-->
गुजरातमध्ये धोबीपछाड

गुजरातमध्ये धोबीपछाड

संपादकीय पान शुक्रवार दि. ०४ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गुजरातमध्ये धोबीपछाड
केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथम दिल्ली, त्यानंतर बिहार व आता गुजरातमध्ये सपाटून मार खाल्याने भाजपाच्या सरकारविरोधात नाराजी आता वाढू लागल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुजरातमधील मतदारांनी पंतप्रधान मोदींना पाणी पाजले आहे. गेली दोन दशके वर्चस्व राहिलेल्या भाजपाची गुजरातमध्ये पीछेहाट झाली असून कॉंग्रेसने अनपेक्षित यश संपादन केले आहे. गेल्या दोन दशकात कॉँग्रेसला ज्या जागांवर विजय मिळविता आला नव्हता तेथे आता त्यांनी आपले वर्चस्व स्थापन केले आहे. मात्र यात शहरी व विरुध्द ग्रामीण भागातील जनता आसे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरी भागात भाजपाने आपले अस्तित्व टिकविण्यात यश मिळविले तर ग्रामीण भागात कॉँग्रेसचे प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन झाले आहे. गुजरातमधील ही निवडणूक म्हणजे विधानसभेची मिनी निवडणुक म्हणावी अशी होती. त्यात सहा महानगरपालिकेत भाजपाने आपल्या जागा टिकविण्यात यश मिळविले. तर ३१ पैकी २३ जिल्हा परिषद कॉँग्रेसने जिंकल्या. विशेष म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मतदारसंघातील भाऊचारर्जी पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. ही घटना भाजपासाठी धोक्याची घंटा ठरावी. पटेल समाजासाठी राखीव जागांसाठी हार्दिक पटेलने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपासाठी विशेषत: मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. मोदी यांच्या लोकप्रियतेचा फुगा फुटल्याची चुणूक या निवडणुकांनी दाखवून दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. गेल्या निवडणुकीत फक्त तापी जिल्हा परिषद कॉंग्रेसला जिंकता आली होती. त्याउलट आता ताब्यात २३ जिल्हापरिषदा आल्या आहेत. २३० पंचायत समिती निवडणुकांमध्येही कॉंग्रेसची कामगिरी चमकदार झाली आहे. राज्यातील २३० तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत ४७७८ जागा होत्या व त्यातील कॉँग्रेस २२०४ जागां पटकाविल्या तर भाजपाला केवळ १७९८ जागांवर समाधान मानावे लागले. गुजरातमध्ये ३१ जिल्हा परिषद, २३० तालुका पंचायत, ५६ नगर पालिकांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुख्यमंत्री पटेल यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण मोदी दिल्लीत गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मात्र त्यात मुख्यमंत्री पटेल या सपशेल अपयशी ठरल्या आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा ताबा होता. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा मोठा फटका बसलेल्या कॉंग्रेसने आता झपाट्याने भाजपाच्या जागा खेचून घेण्यास सुरूवात केली असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील जनता सत्ताधारी भाजपावर नाराज आहे हे या निकालावरुन स्पष्ट दिसते. प्रामुख्याने मोदी सरकारने केंद्रातील सत्ता काबीज करण्यासाठी अनेक मोठी आश्‍वासने दिली होती, त्याची पूर्तता काही झालेली नाही. गुजरातमध्ये कापूल व तेलबियांना वाढीव खेरदी किंमत देण्याचे आश्‍वासन दिलेले सरकारने पाळलेले नाही. त्याचबरोबर कृषी उत्पादनांच्या किंमती वाढत असल्या तरीही त्याच फायदा शेतकर्‍यांना काही मिळत नाही. सध्याची ही नाराजी कायम राहिल्यास गुजरातमध्ये आगामी काळात भाजपाचा पराभव होऊन कॉँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकते. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपामधील गटबाजीही उगडकीस आली. यावेळच्या निवडणुकीच्या वेळी भाजपात एवढी गटबाजी उफाळून आली होती की, अनेक नेते प्रचारासाठी उतरलेले दिसत नव्हते. त्याचबरोबर आनंदीबाई पटेल यांनी काही ठिकाणी पाटीदार समाजाच्या प्राबल्य असलेल्या भागात लोकांचा रोष पत्करावा लागला होता. काही ठिकाणी तर महिलाच त्यांच्या आंगावर आपल्या मागण्यापूर्ण करा अशा मागण्या पुढे रेटत त्यांच्या आंगावर धावून गेल्या होत्या. सौराष्ट्र हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. तेथेही जिल्हा पंचायतीतील ११ पैकी ९ ठिकाणी कॉँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. आता या भागातील भाजपाचे नेते शेतकरी आमच्यावर नाराज असल्याचे मान्य करु लागले आहेत. दुसर्‍याबाजूला कॉँग्रेसच्या दृष्टीने ही एक त्यांना अनपेक्षीत अशी लॉटरीच लागली आहे. मरणसन्न अवस्थेत आलेल्या कॉँग्रेसला अशा प्रकारे एकदम संजीवनीच या निवडणुकांनंतर मिळाली आहे. शहरातील महानगरपालिका आपल्याकडे राखण्यास भाजपाला यश आलेले असले तरी अनेक भागात त्यांनी निसटता विजय मिळविला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास राजकोटमध्ये भाजपाचे ३८ तर कॉँग्रेसचे ३४ उमेदवार निवडून आले आहेत. अशा प्रकारे कॉँग्रेसने भाजपाला दोन दशकानंतर गुजरामध्ये मोठे आव्हान दिले आहे. भाजपाला मात्र धोबीपछाड लगावला आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "गुजरातमध्ये धोबीपछाड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel