-->
राजकीय धुळवड...

राजकीय धुळवड...

बुधवार दि. 20 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राजकीय धुळवड...
उत्तर भारतात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्याकडे कोकणातही होळीचे महत्व काही कमी नाही. मुंबईतील चाकरमानी आपल्या धकाधकीच्या जीवनातून या काळात गावी जातो आणि होळीचा आनंद लुटतो. यावेळी भर निवडणुकीत होळी आल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपाची होळी व त्यानंतर धुळवड साजरी होईल. हिंदू नववर्षाच्या सर्वात शेवटच्या म्हणजे फाल्गुनमासात येणारा हा सण नवचैतन्याला वाट मोकळी करुन देणारा आहे. सृष्टीला नवसर्जनाचे वेध लागलेले असताना तो जीर्णता नष्ट करण्याचे संकेत देतो. होळीचा सण म्हणजे, आपल्याकडील हिवाळा आणि उन्हाळा या ऋतुंमधील स्थित्यंतराचा काळ असतो. भविष्यात येणार्‍या उकाड्याची चाहूल आपल्याला येथूनच लागते. नव्या वर्षात पदार्पण करताना आधीची नकारात्मकताजळून नष्ट व्हावी, या हेतूने होळी पेटवून, अपशब्द उच्चारत तिच्याभोवती प्रदक्षिणा घालून मनातला क्रोध, मत्सर, दुस्वास यांची आहुती पडावी आणि निर्मळ, निवळशंख मनानं नवतेजाला सामोर जाव ही शिकवण देणारा हा सण आहे. धुळवडीला कोणी भांग पिऊन, धांगडधिंगा घालत, रंगात माखून घेत होळीचा आनंद साजरा करतो. प्रत्येक भागात धुळवड साजरी करण्याची वेगळी पध्दत आहे. या दिवशी दर वर्षी अमाप उत्साह आणि उल्हास बघायला मिळतो कारण काळ पुढे सरकेल तशी नकारात्मकता साचतच असते. एकदा जाळली की जळून खाक होणारी आणि पुन्हा न निर्माण होणारी ही बाब नाही. कालचा भूतकाळ विसरुन नव्याने जीवन सुरु करण्याची यातून प्रेरणा मिळते. होळी हे कालचे वाईट विचार, भ्रष्टाचार, नकारात्मकता हे जाळून आता नव्याने पुढच्या दिवसांना सामोरे जायचे असते. बेंबीच्या देठापासून एकमेकांच्या नावाने शंख करत एकदा का मनाचा तळ स्वच्छ केला की सगळे जगच जणू सुंदर दिसू लागते. यातून उद्याचा चांगाल दिवस सुरु होणार असतो. वर्षभर राजकीय शिमगा साजरे करणारे विविध राजकीय पक्ष एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. सरड्यासारखे रंग बदलत सध्याच्या काळात पक्षीय निष्ठाही बदलली जाते. राजकीय खेळीचा एक भाग म्हणून सर्वसामान्य लोक याकडे पाहतात. सध्या तर होळीच्याच काळात भर निवडणूक आल्यामुळे होळीतील धमालीला राजकीय रंग भरला जाईल. देशात जातियवादी, एकाधिकारशाही या राक्षसी प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. हेच लोक सत्ताधारी झाले आहेत. त्यांनी देशाची घटना बदलण्याचे कारस्थान रचले आहे. देशाच्या अस्मितेला नख लावण्याचे त्यांचे उपद्व्याप सुरू आहेत. देशासाठी लढणार्‍या जवानांच्या चितेवर स्वार होत मतांचा जोगवा मागितला जात आहे. जवानांच्या शैर्याचा सत्ताधार्‍यांशी काही संबंध नसताना त्यांच्या शौर्याचे श्रेय लाटण्याचे काम सत्तादारी करीत आहेत. गेल्या पाच वर्षातला कोलाहल शांत करत, होळीवर दुधाची शिंपण होते त्याप्रमाणे वैमनस्याची धग शमवत, लोकशाहीचा मान राखत निवडणुका पार पडल्या तर एकाच वर्षी दोनदा शिमगा साजरा करण्याची वेळ येणार नाही. होळी म्हणजे टिंगलटवाळी, एकमेकांची टर उडवणं, मस्करीचे रंग उधळणं. पण त्याची मजा केवळ एकाच दिवसासाठी. ही मूलभूत बाबच आपण विसरत आहोत. सोशल मिडियात स्वत:ची ओळख दडवून ठेवत अनेकांची टर उडवताना, त्यांना ट्रोल करताना, मानहानीकारक टिपण्णी करताना आपली संवेदनहीनता किती खालच्या पातळीवर गेली आहे ते दाखवित आहोत. अफवा, वावड्या, अतिशयोक्ती, सत्यासत्यतेची शहानिशा न करता व्यक्त केलेली जहाल मते हे सगळे काहींसाठी लोकसंजनाचे साधन असते , परंतु त्यामुळे अनेकांचे होणारे नाहक नुकसान याचा कोणीचा विचार करताना दिसत नाही. सोशल मिडियावर ट्रोलिंगमुळे हैराण झालेले, चीड व्यक्त करणारे सेलिब्रिटी डोळ्यासमोर आणले म्हणजे या साध्या वाटणार्‍या गोष्टीतली दाहकता समजून येईल. अपुर्‍या ज्ञानानिशी, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराचा चुकीचा अर्थ अभिप्रेत धरत, चुकीच्या विचारांना प्रोत्साहन देत आणि अंधानुकरण करणार्‍यांची माथी भडकवत असे अयोग्य आणि नकारात्मक विचार पसरवले जातात. एवढेच कशाला इतिहासाची मोडतोड अगदी सहजरित्या केली जाते. तेव्हा शिमगा नसतानाही धडाधडा होळ्या पेटण्याची शक्यता बळावते. काही महिन्यांपूर्वीच गोमांस खाण्यावरुन ते मुले पळवणारी टोळी आली आहे, अशा अफवा पसरवल्यामुळे काही निरपराधांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याहून वाईट बाब म्हणजे सत्ताधार्‍यांची अशा कृत्यांना असलेली फूस. हे कधी संपणार आहे? होळी झाल्यावर आता हवामान बदलत जाते व उकाडा सुरु होते. यंदाच्या निवडणुकीनंतरही देशातील राजकीय हवामान बदलणार आहे. सत्तांतर यावेळी अटळ ठरले आहे. फुलवामानंतर सत्ताधार्‍यांना आपल्या बाजूने हवा पलटल्याचा भास झाला आहे, परंतु जनता त्यांच्या मूलभूत प्रश्‍नांमुळे हैराण आहे. त्या प्रश्‍नांची जोपर्यंत सोडवणूक होणार नाही तोपर्यंत अस्वस्थ राहाणार आहे व ही अस्वस्थता मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने जनता निराश आहे, मोदींनी जे आशेचे गाजर दाखविले होते, त्यातील काहीच सत्यात उतरलेले नाही. त्यामुळे यावेळी राजकीय धुळवडीत सत्ताधार्‍यांची काही खैर नाही...
----------------------------------------------------

0 Response to "राजकीय धुळवड..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel