-->
मुंबईचा चेहरामोहरा बदलणार...

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार...

रविवार दि. १४ जून २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
मुंबईचा चेहरामोहरा बदलणार...
----------------------------------------
एन्ट्रो-  गेल्या पाच वर्षात मुंबईने आपली कात टाकण्यास प्रारंभ केला. मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा, ईस्टर्न फ्री वे असे प्रकल्प यापूर्वीच्या सरकारने राबवून मुंबईचा चेहरा बदलण्यास सुरुवात केली होती. मात्र यापूर्वीच्या सरकारला मुंबईच्या बाबतीत उशीरा जाग आली. मुंबई ही देशाची राजधानी असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उत्कृष्टररित्या असणे ही किमान गरज होती. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. आपल्यापूर्वी दिल्लीत मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले गेले व त्यामुळे हे शहर सर्वांच्या नजरेत भरले. दिल्लीतील प्रदूषण कमी झाले व अशा प्रकारे मेट्रोचे जाळे महानगरात उभारले जाण्याची गरज वाटू लागली...
----------------------------------------------------
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. कफ परेड ते कांदिवली असा ३२ कि.मी. लांबीचा समुद्राला समांतर रस्ता उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे. तेरा हजार कोटी रुपये खर्चुन उभारल्या जाणार्‍या या प्रकल्पामुळे मुंबईचे उत्तरेचे टोक केवळ ४० मिनिटात गाठता येणार आहे. येथे सुरुवातीला सी लिंक प्रकल्प उभारण्याचा विचार होता. मात्र त्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे त्याच्या एक सष्ठांश खर्चात कोस्टल रोड उभारला जाईल. त्यामुळे मोठ्या खर्चात बचत होणार आहे. त्याचबरोबर हा रस्ता उभारण्यामुळे कुणीही विस्थापीत होण्याचा धोका नाही. त्यामुळे हा रस्ता नियोजित वेळेत उभारणे शक्य होणार आहे. खरे तर हा रस्ता उभारण्याचा प्रस्ताव एका विदेशी कंपनीने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना सादर केला होता. मात्र त्यावेळी केंद्रात पर्यावरण मंत्री म्हणून जयराम रमेश असल्यामुळे त्यांनी याबाबतचा निर्णय घेण्यात दफ्तरदिरंगाई केली होती. शेवटी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याविषयी निर्णय घेतला व त्यासाठी फडणवीस सरकारने याचा पाठपुरवठा केला. हा रस्ता सुरु झाल्यावर मुंबईतील ६० टक्के वाहतुकीला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण झाल्यावर पश्‍चिम उपनगरात राहाणारे मुंबईकर सरकारला दुवाच देतील. तसेच सरकारने अलिबाग-विरार या कॉरिडॉरलाही मंजुरी दिली आहे. हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सारखा महामार्ग होणार असल्याने अलिबाग हे येत्या काही वर्षांनी मुंबईचे उपनगर होण्याचा मार्ग यातून मोकळा झाला आहे. भविष्यात मुंबई हे हळूहळू अलिबागच्या दिशेने सरकणार आहे. त्यातच नवी मुंबईत आन्तरराष्ट्रीय विमानतळ झाल्यावर या भागाचा चेहरामोहरा बदलला जाईल, यात काहीच शंका नाही. गेल्या पाच वर्षात मुंबईने आपली कात टाकण्यास प्रारंभ केला. मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा, ईस्टर्न फ्री वे असे प्रकल्प यापूर्वीच्या सरकारने राबवून मुंबईचा चेहरा बदलण्यास सुरुवात केली होती. मात्र यापूर्वीच्या सरकारला मुंबईच्या बाबतीत उशीरा जाग आली. मुंबई ही देशाची राजधानी असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उत्कृष्टररित्या असणे ही किमान गरज होती. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. आपल्यापूर्वी दिल्लीत मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले गेले व त्यामुळे हे शहर सर्वांच्या नजरेत भरले. दिल्लीतील प्रदूषण कमी झाले व अशा प्रकारे मेट्रोचे जाळे महानगरात उभारले जाण्याची गरज वाटू लागली. शेवटी राज्यातील राज्यकर्त्यांनी मेट्रोची योजना आखली. ही मेट्रो रिलायन्सच्या गळी बांधली असली तरीही मुंबईची गरज यातून स्पष्टपणे जाणवली. मात्र सुरुवातीला स्वस्त असलेली ही मेट्रो रिलायन्सने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेली. शेवटी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोला एफ.एम.वर जाहीरतबाजी करण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारने यापुढे जरी खासगी उद्योजकांना अशा प्रकल्पात सहभागी करुन घेतले तरी त्याचे दर हे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडतील असे ठेवण्याची गरज आहे. आता कोस्टल रोडला ही टोल आकारला जाणार आहे. मात्र त्याबाबत सरकारने पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता आहे. एकीकडे ईस्टर्न फ्री वे तर आता दुसरीकडे कोस्टल रोड तर मोनो व मेट्रोचे जाळे मुंबईत उभारल्यावर मुंबईतील पायाभूत सुविधा आन्तरराष्ट्रीय पातळीच्या दर्ज्याच्या ठरणार आहेत. श्रमिकांची मुंबई आता राहिलेली नाही. गिरणी संपानंतर मुंबईतून उत्पादन प्रकल्प बाहेर जाऊ लागले. गगिरण्या ओस पडल्यावर रसायन कंपन्या व त्यापाठोपाठ उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी मुंबईच्या जागांना आलेल्या सोन्याच्या दराचा फायदा घेण्यासाठी जागा विकण्याचा सपाटा लावला. यातून मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी होण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली. गेल्या वीस वर्षात हा बदल प्रामुख्याने झाला. मुंबई महानगरीतून उत्पादन क्षेत्र संपुष्टात येऊन सेवा क्षेत्राने त्याची जागा घेतली. याचा परिणाम असा झाला की, कष्टकर्‍यांच्या नोकर्‍या कमी झाल्या व सुट,बूट घालणार्‍या व टाय लावून फिरणार्‍या एम.बी.ए. लोकांच्या नोकर्‍या वाढल्या. अर्थात त्यांनाही नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत यात काही शंका नाही. परंतु मोठ्या संख्येने मुंबईत जो कामगार-कष्टकरी होता तो जाणूनबूजून संपविला गेला. आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यानंतर म्हणजे ९१ सालानंतर कामगार चळवळ हळूहळू कमी होऊ लागली. कामगारांचे नोकरीतील संरक्षणही संपुष्टात येऊ लागले व कंत्राटी पध्दती जन्माला घातली गेली. कामाच्या परफॉमन्सचे खूळ काढून ठराविक आपल्या मर्जितील लोकांना भरघोस पगारवाढ देण्याचे धोरण राबविण्यास सुरुवात झाली. यात कामगार-कर्मचार्‍यांचे सर्वच प्रकारचे शोषण होऊ लागले. परंतु कामगारांनी वाढत्या पगारामुळे ते स्वीकारले. पूर्वी जो कामगार आठ तास काम करुन मिळवित होता त्यापेक्षा जास्त पगार मिळू लागला होता, मात्र त्याची सेवा दहा तासांच्यावर होऊ लागली. पगारवाढीच्या नावाखाली कर्मचार्‍यांनी ते सहनही केले. मएालकांना कमी कामगार-कर्मचार्‍यात काम करुन मिळू लागले. मात्र यात कामगार-कर्मचारी आपले हक्क, अधिकार जे शंभर वर्षांपूर्वी लढा देऊन कमाविले होते, ते गमाविण्याची वेळ आली. इतिहासाची चाके उलटी फिरु लागली. मुंबईचा याच काळात चेहरा बदलला. आता पायाभूत सुविधा बदलत गेल्या मात्र त्यापूर्वीच तेथील श्रमीक वर्ग बदलत गेला होता. गेल्या काही वर्षात मुंबईतील रियल इस्टेच्या किंमती गगनाला भिडल्या. त्यामुळे दक्षिण मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. येथील गिरगावातील चाळीतील मराठी माणूस तर विरार-वसई, डोंबिवली येथे जाण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती. त्यामुळे मुंबईचा दक्षिण भाग हा केवळ गर्भश्रीमंतांचा इलाका होणार आहे. मुंबईची एकेकाळी शान असलेले मुंबई बंदरही आता बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे बंदर बंद करुन सर्व आयात-निर्यात जे.एन.पी.टी. वरुन करण्याचे घटत आहे. हे झाल्यास मुंबईत सर्व कंपन्यांची कार्यालये राहातील व उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर असतील. तसेच सेवा क्षेत्रातील सर्व कंपन्या आपला विस्तार मुंबईत करतील. परंतु एक विसरता कामा नये की, जी म्हणून जगात आर्थिक केंद्रे म्हणून शहरे विकसीत झाली मग ते लंडन असो, सिंगापूर असो वा दुबई असो या प्रत्येक शहराला बंदर आहे व तेथे उत्पादन क्षेत्राच्या जोडीला सेवा क्षेत्र आहे. आपण मुंबईचा चेहरामोहरा बदलताना हेच नेमके विसरतो आहोत, हे दुदैव.
--------------------------------------------------------

0 Response to "मुंबईचा चेहरामोहरा बदलणार..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel