आपल्या देशाचे वास्तव...
आपल्या देशाचे वास्तव...
कोरोनाच्या निमित्ताने आपल्या देशातील विदारक वास्तव पुढे येऊ लागले आहे. एकीकडे राज्यकर्ते देशाला महासत्ता करण्याची स्वप्ने बघत आहेत तर दुसरीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेची ससेहोलपट सुरु आहे. देशातील राज्यकर्ते व जनता यांच्यात किती दरी आहे याचेच दर्शन या निमित्ताने होत आहे. गेली 40 दिवस देशात लॉकडाऊन आहे. अजून किती काळ ते सुरु राहील ते आत्ताच्या क्षणाला काहीच सांगता येत नाही. सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक पातळ्यातील जनता गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आपल्याकडे दोन टक्के जनतेकडे मुबलक सुब्बता आहे, त्यांना सध्याच्या परिस्थितीत फारसे काही देणेघेणे नाही कारण त्यांना उद्याची भ्रांत नाही. हे लोक कितीही काळ घरी बसून जगू शकतात. मध्यमवर्गीय जनता आपली असलेली बचत बाहेर काढून सध्या जगते आहे. त्यातील जे नोकरदार आहेत त्यांचा पगार एक महिन्यांनतर बंद तरी झाला आहे किंवा अर्धाच मिळाला आहे. त्यांच्या नोकरीची काही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे त्यांचेही जीवन अस्थिर झाले आहे. छोटे व्यापारी, लहान उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्यांचीही स्थिती थोडी फार अशीच आहे. आता सर्वात तळागाळात असलेल्या मजूर, कष्टकऱ्यांची स्थिती सर्वात हालाखीच आहे. यातील काही करोड लोक आपल्या घरापासून दूर पोट भरण्यासाठी शहरात आलेले आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारने खाण्याची, राहाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु अर्थातच ती काही पुरेशी नाही. काही अपवाद वगळता आपल्याकडील नोकरशाहीला मन नाही, त्यामुळे ते कोणतेही काम निष्ठूरपणे करतात. या कष्टकऱ्यांच्या राहाण्या, खाण्याची व्यवस्था करताना देखील त्यात प्रेम, आपुलकी नाही. आपण हे काम करतोय ती नोकरी नाही तर देशसेवा आहे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यातही आपले भले कसे होईल हे पाहाणारे महाभाग आपल्याकडे आहेत. या नोकरशाहीला वेसण घालणारे आपल्याकडे लोकप्रतिनिधी नाहीत. अशा स्थितीत जो कष्टकरी मजूर आहे तो अस्वस्थ आहे. दर पंधरा दिवसांनी सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवत चालले आहे. अजून किती काळ हे लॉकडाऊन सुरु राहिल त्याचा ठोस अंदाज कोणालाच नाही. या मजुरांना जेवण सरकारकडून मिळते ते काही पुरेसे नसते, त्यात हे किती काळ मिळेल त्याची शाश्वतीही नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कितीही प्रामाणिकपणाने प्रत्येकाला समजाविण्याचा प्रयत्न केला तरी आपली सरकारी यंत्रणा काही कार्यक्षमतेने काम करीत नाही. बरे प्रत्येक जण आपली गाऱ्हाणी सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकत नाही. अशा स्थितीत या मजुरांना घरी जाण्याची ओढ लागणे स्वाभाविकच आहे. केंद्र सरकारने कोणतीही नोटीस न देता एका झाटक्यात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या मजुरांना घरी जाण्याची संधीच मिळाली नाही. केंद्राने राज्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला असता व त्यांना घरी जाण्यासाठी आठवड्याची मुदत दिली असती तर ते समाधानाने आपल्या घरी पोहोचले असते. पण त्यात आपल्या पंतप्रधानांना घोषणा करण्याचे श्रेय मिळविता आले नसते. आता तर आपले जीवन अंधकारमय आहे असे गृहीत धरुन निदान आपल्या घरी गावी तरी जावे, बस-ट्रेन नसली तर चालत जावे अशा घट्ट मनाने लाखोंच्या संख्येने मजुरांचे तांडे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता यासारख्या अनेक महानगरातून आपल्या गावी चालत निघालेले आहेत. त्यांची मोजदाद करणे कठीण आहे पण तळपते ऊन, गळ्यात किंवा डोक्यावर सामानाची एक बँग, पाण्याची बॉटल, खाकोटीला मूल जर दोन-तीन मुले असली तर ती चालत अशी ही दृश्ये रस्त्यावरुन रेल्वे ट्रकवरुन जाताना दिसत आहेत. त्यांना शेकडो किंवा हजार मैल चालायचे आहे, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात थकवा आणि अंधकारही दिसतोय. या जगात आपले कोणीही नाही, आपण एकटेच आलोय व आपल्याला एकटेच जगायचेच. काम देणारा मालकही स्वार्थी निघाला, मते मागायला येणारा नेताही विचारानेसा झाला, शेवटी या जगात आपले कुणीही नाही अशी अटकळ बांधत हा मजूर मजलदलमजल करीत रस्ता काटतोय. अशाच एका मजुरांचा तांडा औरंगाबादहून मध्यप्रदेशात जात असताना थकल्यामुळे रेल्वे ट्रकवर विसावला होता. पहाटे थोडीशी विश्रांती करावी, नाही तरी सध्या रेल्वे बंदच आहेत म्हणून रेल्वे ट्रकवर त्याने मान टाकली. ही त्यांची विश्रांती चिरनिद्रा ठरेल असा विचार कोणाच्याही मनाला शिवला देखील नाही. शेवटी मालगाडी आली आणि 16 जणांना चिरडून निघून गेली. त्या कष्टकऱ्यांचा संघर्ष अशा प्रकारे संपला. त्यांच्यासोबत विखूरलेल्या भाकऱ्या पाहिल्यावर मन विषण्ण करणारे ते दृश्य होते. जीनवमरणाचा त्यांचा संघर्ष संपला होता. मन पिळवटून टाकणारी ही घटना होती. रेल्वेच्या चालकाने त्यांना झोपलेले पाहिले आणि ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु रेल्वे त्यांना चिरडूनच पुढे गेलीच. त्या चालकाने गाडी बाहेर येऊन हंबरडा फोडला, तो एकालाही तेथे कोणीही नव्हते... त्याला बिचाऱ्याला वाटले आपण खूनी आहोत, पण तो खूनी नाही. खूनी आहे आपले सरकार, ज्यांना या मजुरांना घरी पोहोचवून मग लॉकडाऊन करण्याची बुध्दी झाली नाही. स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली तरी आपल्याकडे मजुरांचे जीवन-मरण कसे आहे हे सांगणारी ही अतिशय बोलकी घटना. आपल्या देशाचे वास्तव हे आहे. उगाचच महासत्तेच्या गप्पा करण्यापेक्षा या कष्टकऱ्यांचे जीवनमान सुधारल्यास आपण खूप काही करु शकू.


0 Response to "आपल्या देशाचे वास्तव..."
टिप्पणी पोस्ट करा