वृत्तीने खेळला गेला पाहिजे. यात जर सट्टेबाज आपल्या सट्यासाठी क्रिकेटला व क्रिडापटूंना नाचवित असतील तर ते चुकीचे ठरेल. हाच संदेश या निर्णयाने दिला आहे.
------------------------------------------------

0 Response to "सट्टेबाज आऊट!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel