-->
संपादकीय पान बुधवार दि. २२ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एकाच माळेचे मणी
परदेशात दीर्घ रजा साजरी करून परतल्यानंतर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक रूप धारण केले आहे. रविवारी किसान रॅलीत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर सोमवारी लोकसभेतही त्यांनी त़थाकथीत आक्रमक पवित्रा घेतला. सुटाबुटातील सरकार, श्रीमंतांचे सरकार अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून त्यांनी त्यांच्यातील बदलाचे प्रात्यक्षिकही दिले. शिवाय, पंतप्रधानांनी प्रत्यक्षात जाऊन शेतकर्‍यांची अवस्था पाहायला हवी, असा सल्लाही द्यायला राहुल गांधी विसरले नाहीत. सध्या शेतकर्‍यांच्या प्रामुख्याने भूसंपादनाच्या सुधारीत कायद्यावरुन देशात भाजपा विरुध्द कॉँग्रेस असे रण माजले आहे. रविवारी शेतकर्‍यांचा दिल्लीत मोर्चा काढून कॉँग्रेसने राहूल गांधींना पुन्हा एकदा राजकीय पटलावर नव्या रुपात साज चढवून आणले. राजकारण व शेतकर्‍यांचा असो किंवा कोणताही जनतेचा प्रश्‍न असो तो एक इव्हेट करण्याची सध्या राजकीय पक्षात अहंमहिका लागलेली असते. कॉँग्रेस काय किंवा भाजपा काय दोघेही मूळ प्रश्‍न राहिला लांब त्यात आपली राजकीय पोळी कशी भाजून घेतली जाईल याकडे लक्ष देऊन असते. गेल्या दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर राहूल गांधी परतले म्हणजे आता देशातद काही तरी क्रांतीकारी घटना घडणार असे कॉँग्रेसवाल्यांनी वातावरण तयार केले. परंतु कॉँग्रेसचा हा बार फुसकाच ठरला. राहूल गांधींनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर जाहीर सभेत व लोकसभेत आक्रमक भूमिका घेतली खरी परंतु त्यांच्या पक्षाचे सरकार गेल्या दहा वर्षात होते त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न का सोडविले नाहीत असाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचबरोबर भाजपानेही शेतकर्‍यांना मोठी आश्‍वासने देऊन मते घेतली मात्र त्याची आश्‍वासनपूर्ती करण्याएवजी भांडवलदारांच्या बाजूने किल्ला लढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच माळेचे मणी आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरू झाले. अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासाठीचा गृहपाठ राहुल गांधी केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत शेतीविषयक स्थितीबाबत चर्चेदरम्यान त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. गडकरी हे केंद्र सरकारमधील अंत:करणातून बोलणारे एकमेव नेते आहेत. शेतकर्‍यांची सरकारच नव्हे तर ईश्वरही मदत करू शकणार नाही,असे गडकरींनी म्हटले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी हा टोला लगावला होता. दरम्यान, गांधींनी या वेळी गारपीटीच्या नुकसानाचे विविध तपशीलही मांडले. लोक वेदनेने व्याकूळ झालेले आहेत. शेतकरी खते मागण्यासाठी गेले तर त्यांच्यावर लाठीमार केला जातो, या वेदना पाहण्यासाठी पंतप्रधान शेतकर्‍यांमध्ये का जात नाहीत? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्याचवेळी संसदेत उपस्थित कॉंग्रेसचे अन्य खासदार पंतप्रधानांना परदेश दौर्‍यातूनच सवड नसल्याचे वक्तव्य करत होते. राहूल गांधींचा हा मुद्दा पटण्यासारखा आहे. कारण पंतप्रधान सध्या देशात काही काळ असतात, त्याबाबत त्यांची खिल्ली उडविण्याचे काम सोशल मिडियावर सुरु झाले आहे. प्रश्‍न असा आहे की, डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना ते सातत्याने विदेशी दौरे करतात त्यावेळी नरेंद्र मोदी त्यांच्या दौर्‍याबाबत टीकेची झोड उठवित. आता स्वत: पंतप्रधान झाल्यावर मात्र नरेंद्र मोदींनी परदेश दौर्‍याचा झपाटा लावला आहे. व देशाच्या तिजोरीतून गेल्या दहा महिन्यात तब्बल ३५० कोटी रुपये परदेश दौर्‍यांवर खर्च झाले आहेत. मनमोहनसिंगांच्या दौर्‍यावर टीका करणारे नरेंद्र मोदी सत्ता येताच एवढे बदलले कसे, असा सवाल उपस्थित होतो. भूसंपादनाच्या सुधारीत विधेयक म्हणजे देशाच्या उद्योगपतींच्या घशात शेतकर्‍यांच्या जमीनी घालण्याचा प्रकार आहे. ज्या नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारासाठी दहा बड्या भांडवलदारांनी पैसे लावले होते ते आता त्यांना अशा प्रकारे कायदा करायला लावून आपल्या गुंतवणुकीची वसुली करीत आहेत. ज्या मोदींना शेतकर्‍यांनी भरभरुन मते दिली त्यांच्या जीवावर आता ते उठत आहेत. मोदींना राजकीय समीकरणे कळत असतील तर शेतीवर आधारित ६० टक्के लोकांना ते नाराज का करत आहेत, हे मला कळत नाही हा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, शेतक-यांच्या शेतीची किंमत वेगाने वाढत आहे. तुमच्या (मोदींच्या) उद्योगपती मित्रांना जमिनी हव्या आहेत. त्यामुळे तुम्ही शेतकर्‍यांना कमकुवत बनवण्याचा घाट घातला आहे. राहूल गांधींच्या या सवालावर त्यांना उत्तर द्यावेच लागणार आहे. देशातील कृषी तज्ज्ञांच्या मते १४ राज्यांतील १.८० लाख हेक्टर शेतीत सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व दुष्काळ यामुळे यंदा फक्त १.०६ लाख हेक्टर शेतीच धोक्यात असल्याचे पंतप्रधान सांगतात. याऊलट कृषी मंत्रालयाच्या मते शेतीचे नुकसान याहून जास्त झालेले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान खरे की कृषी मंत्रालय? एकूणच पाहता जेमतेम वर्षपूर्ण होण्याच्या आतच भाजपा सरकार आपले खरे रुप दाखवू लागले आहे. त्यामुळे या सरकारची व नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने घसरु लागली आहे. जनतेने आपल्याला बहुमत दिले आहे ते हुकूमशाहीसारखे सरकार चालवायला नाही हे सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. कॉँग्रेस यापूर्वी अशाच प्रकारे मस्तीत वागल्याने व जनहित विरोधी धोरणे घेतल्यामुळे सत्ताभ्रष्ट झाली आहे. भाजपाची देखील अशी स्थिती यायला काही वेळ लाखगणार नाही. कॉँग्रेस काय किंवा भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत हे आता जनतेच्या लक्षात येईल.
----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel