-->
देशाचे नवीन बापू

देशाचे नवीन बापू

संपादकीय पान सोमवार दि. 16 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
देशाचे नवीन बापू
देशाचे पिता महात्मा गांधी यांची जागा घेणारे नेतृृत्व आता आपल्या देशात निर्माण झाले आहे. अनेकांना याचे आश्‍चर्य वाटेलही. परंतु, सध्याच्या झपाट्याने बदलणार्‍या या जगात व नवनवीन संशोधन होत असताना नवे बापू निर्माण होणे ही बाब अशक्य आहे, असे म्हणता येणार नाही. संशोधनाचा विषयकाढल्याने कुणाला वाटेल की बापूंचे क्लोनिंग करण्यात आले आहे की काय? परंतु, तसे नाही. देशाला नव्याने लाभलेले हे बापूदेखील गुजरातमधून आलेले आहेत. आता तुम्ही देशाचे नवीन बापू कोण हे ओळखले असाल. ते आहेत आपल्या देशाचे कट्टर राष्ट्रप्रेमी पंतप्रधान नरेंद्र मोदी. गेल्या तीस वर्षाची देशातील अस्थिरता संपवून देशात एकहाती सत्ता हाती आणणारे नरेंद्र मोदी सध्या सरकार हे एकहातीच चालवित आहेत. दररोज ते दिवसातले 18 तास देशसेवा करीत आहेत. विदेशात जातात, त्यावेळी जाताना विमानात काय ती झोप मिळते. बरे एवढे देशासाठी कष्ट उपसूनही विरोधकांना त्याची काहीच किंमत नाही, हे सर्वात दुर्दैवी म्हटले पाहिजे. आता देशाच्या विकासासाठी काम करताना त्याची माहिती जनतेला व्हावी यासाठी सर्वत्र आपली छबी दाखविली तर त्यात काय चुकले? आता या नवीन बापूंनी आपली छबी देशाच्या हितासाठी जर खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर छापली तर त्यात काहीच चुकीचे नाही. खादी ग्रामोद्योगचा खप घसरत होता आणि तो जर वाढवायचा असेल तर मोदींच्या छबीची गरज होती. मध्यंतरी रिलायन्सच्या जिओचा प्रचार करण्यासाठी मोदींची छबी वापरली होती व त्याचा त्यांना फायदा झाला आता खादीला व्हावा हीच इच्छा होती. परंतु, विरोधकांपासून ते खादी उद्योगातल्या कर्मचार्‍यांनी त्या विरोधात ओऱड करण्याची काहीच गरज नव्हती. जुने बापू आता तरी तुम्ही यांना सांगा व देशहित कशात आहे ते समजवा. एकतर नव्या बापूंपुढेे बरीच कामे 60 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने वाढून ठेवली आहेत. गेल्या 60 वर्षात काहीच कामे केली नाहीत. विकास काय असतो हे जनतेने केवळ दोन वर्षातच अनुभवले आहे. या काँग्रेसवाल्यांनी आणि त्यांची साथ देणार्‍या पक्षांनी तर सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना उगाचच डोक्यावर बसविले होते. या अल्पसंख्यांकांना कशी अद्दल घडवायची याचे चांगले उदाहरण नरेंद्रभाईंनी गुजरातमध्ये घालून दिले आहे. आता देश त्याच आदर्शावर चालवायचा आहे.  मात्र, ज्यांना जनतेने झिडकारले त्यांचे नरेंद्रभाईंनी का बरे ऐकावे असे सवाल आहे. जुन्या बापूंना बिर्ला, बजाज यांच्यासारखे राष्ट्रभक्त उद्योगपती त्यांना सल्ला देत. वेळ पडल्यास स्वातंत्र्य चळवळीस आर्थिक मदत करीत. त्यांच्यासोबत चळवळीत सक्रीय असत. मात्र, नव्या बापूंनी बदलत्या काळानुरुप बिर्ला, अदाणींना मदत केली तर त्याचा किती गहजब विरोधकांनी करावा? आता कुठेतरी शेतकरी आत्महत्या करणार आणि त्याला जबाबदार मोदी आहेत, असे म्हणणे म्हणजे यांच्यावर अन्यायकारक नाही का? मोदींनी एकाच वेळी किती कामं करायची याला काही मर्यादा आहे की नाही. आता नव्या बापूंनी मध्यंतरी 500 व1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. मात्र, देशहिताचे काम करताना विरोधक किती विरोध करतात याचा अनुभव पहिल्यांदा त्यावेळी आला. नवीन बापूंचा पक्ष विरोधात असतानाही त्यांनी विदेशी गुंतवणूक; विमा उद्योगातील विदेशी गुंतवणूक; जीएसटी विधेयक याला विरोध केला होता, हे खरे. परंतु, त्यात देशहित होते. आता मोदीसाहेब सत्तेत आल्यावर देशाचे हित बदलल्याचे त्यांना जाणवले, त्यांनी आपले धोरण बदललेच ना? असे लवचिक धोरण आखणारा आजपर्यंत देशाला लाभला नव्हता. काँग्रेसने फक्त धोरणेच आखली. मात्र, त्यांच्याच योजनांची अंमलबजावणी केली तरी विरोधक नाखूषच. आता बघा जुन्या बापूंनी आपल्या आयुष्यात जे काही घडले ते मोकळेपणाने लिहून ठेवले. मात्र, लोक मी देशसेवेसाठी सर्व काही सोडले अगदी बायकोलादेखील; हे मी गोव्याच्या प्रचारसभेत डोळ्यात पाणी आणून सांगितले, तरी लोकांना ते पटत नाही. सध्या काळच बदलला आहे हेच खरे. आता देशसेवेसाठी सर्व मंत्र्यांचा कारभार प्रत्यश पाहतो; यात काही चुकले का? पण, त्यावरही टीका होते. मात्र, मी देशसेवेसाठी असेच काम करणार. माझा पक्ष केंद्रात सत्तेत आल्यानंतर आम्ही फक्त आसाममध्येच जिंकलो ही वस्तुस्थिती आहे, हे खरे असले तरी आता मी पुढेे येऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी मला सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. अजून अनेक माध्यमे ही राष्ट्रविरोधी लोकांच्या ताब्यात आहेत. जुन्या बापूंना हे काही मॅनेज करावे लागत नव्हते, कारण त्यावेळी एवढी वृत्तपत्रेच नव्हती. सध्यासारखा सोशल मीडियाचा ताप नव्हता. नवे बापू आता खादीच्या कॅलेंडरवर झळकले आहेत. लवकरच नोटांवर झळकले तर त्याचे राष्ट्रविघातक विरोधकांनी भांडवल करु नये. शेवटी ते जे काही करीत आहेत, ते देशहितासाठीच करीत आहेत. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे, याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत. नवीन बापू आता देशाला लाभल्यामुळे जुन्या बापूंची सद्दी संपली आहे, याची नोंद सर्वांनी घ्यावी. तुम्हाला जर देशप्रेमाचे सर्टिफिकेट सोबत बाळगायचे असेल, तर नवीन बापूंचा एक फोटो खिशात बाळगावा यातून तुमचे राष्ट्रप्रेम सिध्द होईल.

0 Response to "देशाचे नवीन बापू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel