-->
वनीकरण धुळीला

वनीकरण धुळीला

संपादकीय पान मंगळवार दि. २८ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वनीकरण धुळीला
गेल्या २८ वर्षात विविध प्रकल्पासाठी मग ते खासगी असोत वा सरकारी त्यांच्या उभारणीसाठी आपण ५३० चौरस किलोमिटर वनीकरण संयपुष्टात आणले आहे. ही धक्कादायक माहिती नुकतीच माहितीच्या आधिकारात बाहेर आली आहे. मुंबईतील ४२७ चौरस किलोमीटर परिसरातील १०० चौरस किलोमीटरवरील वनांची कापणी झाली आहे. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे एक अर्धवट वास्तव असल्याचे नमूद करुन राज्याने याच काळात १५०० चौरस किलोमीटर वनांचा विभाग वाढविल्याचा दावा केला आहे. मात्र मुंबई-ठाण्यातील वनांच्या जमीनींवर कत्तल करुन तेथे घरे उभी राहिली हे वास्तव कुणी नाकारु शकणार नाही. त्यामुळेच तेथे राहाणारे बिबटे आज माणसांच्या विभागात घुसत आहेत. खरे बिचारे बिबटे माणसांच्या घरात घुसत नाहीत तर त्यांच्या जमीनी माणसांनी बळकाविल्यामुळे त्यांना वनातून बेघर केल्याने ही परिस्थती उद्दभवली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविण्याचा प्रयत्न आर.टी. आय. कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी मिळविण्याचा प्रयत्नकेला. परंतु काही ना काही कारणाने ही माहिती गेले वर्षभर दिली जात नव्हती. शेवटी ही माहिती देण्याची टाळाटाळ पाहता त्यांनी माहीती आयुक्तांकडे धाव घेतली व त्यांनी याविषयीची माहिती देण्याचा आदेश दिल्यावर ही माहिती जाहीर झाली. जर यात काही गडबडी नाहीत तर ही माहीती कशासाठी दडवली जात होती असा सवाल आहे. सरकार याबाबत गंभीर नाही. आज या जंगलात राहाणार्‍या आदिवासींचे प्रश्न प्रदीर्घ काळ शासन दरबारी पडून आहेत परंतु त्यांनाही केराची टोपली दाखविली जाते. अनेक भागात तर आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचे धंदे जोरात सुरु झाले आहेत. त्याला देखील कोण रोखणार असा सवाल आहे. सरकार व आदिवासी यांच्यातील संवाद वाढला पाहिजे यातून त्यांचे प्रश्न सुटतील. तसेच वनीकरण वाढविण्यासाठी सरकारने जोरात मोहीम घेण्याची गरज आहे. केवळ खोटे आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करुन दाखविण्याची आता वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, याला जी अनेक कारणे कारणीभूत आहेत, त्यातील एक कारण म्हणजे जंगलांची चालू असलेली बेहिशेबी कत्तल. अनेक महानगरातून तर ही कत्तल होऊन सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. यावर उपाय म्हणून यापूर्वी झालेल्या चुका आता सुधारुन तरी पुढील पिढीला चांगले जगता येईल हे पण पाहूया.
--------------------------------------------------------




0 Response to "वनीकरण धुळीला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel