-->
फक्त २५ वर्षे थांबा!

फक्त २५ वर्षे थांबा!

संपादकीय पान शनिवार दि. १८ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
फक्त २५ वर्षे थांबा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन देशात सर्वसामान्यांना आणण्याची भाषा करुन लोकांची मते मिळविली, खरी परंतु त्यावेळी त्यांनी काही अच्छे दिनसाठी किती काळ लागेल याचे आश्‍वासन दिले नव्हते. गेल्या वर्षात मोदी सरकारने फारशी नाविण्यपूर्ण कोणतीही कामे केलेली नाहीत. अशा वेळी लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटणे व आपली फसवणूक झाल्याची समजूत होणेे क्रमप्राप्त होते. आता भाजपाचे अध्यक्ष अमित शहा अच्छे दिन येण्यासाठी किमान २५ वर्षे लागतील असे सांगत आहेत. यातून त्यांनी पुन्हा एकदा लोकांची फसवणूक केली आहे. खरे तर एकेकाळी शेअर दलाल असणारे अमित शहा आता भाजपाचे अध्यक्ष झाले आहेत. अर्थात त्यांनी शेअर दलाल असण्यामागे आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र त्यांनी लोकांच्या मतांचा आदर करावा. त्याचा शेअर बाजाराप्रमाणे सट्टा करु नये एवढीच आमची इच्छा आहे. अमित शहा बोलतात म्हणजेच अप्रत्यक्षरित्या नरेंद्र मोदीच बोलतात हे आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचेही याहून काही वेगळे मत निश्‍चितच नसणार हे नक्की. थोडक्यात २५ वर्षे थांबा म्हणजे आम्हाला पुढील २५ वर्षे म्हणजे पाच वेळा निवडून द्या असेच, त्यांचे सांगणे आहे. अच्छे दिन काही एका रात्रीत येऊ शकत नाहीत हे खरे असले तरीही त्यासाठी २५ वर्षाचा कालावधी हा सुध्दा फारच झाला. म्हणजेच एकप्रकारे लोकांचा विश्‍वासघातच मोदी व शहा ही जोडी करीत आहे. अमित शहा असोत किंवा पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचे हात एकेकाळी गुजरातच्या दंगलीत माखले होते. अशी ही माणसे आता सत्तास्थानी बसले आहेत. देशात सध्या फक्त मोदी एके मोदींचाच जप सुरु आहे. मग तो योग दिन असो किंवा कोणत्याही सरकारी कामाची जाहीरात असो, फक्त मोदीच सगळीकडे चमकत असतात. याबाबत संपूर्ण भाजपात व  मंत्रिमंडळात नाराजी आहे. परंतु अजूनही मोदी नावाचे चलन भाजपातच जोरात चालत असल्याने कुणाची त्यांच्या विरोधात बोलण्याची टाप नाही. निवडणूक काळात प्रत्येक घटनेवर भाष्य करणारे मोदी सध्या ललित मोदी प्रकरणी मात्र काहीच बोलत नाही. पूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या शांत स्वभावाला मौनी बाबा म्हणणारे हेच मोदी आता गप्प का असे त्यांनी विचारण्याची वेळ आता आली आहे. एकीकडे मोदींनी शहांच्या रुपाने आपल्या ताब्यात पक्ष ठेवला आहे तर दुसरीकडे मंत्रिमंडळाला कुठेच बोलायला वाव न देता संपूर्ण देश आपणच हाकीत आहोत असे ते दाखवित आहेत. आता त्यांच्या सरकारला एक वर्षाहून जास्त काळ लोटल्याने सरकारला आता प्रत्येक आश्‍वासनाबाबत जाब विचारण्याची आता वेळ आली आहे. मोदी यांनी निवडणुकीच्या काळात मोठी मोठी आश्‍वासने या जनतेला देऊन त्यांना भुलविले आणि त्यांची मते लाटली. ज्यांचा या देशाच्या घटनेचा गाभा असलेल्या सर्वधर्मसमभावावर विश्‍वास नाही अशा लोकांच्या हाती आता सत्ता आली आहे. लोकांनी त्यांच्या विकासाच्या भाषेवर विश्‍वास टाकून मतदान केले. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी पहिला कुठला कार्यक्रम राबविला तर घर वापसीचा. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सनातन हिंदु धर्मियांच्या संघटनांना बळ आले व यातून दोन धर्मियात तेढ निर्माण होण्याचे काम झाले. यातून भाजपाच्या मुखवटा धारण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या अजेंडावरील कार्यक्रम राबविण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला. अशा प्रकारे धर्मांतर करुन हिंदुधर्मियांची संख्या वाढविण्याचे महान काम सुरु करण्यात आले. त्याच बरोबर दुसरीकडे मुस्लिमांच्या संख्यात वाढ होत आहे व याला उत्तर म्हणून आपणही हिंदुधर्मीयांनी प्रत्येकी पाच मुले जन्माला घातली पाहिजेत, असे अशी दर्पोक्ती भाजपाच्या खासदारांनी केली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी देखील सत्तेत असताना आपला विचार बाजूला ठेवून देश चालविण्यासाठी घटनेला प्राधान्य दिले होते.  भाजपामधली या नेत्यांचे राजकीय जीवन स्वच्छ होते. त्यांची सध्याच्या नेत्यांशी तुलना होऊच शकत नाही. सच्चे भाजपावाले जे आहेत, यांनाही आपला पक्ष कोणाच्या हातात सापडला, याबद्दल आता पश्चाताप होत आहे. ज्यांनी महाराष्ट्रात टाचा घासून भाजपा वाढवला, ते महाराष्ट्राचे मुंडे असतील, फरांदे असतील, शिवणकर असतील, त्यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवला. वसंतराव भागवत आणि गं. भा. कानेटकर यांना जे जमले नाही ते या त्रिकुटाने केले. अखिल भारतीय पातळीवर अडवाणी, वाजपेयींना त्याचे मोठे श्रेय आहे आणि आज सत्ता मिळाल्यावर अडवाणी बाहेर फेकले गेले आहेत. अच्छे दिन येण्यासाठी जन हिताच्या गोष्टी कराव्या लागतील, त्यासाठी दोन धर्मियात तेढ निर्माण होईल असे करता कामा नये, याची जाण अजूनही सरकारला आलेली नाही. मोदींनी विकासाच्या गप्पा केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांची कृती विकासाला मारक आहे. या सर्व बाबीतून अच्छे दिन २५ काय अजून ५० वर्षेही भाजपाची सत्ता राहीली तरी अच्छे दिन येणार नाहीत.
--------------------------------------------------------------

0 Response to "फक्त २५ वर्षे थांबा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel