-->
संपादकीय पान गुरुवार दि. २३ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकणाकडे दुर्लक्ष
राज्यातील शेतकर्‍यांवर अवकाळी पावसामुळे कुर्‍हाड कोसळली आहे. नवीन सरकार आल्यामुळे आपल्याला दिलासा मिळेल या अपेक्षेने शेतकरी असताना त्यांना आता नैराश्येने गाठले आहे. त्यामुळे विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात ६०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र सरकार मात्र तीनच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगते. विदर्भातील शेतकर्‍यांची ही दैना झाली असताना कोकणातील शेतकर्‍यांनाही आता वाली राहिलेला नाही.  कारण यावेळी आंबा, काजू, नारळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या जोडीला मच्छिमारीही संकटात आली आहे. अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत. मुंबई बाजारामध्ये १५० ते ७०० रुपये डझन दराने हापूस विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांना यासाठी ३०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. आंब्याचे मुख्य मार्केट असलेल्या मुंबई कृृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी आंबा हंगामाची सुरवात निराशाजनक झाली. एप्रिल अखेरीस गतवर्षी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक होत होती. यावर्षी ५० ते ६० हजार पेट्यांचीच आवक होत आहे. यावर्षी २६० टन आंबा दक्षिणेकडील राज्यातून आला तर उर्वरित आंबा कोकणातून आला आहे. पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडल्याने तो लवकर खराब होतोे. एपीएमसी मार्केटमध्ये हलक्या दर्जाचा हापूस १५० ते ३५० रुपये दराने तर चांगल्या दर्जाचा माल ७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. बाजारात देवगड हापूसला मोठी मागणी असते. परंतु यावर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन झालेले नाही. तेथील हंगाम या महिन्याअखेर संपेल. त्यामुळे हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, गोळा, तोतापुरी, नीलम, पिवू या आंब्यांची आवक होवू लागली आहे. परंतु हा आंबादेखील लवकर खराब होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. बाजारभाव जास्त असल्यामुळे आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेच, शिवाय शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान आहे. पर्यावरणातील असमतोलामुळे दिवसेंदिवस हवामानावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबर अवेळी पाऊस पडणे, तसेच नीचांकी तापमान व उच्चांक तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदलही जाणवू लागले आहेत. आंबा, काजूबरोबर कोकणातील अर्थकारण असलेल्या मासेमारीवरही परिणाम होत आहेत. मच्छिच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली होती. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक धोक्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या पिकांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे. अवेळचा पाऊस वगळता तापमान १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा खाली आले तर फळ गळण्याबरोबर ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढल्यावर आंबा भाजतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फयान वादळानंतर गेली चार ते पाच वर्षे वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पाऊस पडल्याने आंबापिकाचे मोठ्या प्रमाणार नुकसान होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गतवर्षी काजूचे १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी अवकाळी पावसामुळे ६१.२० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी काजू उत्पादन घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. चांगली किंमत देणार्‍या सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांच्या पैदासीवर परिणाम झाल्याने उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारी बंद असली तरी उर्वरित नऊ महिने मासेमारी सुरू असते. मात्र, वादळी वारे किंवा हवामानातील बदलामुळे त्यावेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. मात्र, संपूर्ण हंगामात मासेमारी कमी अधिक प्रमाणात सुरू असते. गेल्या पाच वर्षात मत्स्य उत्पादनातही सतत घसरते आहे. पर्यावरणाचा र्‍हास हाच येथील आंबा, काजू किंवा मत्स्य उत्पादनावर परिणाम करणारा आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड तसेच कारखानदारी यामुळे हवामानातील बदलावर परिणाम होत आहे. वास्तविक ६९ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना केवळ ३८ टक्के इतकेच आहे. पाऊसदेखील ठराविक कालावधीने पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे. अशा वेळी कोकणातील शेतकर्‍यांनी जावे कुठे. यावेळी कोकणातील चाकरमन्यांनी आपली मते मोदींच्या भरवशावर टाकली आणि आता केंद्रातले व राज्यातलेही सरकार काही करत नाही असे चित्र आहे. कोकणातील शेतकरी हा कणखर आहे, परंतु त्यानेही आता आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा असे सरकारला वाटते का, असा प्रश्‍न आहे. सरकारला जाग कधी येणार तरी कधी?
----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel