-->
संपादकीय पान गुरुवार दि. १२ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
फुटबॉलचा महासंग्राम सुरु
---------------------------------
आपल्याकडे ज्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळावर लोक तुटून पडतात त्याचप्रमाणे किंवा त्याहून जास्त फुटबॉलवर प्रेम करणारे लाखोल लोक युरोप, अमेरिकेत व आफ्रिका खंडात आहेत. या फुटबॉलप्रेमींसाठी वर्ल्ड कप म्हणजे एघकमोठी पर्वणीच असते. ब्राझीलमध्ये आजपासून सुरु होणार्‍या या स्पर्धेत फुटबॉलपटू जीवाची बाजी लावून हा कप जिंकण्याचा प्रयत्न करतील. या स्पर्धेत ईर्षा, जिद्द, आशा-निराशा, नशीब यांचे हिंदोळे सतत आंदोळत असतात. जागतिकीकरणामुळे फुटबॉल हा खेळ आता केवळ एक-दोन खंडांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर हा खेळ संपूर्ण जगभर फोफावत गेला. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभागी होणारे खेळाडू जीवाची बाजी लावून खेळ करत नाहीत, म्हणून व्यावसायिकीकरणाच्या उद्देशाने १९३० साली पहिली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. त्याचा यजमान देश कोणता, आर्थिक पाठबळ कसे उभे करायचे, असे अनेक प्रश्न आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघासमोर (फिफा) होते. पण दक्षिण अमेरिकेतील काही राष्ट्रांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे उरुग्वेने या स्पर्धेच्या यजमानपदाचे शिवधनुष्य पेलले. दोन महिन्यांचा बोटीचा प्रवास करून स्पर्धेसाठी जाण्याचा आर्थिक भार परवडत नसल्यामुळे अनेक युरोपियन देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला. अखेर दक्षिण अमेरिकेतील सात, युरोपमधील चार आणि उत्तर अमेरिकेतील दोन अशा १३ संघांत विश्वचषकाचा पहिलावहिला थरार रंगला. त्यानंतर युरोप खंडात झालेल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये दक्षिण अमेरिकेतील मोजकेच संघ सहभागी झाले. फक्त ब्राझील या एकमेव दक्षिण अमेरिकन संघाने दोन्ही वेळेला युरोपवारी केली. दुसर्‍या महायुद्धानंतर ५० वर्षांनी फुटबॉल खेळाची व्याप्ती जगभर विस्तारली. १९३८ मध्ये १६, १९८२ मध्ये २४ आणि १९९८ मध्ये ३२ संघ फिफा विश्वचषकात खेळू लागले. आज क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत १६ ते २० एवढेच संघ लढत असताना फुटबॉल विश्वचषकातील स्पर्धक ३२ संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी यंदा तब्बल २०७ संघ एकमेकांशी झुंजत होते. यावरूनच हा खेळ किती सर्वदूर पसरला आहे याची कल्पना यावी. फुटबॉल हा फक्त आता एक खेळ म्हणून सीमित राहिलेला नाही. त्यानिमित्ताने नागरिकांचा जाज्ज्वल्य देशाभिमान जागृत होत असल्याने गेल्या ६० वर्षांत या खेळाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. विश्वचषक स्पर्धा आता सुरु होणार असल्याने सध्या जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांमध्ये अनोखा उत्साह संचारला आहे. फुटबॉल हा फक्त खेळ अथवा थरारच नाही, तर काहींच्या लेखी तो जीवन-मरणाचा प्रश्न असतो. म्हणूनच १९५० मध्ये घरच्या मैदानावर ब्राझीलला अंतिम फेरीत उरुग्वेकडून पराभूत व्हावे लागल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे चारपेक्षा अधिक फुटबॉल शौकिनांनी आत्महत्या केली होती. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असल्याचे म्हटले जाते. पण फुटबॉलच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. अनेक वादग्रस्त प्रकरणांची नोंद फुटबॉलच्या इतिहासात झालेली आहे. १९९० च्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीत ब्राझीलच्या चाहत्यांनी मैदानात फेकलेल्या फटाक्यांनी आपण गंभीर जखमी झाल्याचे चिलीचा गोलरक्षक रॉबेटरे रोजासने भासविले. त्यामुळे चिलीने उर्वरित सामना खेळण्यास नकार दिला. विश्वचषकाचे आयोजन म्हणजे आपली संस्कृती, शक्ती, ओळख आणि आर्थिक सुबत्तता संपूर्ण जगासमोर मांडण्याची नामी संधी. पण आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार्‍या देशाचे दिवाळे निघाले असेच इतिहास सांगतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील २०१० च्या विश्वचषक स्पर्धेच्या संयोजकपदाने आर्थिक नफाही कमावता येतो, हे प्रथमच दाखवून दिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपले सर्वस्व पणाला लावले होते. ही स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे जीवनमान तर सुधारलेच; पण देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतही उंचावली. पहिल्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी फक्त पाच देश संयोजनपदाच्या शर्यतीत होते. आता एखाद्या खंडात विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचे जाहीर झाल्यानंतर संयोजनाचे हक्क मिळवण्यासाठी त्या खंडातील देशांमध्ये तीव्र स्पर्धा रंगते. विश्वचषकाच्या आयोजनामुळे त्या देशाचे रंगरूपच बदलून जाते. स्टेडियम्सच्या उभारणीसह हॉस्पिटल्स, विमानतळ, हॉटेल्स, वाहतूकसेवा अशा सर्व गोष्टी उपलब्ध कराव्या लागतात. यानिमित्ताने जगभरचे फुटबॉल शौकिन आणि पर्यटकांचे त्या देशाकडे ओघ सुरू होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त होत असल्यामुळे देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो. फुटबॉलने पेले, दिएगो मॅराडोना, रोनाल्डो, डेव्हिड बेकहॅम यांसारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू जगाला दिले. ही विश्वचषक स्पर्धा ब्राझीलकरता आगामी ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेची रंगीत तालीम ठरणार आहे. आणखी दोन वर्षांनी- म्हणजेच २०१६ मध्ये रिओ डी जानेरो या शहरात ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेचा अत्यंत प्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी ही स्पर्धा भारतीय फुटबॉल संघटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. २०१७ साली भारतात १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. फुटबॉलचे चाहतेही सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खेळाचा निखळ आनंद कसा लुटता येईल, याचा विचार करतात. कारण फुटबॉलमध्ये शेवटच्या सेकंदालाही सामन्यास कलाटणी मिळते असाच आजवरचा अनुभव आहे आणि हीच खरी या खेळाची किमया आहे. आपण भारतीय क्रिकेटवर जसे जीवापाड प्रेम करतो त्याप्रमाणे फुटबॉलचे चाहते दोन पावले पुढे आहेत. आता संपूर्ण युरोप हा फुटबॉलमय होऊन जाईल, चाहते कशाचीही तमा न बाळगता वेड्यासारखे फुटबॉलचे सामने पाहतील, त्याची मजा लुटतील. ब्राझीलमधील या महासंग्रामाला आता सुरुवात झाली आहे.
----------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel