-->
आर्थिक समानता कधी? / लोकवाड्मय इतिहासजमा

आर्थिक समानता कधी? / लोकवाड्मय इतिहासजमा

सोमवार दि. 11 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आर्थिक समानता कधी?
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांचा गुणगौरव झाला, त्यांचे मोटे कौतुकही झाले. ते योग्यच होते. परंतु पुरुष व महिलांमधील आर्थिक समानतेविषयी मात्र सर्वांनीच जाणीवपूर्व मौन बाळगले. भारतात महिला आणि पुरुष यांच्यात मिळणा़र्‍या वेतनामध्ये आजही असमानता दिसून येते. देशातील नोकरी करणा़र्‍या महिलांचे वेतन पुरुषांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी कमी मिळत असल्याचे मॉनिटरी सॅलरी इंडेक्स यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आज सर्वच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा सावून तेवढ्याच क्षमतेने काम करताना दिसतात. परंतु त्यांना पगार मात्र पुरुषांच्या बरोबरीने मिळत नाही. देशात आजही लिंगभेद असून त्यात पुरुषाच्या बरोबरीत महिलांना मिळणारे वेतन प्रती तासाचा विचार करता 46 रुपये 19 पैसे कमी मिळत असल्याचे यात नोंदवण्यात आले. 2018 मध्ये देशातील पुरुषाचा पगार प्रती तास 242.49 रुपये होता. तर महिलांचा पगार प्रतितास 196.3 रुपये होता यात निरीक्षणाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात वेतनाचा भेदवाव आहे. तर आय.टी, आय.टी.इ.एस. सेवांमध्ये पुरुषांच्या बरोबरीत महिलाचे वेतन 26 टक्क्यांनी कमीच दिले जाते. तर पायाभूत सुविधां क्षेत्रात महिला कर्मचा़र्‍यांना 24 टक्के वेतन कमी मिळते. आरोग्य, सामाजिक या सारख्या क्षेत्रात महिलांना 21 टक्के कमी वेतन दिले जाते. विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत आणि महिलाही स्वतःला कमी न लेखता स्वतःवर विश्‍वास ठेवून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्वच बाबतीत आज महिलांना समान दर्जा तर मिळाला आहे. मात्र कामाचा मोबदला आजही पूरूषांपेक्षा कमीच दिला जातो. याला बॉलिवूडही अपवाद नाही. गेल्या अनेक वर्षापासून अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमीचे मानधन दिले जाते. 2017 साली सिक्रेट सुपरस्टारच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्री जायरा वसीमला समान मानधन दिले जाणार का असा प्रश्‍न आमिर खानला विचारण्यात आला होता. यावेळी आमिरने म्हटले होते की, आजही  रसिकांना  सिनेमाचा हिरोच महत्त्वाचा वाटतो. मोठा अभिनेता सिनेमात असणे म्हणजे सिनेमा चांगलाच असणार अशी समजुत आजही असते. रसिक सिनेमात हिरोची लोकप्रियता बघून सिनेमाकडे वळतात. सिनेमाच्या बाबतीत रसिकांमध्ये हीच मानसिकता आजही बघायला मिळते. जेव्हा रसिक हिरोपेक्षा हिरोइनची लोकप्रियता बघून सिनेमागृहाकडे वळतील तेव्हा खरे अभिनेत्रींना जास्त मानधन दिले जाईल. सध्या आपल्याकडे कष्टकरी महिलांपासून ते करोडो रुपये कमविणार्‍या कलाकार अभिनेत्रींपर्यंत सर्वांनाच आर्थिक असामनतेशी सामना करावा लागत आहे. ही असमानता संपुष्टात येईल त्याचवेळी खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा केल्यासारखे होईल.
लोकवाड्मय इतिहासजमा
मराठी प्रकाशन व्यवसायात मानाचे स्थान असलेला गिरगाव येथील मौज छापखाना गेल्या वर्षी बंद केल्यानंतर आता प्रभादेवी येथील लोकवाड्मय गृहाचा छापखाना बंद होत आहे. वाढता खर्च झेपत नसल्यामुळे लोकवाड्मय गृहाने छापखाना एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील प्रबोधन चळवळीला हातभार लावणार्‍या अनेक पुस्तकांचे जन्मस्थळ काळाच्या पडद्याआड जाणार आहे. डिजिटल युग सुरु झाल्यापासून गेल्या दोन वर्षात छापखान्यांना उतरती कळा लागली आहे. पूर्वी लोकवाड्मयच्या छापखान्यात कामगार संघटनांची पत्रे, वेगवेगळी मासिके छापली जात होती. परंतु डिजिटल क्रांतीमुळे पत्रकांची छपाई घटली. मासिकेही अन्यत्र छापून मिळत असल्याने लोकवाङ्मय गृहाच्या छापखान्यात छपाईसाठी ती येणे बंद झाली. त्यामुळे आर्थिक अडचणींत आणखी भर पडली. त्यामुळे हा छापखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकवाड्मय हे पुरोगामी साहित्य छापण्याचे एक प्रमुख केंद्र होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकवाङ्मय गृहाने वाचकांना दर्जेदार पुस्तके दिली. वि. का. राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक छापण्याच्या वेळी समाजातून विरोध झाला होता. त्यामुळे हे पुस्तक मुंबईतील छापखान्याऐवजी पुण्यात छापले होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाने समाजात नवा विचार आणला. या पुस्तकाच्या विक्रम आवृत्यांची छपाई येथून करण्यात आली होती. आज लोकांना डिजिटल किंडलवर पुस्तके वाचणे आवडते. पुस्तकाची छापील प्रत 50 रुपयांना, तर किंडल प्रत 20 रुपयांना मिळते. त्यामुळे तरुण वाचक किंडलवर वाचणे पसंत करतो. मुद्रण व्यवसायाचा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे कागद. या व्यवसायातील 50 टक्के गुंतवणूक कागदावर होते. कागदाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकाशक छपाईत गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. पूर्वी प्रकाशक वर्षाला 50 ते 60 पुस्तके बाजारात आणत असत. आज हेच प्रमाण 10 ते 12 पुस्तकांवर आले आहे. मासिके बंद झाली. वाचन संस्कृती कमी होत आहे. या सर्वांचा परिणाम मुद्रण व्यवसायावर होऊन छापखाने बंद होत आहेत. छापखाना बंद झाला तरी लोकवाङ्मय गृहाचा प्रकाशन व्यवसाय सुरू राहणार आहे. नवीन पुस्तकांची छपाई औरंगाबाद, पुणे येथूने केली जाईल. काळ झपाट्याने बदलत चालला आहे. त्याचा फटका छपाई उद्योगावर होत आहे. भविष्याची चाहून ओळखून जो प्रकाशक आपल्यात बदल केल तोच आता आपले अस्तित्व टिकवू शकणार आहे.
----------------------------------------------------

0 Response to "आर्थिक समानता कधी? / लोकवाड्मय इतिहासजमा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel