-->
संपादकीय पान गुरुवार दि. १२ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
पाकिस्तानातील तालिबान्यांच्या हल्ल्यामागचा अर्थ
-------------------------------------
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ हे बारत भेटीच्या दौर्‍यावर येऊन गेल्याला महिना देखील पूर्ण झाला नसताना पाकिस्तानातील सर्वात मोठा विमानतळ असलेल्या कराचीवर मोठा हल्ला केला आहे. गेल्या ४८ तासात तालिबान्यांनी या काळात दोन वेळा हल्ले केले. या हल्यामागे तालिबान्यांनी पाकच्या पंतप्रधानांना स्पष्ट शब्दात सुचित केले आहे. हे म्हणजे भारताशी शांतता चर्चा केल्यास आम्ही तुमचे कंबरडे मोडू. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी असाच पाच वर्षांपूर्वी भारतात हल्ला केला होता. त्या हल्याची आठवण यावी असाच हा कराचीचा हल्ला आहे. पाकिस्तानने जे पेरले आहे तेच त्यांच्याकडे आता उगवले आहे. फ तहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने १३ एप्रिल रोजी ट्विट धमकी दिली होती. ही धमकी त्यांनी कराची विमानतळावर हल्ला करुन खरी करुन दाखविली आहे. एकीकडे कराची विमानतळावर हल्ला सुरू असतानाच बलुचिस्तानात दोघा आत्मघाती तालिबान्यांनी २० शिया मुस्लिमांची हत्या केली. अफगाणिस्तानातून शेवटचा अमेरिकी सैनिक निघून गेल्यानंतर पाकिस्तानपुढे काय वाढून ठेवलेले आहे, याचेही भान या दोन्ही हल्ल्‌यांनी दिले. कराची हे पाकिस्तानच्या अर्थिक राजधानीचे शहर. गेल्याच आठवडयात मुत्तहिद कौमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांच्या लंडनमधील अटकेचे हिसक पडसाद या शहरात उमटले. अशा घटना तेथे वारंवार होतच असतात. त्यावर विमानतळावरील हल्ल्याने कडी केली. कराची विमानतळ म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने किल्ला, पण तो ही दहशतवाद्यांनी अखेर भेदला. विमानाच्या अपहरणाचा त्यांचा डाव होता. विमानतळावरील इंधनाच्या टाक्याही ते शोधत होते. त्या सापडल्या नाहीत. अन्यथा नुकसान मोठे झाले असते, पण या घटनेने पाकिस्तानची त्याहून मोठी हानी झाली. परदेशी गुंतवणूकदारांना विश्वास देण्याचे काम नवाझ शरीफ यांनी सुरू केले होते. त्यावर पाणी पडले. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी तालिबान्यांबरोबर संधी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण तालिबान्यांनीच त्या उधळून लावल्या. हा हल्ला काही एका दिवसात झालेला नाही. त्यामागे गेल्या कित्येक दिवसांची तयारी होती, हे तालिबानच्या प्रवक्यानेच स्पष्ट केले आहे. या हल्ल्‌याआधी दोन आठवडे उत्तर वझिरीस्तानात तालिबानी आणि लष्कर यांच्यात चकमकी सुरू होत्या. त्यात किमान १२ सैनिक मारले गेले. याचा अर्थ शरीफ सरकार शांततेची स्वप्ने पाहत असताना ते उधळून देण्याची तयारी तालिबानी करीत होते. शरीफ यांच्या राजकारणाची ही खासियतच म्हणावी लागेल. ते शांततेची कबुतरे हवेत सोडतात त्यावेळी त्यांच्या पश्‍च्यात कधी लष्कर, कधी आयएसआय, तर कधी तालिबानी त्या कबुतरांवर नेम धरून बसलेले असतात. अमेरिकेचा अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तालिबान्यांच्या या वाढत्या आक्रमकतेमागे नसेलच असे म्हणता येणार नाही. ओबामा यांनी अफगाणिस्तानातून माघारीचे वेळापत्रक जारी केल्यानंतर तालिबानशी चर्चे प्रयत्न चालविले होते. शरीफ पाकिस्तानी तालिबान्यांबरोबर शांततासंधी करू इच्छित होते. पण तालिबान्यांनी त्या दोघांचीही विमाने जमिनीवर आणली. पाकिस्तानी तालिबानला तेथे शरियतचे राज्य हवे आहे. म्हणजे झिया काळातील इस्लामीकरणाचे पुढचे पाऊल त्यांना टाकायचे आहे.  कराचीतील या हल्यानिमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसली. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असतानाही त्यात भारताला गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावर दहशतवादी घुसल्यानंतर चारच तासांनी त्या हल्लेखोरांकडील शस्त्रास्त्रे भारतीय बनावटीची असल्याचे जाहीर करून टाकण्यात आले..  काही काळाने ते हल्लेखोर परदेशी असल्याचे मोघमपणे सांगण्यात आले. यावर कडी केली ती मुंबई हल्ल्‌याचा सूत्रधार समजल्या जाणार्‍या हाफिज सईदने. या हल्ल्‌यामागे मोदींचा नवा सुरक्षा गट असल्याचे ट्विट केले आहे. भारतविरोधी भावना भडकावण्याचाच हा प्रयत्न. त्याचे पडसाद भारतातही उमटतात, हे त्याला चांगलेच माहीत असणार. भारताशी शांतता तालिबान्यांना नको आहे असाच या हल्ल्याच्या मागचा अर्थ म्हणावा लागेल.
-------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel