-->
देवधरांची दर्पोक्ती

देवधरांची दर्पोक्ती

शनिवार दि. 17 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
देवधरांची दर्पोक्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रचारक व सध्याचे भाजपाचे नेते तसेच त्रिपुरातील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार सुनिल देवधर यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या मुंबई भेटीत विविध चॅनेल्सला मुलाखती दिल्या. त्यांनी या मुलाखतीत भाजपाचा त्रिपुरात विजय होण्यासाठी कशा प्रकारे आखणी करण्यात आली, कोणत्या समाजघटकांना सोबत घेण्यात आले, कोणत्या घोषणा करुन मते खेचली याचे सविस्तर वर्णन केले. एकूणच त्यांनी पक्षासाठी केलेले हे काम उल्लेखनीय आहेच यात काहीच शंका नाही. त्यांनी या मुलाखतीत डाव्या पक्षाला प्रामुख्याने त्रिपुरात एकेकाळी सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देशद्रोही म्हटले आहे. हे वस्तुस्थीदर्शक नाही तसेच इतिहासाचा विपर्यास करणारे विधान आहे. अर्थात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आल्यापासून जे आपले कट्टर विरोधक आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे देवधरांनी देखील माकपावर देशद्रोहाचा आरोप करणे यात काही नवल नाही. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील युवकांचा नेता कन्हैयाकुमार याला देखील सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली सरकारने अटक केली होती, मात्र त्याचा हा देशद्रोह काही न्यायालयात सिध्द होऊ शकला नाही. त्याबद्दल सरकारवर उच्च न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. असो, मुद्दा हा की, देवधरांच्या डोक्यात त्रिपुराच्या विजयाने उन्माद सुरु केला आहे असेच दिसते. अन्यथा त्यांनी कम्युनिस्टांना देशद्रोही म्हटले नसते. देवधरांचे हे विधान किती खोटे आहे, हे सांगण्यासाठी त्यांना इतिहासात न्यावे लागेल. देशातील कम्युनिस्ट चळवळीने नेहमीच कामगार, कष्कर्‍यांच्या चळवळीबरोबर स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. भाजपा आज ज्यांचा मोठ्या गौरवाने उल्लेख करते ते शहिद भगतसिंग हे देखील कम्युनिस्टच होते व फासावर जाण्यापूर्वी त्यांनी मार्क्सच्या चरित्राचे वाचन केले होते. भारताला स्वतंत्र्य कसे मिळाले पाहिजे, याबाबत कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते, हे जगजाहीर होते. परंतु साम्राज्यवादी ब्रिटीशांच्या जोखडातून आपल्यला मुक्त व्हायला पाहिजे याबाबत काहीच शंका नव्हती. त्यामुळेच स्वातंत्र्यसैनिक असलेल्या कम्युनिस्टांची मोठी यादी देता येईल. अशा प्रकारची यादी त्यांनी संघ स्वयंसेवकांची द्यावी. तसेच संघाच्या कार्यालयावर किती वर्षे स्वातंत्र्य दिनाला आपला राष्ट्रीय झेंडा फडकत नव्हता हे देखील सांगावे. आपल्याकडील स्वातंत्र्य लढा व सोव्हिएत युनियनमधील क्रांती याचे फार जवळचे नाते होते. कॉम्रेड लेनिन यांनी झारची सत्ता उलथावून केलेल्या कामगारांच्या क्रांतीचे आपल्याकडील त्यावेळचे तेलाताबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखले गेलेल्या लोकमान्य टिळकांनी जोरदार स्वागत केले होते. ही क्रांती किती महान आहे व यातून जगातील स्वातंत्र्यलढाला कशी प्रेरणा मिळणार आहे, हे केसरीत अग्रलेख लिहून मत व्यक्त केले होते. त्यामुळे जगभरात होणार्‍या क्रांत्या या परस्परांना पोषक असतात व त्यातून एकमेकांच्या लढ्याला प्रेरणा मिळत असते. रशियातील क्रांतीचे व तेथील नेत्यांचे आपल्याला काय करायचे आहे? असे आपण म्हणू शकत नाही. यातून देशाविषयीचे प्रेम मोजता येणार नाही. रशियातील किंवा चीनची क्रांती महान होती व त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे असे सांगणे म्हणजे देशद्रोह नव्हे, हे सध्याच्या भाजपाच्या नेत्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. सोव्हिएत युनियनच्या क्रांतीनंतर झालेल्या दुसर्‍या महायुद्दानंतर जग हे भांडवलशाही व समाजसत्तावादी देश यात विभागले होते. सोव्हिएत युनियनची नेहमीच तिसर्‍या जगातील देशांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ही भूमिका होती व त्यांनी तसा जागतिक दबाव निर्माण केला होता, त्यामुळे आपल्या देशातील स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळत गेले, हा इतिहास विसरता येणार नाही. त्याकाळी जर सोव्हिएत युनियनचा दबाव नसता तर दुसर्‍या महायुद्दानंतर आपल्याला लगेचच स्वातंत्र्य मिळालेही नसते. देवधरांनी कम्युनिस्टांमध्ये पक्षाला महत्व दिले जाते असे सांंगितले, त्यामुळे पक्षाची मक्तेदारी असल्यासारखी स्थिती असते. कोणत्याही केडर बेस पक्षात ही शिस्त पाळलीच जाते. पक्षात जर अंधांधुदी माजवायची नसेल तर पक्ष सांगेल तसे काम करण्याची तयारी पक्ष नेत्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांने ठेवली पाहिजे. आज कोणत्याही पक्षात शिस्तीला महत्व दिले पाहिजे. अन्यथा कॉग्रेसची सत्ता गेल्यावर जी स्थिती झाली आहे, ती कोणत्याही पक्षाची होऊ शकते. आज देवधर पक्ष सांगेल ते काम करण्याची माझी तयारी आहे, असे जे सांगतात ते याहून काय वेगळे आहे? आज आपल्या देशात हिंदुत्ववादी भाजपा व सेक्युलर विचार मानणारे असे दोन प्रामुख्याने गट आहेत. गेल्या काही वर्षात प्रामुख्याने बाबरी मशिद पाडल्यावर हिंदुत्ववादी विचारसारणीने वेग घेतला. यातून भाजपाची ताकद वाढत गेली. डाव्या पक्षांची ताकद कमी होत गेली हे वास्तव कुणी नाकारणार नाही, परंतु तो विचार संपला किंवा संपविला पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे. कोणताही विचार संपत नसतो मग तो मार्क्सवाद असो किंवा संघाचा हिंदुत्ववाद. प्रत्येकाच्या आलेखाचा उतार-चढ होणे हा इतिसाचा भाग झाला. मार्क्सवाद संपला असे म्हणणार्‍यांनी एक लक्षात घ्यावे की, आजही जगात दुसर्‍या क्रमांकाचा ग्रंथ विकला जातो तो मार्क्सचे कॅपिटल. तर पहिल्या क्रमांकावर बायबल आहे. अर्थात बायबल घेण्याची प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीस आवश्य्कता असते. मात्र कॅपिटल विकत घेण्याची सक्ती नाही, असे असतानाही आज हा ग्रंथ दुसर्‍या क्रमांवर विक्रीत आहे. त्यामुळे कोणताही विचार संपत नसतो व तो संपविण्याचा प्रयत्न करणारेच संपतात, हे देवधरांनी लक्षात घ्यावे.
-----------------------------------------------------------------   

0 Response to "देवधरांची दर्पोक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel