-->
अखेर मुंबई ही मुंबईच...

अखेर मुंबई ही मुंबईच...

अखेर मुंबई ही मुंबईच... मुंबई ही जशी कष्टकर्‍यांची आहे, तशीच ती सर्वांचीच आहे. जागतिक गुंतवणूकदार, पर्यटक, संशोधक, सट्टेबाज, आयात-निर्यात करणारे व्यापारी, विद्यार्थी, बँकर्स, उद्योजक, व्यापारी, दलाल, बिल्डर यासारख्या प्रत्येकांना सामावून घेणारी मुंबई आहे. या लोकांना गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’त जायला सांगा, तेथे कुणीही जाणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तेथे हलविले असले तरी, तेथे अगदीच ज्यांना नाईलाज होईल, ते लोक जातील, अन्यथा सर्वच जण मुंबईलाच पसंती देतील. कारण, मुंबई ही शेवटी मुंबई आहे... आणि, गुजरातप्रेमाने भारावलेल्या मोदी-शहांना ते पटणारे नाही. त्यांनी आपल्या राज्याचा विचार न करता, देशाचा विचार करुन यापुढे निर्णय घ्यावेत, अन्यथा त्यांना देशाची जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून गेली कित्येक वर्षे मिरवणार्‍या मुंबईचा हा किताब हिसकावून घेण्याचा प्रयत्न आपले गुजरातचे पंतप्रधान (असे नाईलाजास्तव म्हणावे लागते) नरेंद्रशेठ मोदी करु पाहात आहेत. अर्थात, त्यात ते यशस्वी होणार नाहीत. कारण, मुंबईचे जे मोठेपण आहे, ते कोणीही कितीही प्रयत्न केले, तरी हिरावून घेतले जाऊ शकत नाही. मुंबईचे हे मोठेपण तिच्यात पिढीजात आहे, तिच्या भौगोलिक अस्तित्वात आहे, तिच्या कार्यसंस्कृतीत आहे. यातील एकही गुण गुजरातच्या गांधीनगरमधील ‘गिफ्ट सिटी’मध्ये नाही. नुकताच केंद्राने मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमधील गांधीनगर येथे हलविण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या वित्तीय क्षेत्रावर मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, सत्तेच्या जोरावर आपले जन्मगाव असलेल्या राज्याला मोठे करण्याचा हा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे, यात काहीच शंका नाही. मात्र, गुजरात सध्या जी ‘गिफ्ट सिटी’ उभारत आहे, तेथे केवळ आय.टी. कंपन्या आपले खर्च वाचविण्यासाठी जाऊ शकतात. मुंबईच्या वित्तीय केंद्राचे वैभव या शहराला नाही. ओढून ताणून एखाद्या शहराला सौंदर्य बहाल जसे केले जाऊ शकत नाही, तसेच वित्तीय केंद्राबाबत आहे. ज्याप्रकारे अमेरिकेतील न्यूयॉर्क, ब्रिटनमधील लंडन, फ्रान्समधील पॅरिस, चीनमधील शांघाय, जर्मनीतील फ्रॅकफर्ट ही शहरे वित्तीय केंद्रे म्हणून जगात ओळखली जातात, तसेच मुंबई म्हटले की वित्तीय केंद्र, अशी जागतिक प्रतिमा या शहराची आहे. ती पिढीजात आहे. ती एका रात्रीत तयार झालेली नाही. ब्रिटिश येण्याच्या अगोदर सूरत हे आयात-निर्यातीत प्रसिद्ध होते. मात्र, ब्रिटिशांनी मुंबईची भौगोलिक रचना व येथील नैसर्गिक बंदर लक्षात घेऊन मुंबईला हा दर्जा दिला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई हे प्रमुख बंदर झाले आणि त्याच्या ओघाने एक वित्तीय केंद्र म्हणून विकसित झाले. 1853 साली मुंबईत पहिली रेल्वे धावली आणि सात बेटांचे हे गाव एक शहर हळूहळू आकार घेऊ लागले. मुंबईतील त्याकाळचा गिरणी धंदा हा सोन्याचा धूर ओकत होता, असे म्हटले जाई, ते खरेच होते. ज्यांच्याकडे भांडवल होते, त्यांनी मुंबईत पैसा घातला आणि ज्यांना श्रम करायचे होते, त्यांनी घाम गाळला. तेव्हापासून मुंबईत कामासाठी लोक येण्यास सुरुवात झाली. आज जे मुंबईचे बहुभाषिक स्वरुप आहे, त्याची बीजे त्याकाळी रोवली गेली आहेत. देशातला पहिला शेअर बाजार येथे एका वडाच्या झालाखाली सुरु झाला आणि आता त्याचे एका भव्य वास्तूत रुपांतर झाले. त्यानंतर स्थापन झालेला राष्ट्रीय बाजार उलाढालीत पुढे गेला असला, तरी मुंबई शेअर बाजाराचे महत्त्व काही कमी झालेले नाही. स्पर्धेसाठी दोन शेअर बाजार असणे गरजेचे असले, तरी ते दोन्ही शेअर बाजाराची मुख्यालये मुंबईतच आहेत. त्याउलट, गुजरातमध्ये एकाही शेअर बाजाराचे मुख्यालय नाही. मुंबई हे बँकिंग व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. येथे बहुतांश देशी, विदेशी बँकांची मुख्यालये आहेत व त्यांना नियंत्रित करणारी रिझर्व्ह बँकही येथेच आहे. तीदेखील हलविण्याचा विचार मोदींचा होता; परंतु त्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले नाहीत. मुंबईत केवळ बँकिंग उद्योगच नाही तर, बहुतांशी कंपन्यांची व उद्योगसमूहांची मुख्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, विमा कंपन्या, सेवा उद्योग, पर्यटन, संशोधन संस्था, बॉलिवूड, माध्यम समूह, विदेशी गुंतवणूकदारांची कार्यालये, अशा मोक्याच्या वित्तीय संस्था आहेत. मुंबईचे सध्याचे स्वरुप हे एक परिपूर्ण मेगा वित्तीय सिटी असेच आहे. आज देशात उतरणार्‍या पर्यटकांपैकी 40 टक्के पर्यटक प्रथम मुंबईत उतरतो. तर, व्यवसायासाठी येणारे विदेशी उद्योजक, गुंतवणूकदार प्रथम मुंबईत उतरतात व त्यानंतर दिल्ली गाठतात. जगातील हे बारावे श्रीमंत शहर म्हणून मुंबईची जी जगात ओळख आहे, ती कोणी आजवर पुसू शकलेले नाही. मुंबईत 950 अब्ज डॉलर्सची खासगी मालमत्ता आहे. गुजरातमधील व्यापारी, उद्योजक श्रीमंत असतीलही; परंतु त्यांनादेखील ही ओळख गुजरातमधील एकाही शहराला गेल्या काही वर्षांत देता आलेली नाही. रिलायन्सचे अंबानी गुजराती उद्योजक असले, तरी त्यांचे मुख्यालय मुंबईत आहे व त्यांना कितीही सवलती दिल्या, तरी ते आपले मुख्यालय गुजरातला हलविणार नाहीत. राज्याच्या तिजोरीत मुंबई शहराचा वाटा 70 टक्क्यांहून जास्त आहे. तर, देशातील मुदत ठेवींपैकी 23 टक्के ठेवी मुंबईतून सर्व बँकांना पुरविल्या गेल्या आहेत. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात मुंबईचा वाटा दहा टक्क्यांच्या घरात आहे. गुजरातमधील एकाही शहराची तुलना याबाबत होऊ शकत नाही. मुंबईतील आद्य उत्पादन क्षेत्र म्हणून गिरणी धंदा होता. मात्र, आता तो येथून हद्दपार झाला असला तरीही येथे सेवा उद्योग झपाट्याने वाढला. काळाच्या ओघात मुंबईतून उत्पादन क्षेत्र कमी झाले असले, तरीही सेवा व अन्य आयटीशी संबंधित क्षेत्र झपाट्याने वाढले. मुंबई व उपनगरातील तसेच जुळ्या शहरांतील करोडो लोकांना हीच मुंबई रोजगार देते. आजही स्थलांतरित म्हणून येणार्‍या कुणालाही आजही भुके ठेवत नाही. कष्ट करणार्‍याला जसे इकडे रोजगार उपलब्ध आहे, तसेच सुटाबुटातल्या उच्चशिक्षितालाही येथे चांगल्या पगाराच्या नोकर्‍या आहेत. मुंबईचे हे वैशिष्ट्य असल्याने येथे येणार्‍या प्रत्येकाला हे शहर आपलेसे वाटते. गुजरातमधील गांधीनगरमध्ये जाणार्‍यांना कितीही सवलती दिल्या, तरी मुंबई सोडून अगदी गुजराती लोकही तेथे जाणार नाहीत. कारण, त्यांना मुंबईचे पोटेन्शियल माहिती आहे. मुंबई ही जशी कष्टकर्‍यांची आहे, तशीच ती सर्वांचीच आहे. जागतिक गुंतवणूकदार, पर्यटक, संशोधक, सट्टेबाज, आयात-निर्यात करणारे व्यापारी, विद्यार्थी, बँकर्स, उद्योजक, व्यापारी, दलाल, बिल्डर यासारख्या प्रत्येकांना सामावून घेणारी मुंबई आहे. या लोकांना गुजरातमधील गिफ्ट सिटीत जायला सांगा, तेथे कुणीही जाणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तेथे हलविले असले, तरी तेथे अगदीच ज्यांना नाईलाज होईल, ते लोक जातील, अन्यथा सर्वच जण मुंबईलाच पसंती देतील. कारण, मुंबई ही शेवटी मुंबई आहे... आणि, गुजरातप्रेमाने भारावलेल्या मोदी-शहांना ते पटणारे नाही. त्यांनी आपल्या राज्याचा विचार न करता, देशाचा विचार करुन यापुढे निर्णय घ्यावेत, अन्यथा त्यांना देशाची जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याची क्षमता माजी मुख्यमंत्री फडणवीस व अन्य कोणत्याही भाजपच्या नेत्यात नाही. त्यांनी महाराष्ट्रात राहून राज्याशी एक प्रकारे द्रोहच केला आहे. कोरोना संपल्यावर महाआघाडी सरकारने याविरोधात मोहीम उघडावी व मुंबईचे वित्तीय मोठेपण कायम टिकविण्यासाठी पावले उचलावीत.

Related Posts

0 Response to "अखेर मुंबई ही मुंबईच..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel