-->
भांडवलदारांपुढे लोटांगण

भांडवलदारांपुढे लोटांगण

संपादकीय पान सोमवार दि. १४ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भांडवलदारांपुढे लोटांगण
गेल्या सव्वा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वीस देशांमध्ये दौरे झाले. हे दौरे जसे संबंधीत देशांनी संबंध वाढविण्यासाठी होते तसेच ते भारतात गुंतवणूक यावी यासाठी आखण्यात आले होते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सी.ई.ओ.ना भेटून मोदी आपल्या भारताचे महत्व सांगतात. तेथील उद्योगपती मोदींचे भाषण एैकतात व टाळ्या पिटतात. मात्र आजवर गेल्या वर्षात एका नव्या पैशांचीही विदेशी गुंतवणूक मोदींच्या विदेश दौर्‍यातून झालेली नाही. त्यामुळे अब्जावधी रुपयांची विदेशी गुंतवणूक आणू व देशातील तरुणांना रोजगार देऊ ही मोदींची घोषणा केवळ आता हवेतच राहिली आहे. मोदी ज्या देशात जातात तेथील अनिवासी भारतीयंाना आपले भाषण देतात. हे सर्व लोक टाळ्या पिटतात. मात्र अनिवासी भारतीय उद्योगपती गुंतवणूक करण्यास काही पुढे सरसावलेला नाही. जे मध्यमवर्गीय अनिवासी भारतीय तेथे नोकरी करुन पैसा कमवितात ते नेहमीप्रमाणे येथे मुदत ठेवींमध्ये पैसा गुंतवितात. तसा पैसा ते यापूर्वीही गुंतवित होतेच. आताही गुंतवितात. मोदींच्या भा,णामुळे नाही तर त्यांना विदेशापेक्षा जास्त व्याज मिळते म्हणून ते मायदेशी गुंतवितात. त्यामुळे मोदींना जे वाटत होते की, आपण सत्तेत आल्यावर पैशाचा ओघ उद्योगात आणू व अनेक प्रकल्प उभे राहातील हे केवळ त्यांचे स्वप्नच राहिले आहे. त्यामुळे आता त्यांनी विदेशी भांडवल येत नसल्यामुळे देशातील भांडवलदारांपुढे लोटांगण घातले आहे. नुकतीच देशातील प्रमुख उद्योगपतींची बैठक मोदींनी दिल्लीत बोलाविली होती. अर्थातच त्यात अदानी व अंबानी ही जोडी होतीच. या बैठकीत जोखीम पत्करून उद्योगपतींनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींना केले. या भाषणाचा सूर पाहता मोदींना उद्योजकांच्या पुढे जाऊन विनवणी करण्याची वेळ आली, याचे कारण या देशातील उद्योजक गुंतवणूक करायला तयार नाहीत. नरेंद्रभाईंना महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी दुष्काळग्रस्त भागांना भेट देण्याची बुद्धी त्यांना झाली नाही. मन की बात आणि दिल की बात करताना शेतकर्‍याच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्या हलाखीची विचारपूस करावी, असे मोदी यांना वाटले नाही. परदेशात दौरे करून अनेक देशांना अब्जावधी रुपयांची मदत मोदींनी जाहीर केली. पण इथला शेतकरी मात्र आत्महत्या करीत आहे. याचा विचार नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षात काही केला नाही. आता ते भांडवलदारांच्या पायाशी आले आहेत. उद्योगपती मग तो कुठलाही असो देशातला किंवा विदेशातला, त्याला नफ्याचे आश्‍वासन मिळाल्याशिवाय गुंतवणूक करीत नाही. अर्थात गुजराती असलेल्या मोदींना हे सांगायची काही गरज नाही. कारण गुंजराती हा समाज पक्का व्यापारी व उद्योगात मुरलेला आहे. मोदी आपल्यासाठी काही तरी मोठे क्रांतीकारी बदल करतील समीनी खुल्या करतील, स्वस्त वीज, पाणी देतील, करात मोठ्या सुट देतील अशी या भांडवलदारांची इच्छा होती. तसे असणे देखील स्वाभाविक होते, कारण त्यांनी मोदींच्या निवडणूक फंडाला करोडो रुपये ओतले होते. त्यामुळे त्यांना आता मोदी लाभ कशा प्रकारे देत आहेत त्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. परंतु या भांडवलदारांची मोदींनी पूर्णपणे निराशा केली आहे. गेल्या वर्षात मोदींनी फक्त जे काही दिले ते फक्त अदानी व अंबांनींच्याच खिशात टाकले आहे. लहान-मध्यम आकारातील गुंतवणऊकदाराला कसलेच लाभ मिळाले नाहीत. व्यापारी वर्ग नाराज आहे. उद्योजकांची मुख्य मागणी आहे व्याजदर कमी करण्याची तसेच सरकारची उद्योगाबाबची धोरणे लवचिक ठेवण्याची. मात्र रिझर्व्ह बँकेचे गव्हर्रनर रघुराम राजन यांना कोणत्याही परिस्थितीत व्याजदर कमी करायचा नाही. उद्योगपतींना व्याजदर परवडणार नसतील आणि ते गुंतवणूक करणार नसतील तर गुंतवणूक करायला ते पुढे कसे येणार? मंदीची मुख्य कारणे महागाईत आहेत. ज्या देशाची क्रयशक्ती घटते, त्या देशामध्ये मंदी अपरिहार्य ठरते आणि जेव्हा मंदी निर्माण होते, तेव्हा गुंतवणुकीचे मार्ग खुंटतात. व्यापार उदिमात भरभराट असेल तर उद्योजक गुंतवणूक करायला पुढे येतात. केलेल्या गुंतवणुकीचा एकूण हिशोब करून त्यातून किती नफा होईल, याचा हिशोब केल्याशिवाय गुंतवणूक करणारे धोका पत्करत नाहीत. मोदींना या गोष्टी माहीत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु आता ते हतबल झाल्यासारखे आहेत. लोकांना आश्‍वासने तर देऊन बसलो आणि आता तर त्याची पूर्तता करता येत नाही हे समोर दिसते आहे. म्हणूनच त्यांनी भांडवलदारांपुढे लोटांगण घातले आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "भांडवलदारांपुढे लोटांगण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel