-->
संपादकीय पान मंगळवार दि. २१ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
माकपमधील नेतृत्वबदल
मार्क्सवादाशी एकनिष्ठ असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी ६२ वर्षीय सिताराम येचुरी यांची निवड झाली आहे. त्यांची ही निवड अपेक्षितच होती. मात्र माकपच्या केरळातील कॉम्रेडांनी आर. पिल्लई या नेत्यांचे नाव सरचिटणीसपदी पुढे करण्याचा केलेला प्रयत्न फसला व अखेर येचुरी यांनीच बाजी मारली. अर्थात कम्युनिस्ट पक्षाच्या कॅडरमध्ये व्यक्तीला नगण्य महत्व असते. पक्ष आणि पक्षाच्या जनसंघटना याला महत्व असते. पक्षाच्या नेतृत्वात बदल झाल्याने फार धोरणात्मक बदल होतो असेही नाही. परंतु सरचिटणीसपदी कोण व्यक्ती आहे त्यानुसार अल्पप्रमाणात का होईना पक्ष पुरोगामित्व न सोडता आजूबाजूला झुकू शकतो. पक्षाचे पितामह म्हणता येतील असे स्वर्गीय हरकिशनसिंग सुरजीत यांच्या पठडीत वाढलेले व त्यांचे कट्टर अनुयायी म्हणून सिताराम येचुरी ओळखले गेले आहेत. हरकिशनसिंग सुरजित हे सरचिटणीस असताना त्यांनी कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील यु.पी.ए. किमान समान कार्यक्रमाची आखणी करुन सरकारला पाठिंबा दिला होता. त्यावेळी केंद्रात निधर्मी सरकार येण्याची गरज होती. त्यामुळे त्यंानी हा पाठिंबा दिला होता. अन्यथा माकपसारख्या कॉँग्रेसचा कट्टर विरोध असलेल्या पक्षाने पाठिंबा देणे हे एक आश्‍चर्यच होते. सुरजित यांच्या निधनानंतर सरचिटणीसपटी आलेल्या प्रकाश करात यांनी मात्र अणूकराराच्या मुद्यावर कॉँग्रेसचा हा पाठिंबा काढून घेतला. माकपची ही एक मोठी चूक झाली होती. करात यांच्या सरचिटणीसपदाच्या कारकिर्दीत माकपची एकूणच घसरण झाली होती. संसदेत असलेल्या ४४ खासदारांची संख्या घसरुन ९वर खाली आली. त्याचबरोबर पश्‍चिम बंगालमधील साडेतीन दशकांची सत्ता संपुष्टात आली. अर्थात यामागे काही पूर्णत: प्रकाश करात कारणीभूत नव्हते. त्यामागे असलेली राजकीय परिस्थिती व एकूणच पश्‍चिम बंगालमधील माकपच्या पक्ष संघटनेत आलेले शैथिल्य कराणीभूत ठरले. मात्र हे करात यांच्या काळात झाल्याने त्यांवर हा ठपका आला. अर्थातच करात हे सुरुवातीपासूनच फॅब इंडियाचे कपडे वापरणारे नेते अशी त्यांची प्रतिमा होती. आता मात्र सीताराम येचुरी यांची ओळख थोडी वेगळी आहे. डाव्या चळवळीचे संसदेतील खणखणीत आवाज असलेले, संयमी राजकारणी व अभ्यासू नेता म्हणून ते राजकीय वर्तुळात परिचीत आहेत. दिल्लीत ते अजूनही सहजरित्या मेट्रोने प्रवास करतात. पक्ष एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला असताना सिताराम येचुरी यांच्या हाती सुत्रे आली आहेत. एकीकडे सत्ता गेल्याने कॉँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे, कॉँग्रेसच्या विरोधातील जनमताचा रेटा अजूनही कायमच आहे. तर दुसरीकडे भाजपा सत्तेत आल्याने आक्रमक झालेले हिंदुत्ववादी या पार्श्‍वभूमीवर येचुरी यांच्या निवडीला महत्व आहे. सध्याच्या काळात सर्मधर्मसमभाव मानणार्‍या पक्षांना एकत्र आणून कॉँग्रेस वगळता एक आघाडी उभारण्याची मोठी जबाबदारी येचुरी यांच्यावर आली आहे. या आघाडीत माकप व येचुरी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्याचबरोबर माकपमध्ये गेल्या काही वर्षात संघटनात्मक पातळीवर जी एक मरगळ आली आहे ती झटकून टाकण्याचे काम माकपच्या नवीन सरचिटसांना करावी लागणार आहे. पक्षाचा एकेकाळी असलेला पश्‍चिम बंगालचा बालेकिल्ला पुन्हा कसा काबीज करता येईल त्यादृष्टीनेही पावले टाकावी लागणार आहेत. येचुरी हे महाविद्यालयीन काळापासून डाव्या पक्षाच्या विद्यार्थी चळवळीत आहेत. येथूनच त्यांची वैचारिक बैठक तयार झाली. डाव्या पक्षांच्या तरुणांचे एक स्कूल म्हणून ओळखल्या गेलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ तरुणांचे नेतृत्व केले आहे. संघटनात्मक पातळीवर बांधणी कशी करायची याचे चांगले कौशल्य त्यांना आहे. याचा उपयोग आता पुढील काळात पक्षाला निश्‍चतच होईल, यात काही शंका नाही. त्याचबरोबर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे एकत्रीकरण करण्याची ग्वाही दिली आहे. १९६४ साली चीन युध्दाच्या काळात वैचारिक मतभेदातून त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे दोन तुकडे झाले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उदय झाला. आज देशातील स्थिती पाहता कम्युनिस्ट विचारसारणीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जातीयवादी शक्तींशी लढण्याची गरज आहे. हे दोन पक्ष जर एकत्र आले तर यातून देशातील डाव्या चळवळीला एक नवी उभारी मिळू शकते. केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षच नव्हे तर अन्य ही लहान मोठे मार्क्स-लेनिनवाद मानणारे पक्ष-गट एकत्र आणण्याचा प्रयत्न येचुरी यांनी करणे गरजेचे आहे. येचुरी यांना पक्षाची संघटना वाढविताना काहीसे मवाळ धोरण अमलात आणावे लागेल. तीन दशकांपूर्वी ज्या प्रमाणे कम्युनिस्ट पक्ष साचेबध्द व कर्मठ पध्दतीने काम करीत होते त्याचा आता त्याग करावा लागेल. अन्यथा कम्युनिस्ट चळवळ कालांतराने आंकुचित होत जाण्याचा धोका आहे. अशा प्रकारे पक्ष संघटना व विविध पातळीवर काम करणार्‍या जनसंघटना मजबूत करीत असताना डाव्या पक्षांची एक मजबूत आघाडी करुन देशाला एक नवा पर्याय देण्याच्या दृष्टीने त्यांना पावले उचलावी लागतील. सध्याचे केंद्रातील सरकार हे भूसंपादनाचा कायदा करुन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडीत आहे, देशातील मोजक्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे, त्याविरोधात आता आवाज उठविण्यासाठी येचुरी यांना जंगजंग लढावे लागेल. येचुरी यांच्याकडे पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रभारीपद होते. त्यामुळे त्यांनी राज्याच्या अनेक भागात दौरे केले आहेत. सिताराम येचुरी यांच्या रुपाने माकपला एक उत्कृष्ट वक्ता, अभ्यासू, जनसंघटन मजबूत करणारा नेता लाभला आहे. याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला निश्‍चितच फायदा होईल अशी अपेक्षा करुया.
------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel