-->
उडता भारताचे वास्तव

उडता भारताचे वास्तव

संपादकीय पान मंगळवार दि. २८ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उडता भारताचे वास्तव
पंजाबधील मादक पदार्थांचे वास्तव सांगणारा उडता पंजाब हा चित्रपट नुकताच गाजला होता. मात्र संयुकत राष्ट्र संघाने अलिकडेच प्रसिध्द केलेला मादक पदार्थांवरील अहवाल पाहता केवळ उडता पंजाब नव्हे तर उडता भारत म्हणण्याची वेळ आली आहे. या अहवालानुसार विविध प्रकारच्या मादक पदार्थांच्या तस्करीत भारत हा निर्यातीचे एक प्रमुख केंद्र झाले आहे. प्रामुख्याने कोकेन व हेरॉईनसाठी भारत हे निर्यातीचे एक महत्वाचे ठिकाण आहे. मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स येथून आलेले हे मादक पदार्थ भारतातून चीन व इस्त्रायलकडे रवाना होतात. तुलनेने हेरॉईन हे कमी किंमतीचे असल्यामुळे त्याला गरीब देशांची मोठी बाजारपेठ मिळते. हेरॉईन हे भारतातून अफगाणस्तान व त्याच्या शेजारच्या देशाला अवैध मार्गाने पाठविले जाते. अफूचे जगातील सर्वाधिक उत्पादन आपल्या शेजारच्या अफगाणिस्तानात ७० टक्के म्हणजे ३,३०० टन एवढे होते. त्याखालोखाल १४ टक्के अफूचे उत्पादान हे म्यानमारमध्ये होते. अफू किंवा कोणत्याही मादक पदार्थांचे वाहन करणारी व्यक्ती हे बहुतांशी एड्सग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर त्यांचा गुन्हेगारी जगताचा थेट संपर्क असतो. २०१४ सालच्या एका आकडेवारीनुसार, जगातली पाच टक्के लोकसंख्या मदक पदार्थांच्या विळख्यात अडकलेली आहे. भारतातही याचा जोमाने प्रसार सुरु झाला आहे ही सर्वात धोकादायक बाब म्हटली पाहिजे. एकेकाळी सोन्या-चांदीची तस्करी जोरात होती. त्यानंतर शस्त्रात्रांची तस्करी जोरात पुढे आली. आजही ही तस्करी चालू आहे. मात्र आता मादक पदार्थांची तस्करी जगात आघाडीवर आहे. ही तस्करी आता एवढी खोलवर पोहोचली आहे की, नुकताच बॉलिवूडची एकेकाळची नामवंत अभिनेत्री ममता कुलकर्णी देखील या तस्करीत अडकल्याच्या बातम्या प्रसिध झाल्या होत्या. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या तस्करीत अनेक जण अडकत चालले आहेत, ही एक भयानक बाब म्हटली पाहिजे. देशात मादक पदार्थांशी संबंधीत आत्महत्या केल्या जाण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेशाचा देशात क्रमांक लागतो. मादक पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूवरील ताबा हा पूर्णपणे जातो व त्यातून या सेवनातून आत्महत्या करण्याकडे कल वाढतो. दारु व धुम्रपान यांच्या सेवनाच्या तुलनेत कितीतरी पट जास्त नशा या आमली पदार्थातून मळते व एकदा त्याच्या सेवनाखाली एखादा जण आला तर त्यातून त्याला बाहेर काढणे ही सोपी बाब नसते. नशा ही कोणत्याही प्रकारची असो शरीरासाठी वाईटच असते. आता नवीन पिढीला झटपट व प्रदीर्घ काळ नशेत राहाण्याची धडपड असते, त्यातून ही नवीन मादक पदार्थे आता आली आहेत. परंतु याच्या सेवनामुळे आपला अंत लवकर आहे हे समजण्याएवढी मानसिकता त्यांची नाही. यासाठी सरकारने तरुणांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. उडता पंजाबवर बंदी घालून याविषयी जनजागृती होणार नाही, तर त्यासाठी त्याचे वाईट परिणाम जनतेपुढे प्रामख्याने तरुणांपुढे मांडले गेले पाहिजेत. त्याचबरोबर याच्या तस्करीत असलेल्यांना कडक शासन झाले पाहिजे. यातून याच्या तस्करीला आळा बसेल.

0 Response to "उडता भारताचे वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel