-->
सी.एम. केअर्स

सी.एम. केअर्स

सी.एम. केअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या निमित्ताने वर्षानुवर्षे सुरु असलेला पी.एम. फंड मोडीत काढून एक नवा फंड पी.एम. केअर्स हा स्थापन करुन करोडो रुपये जमा केले आहेत. याव्दारे नेमकी कोणती केअर घेतली जाते हे सांगता येत नाही कारण हा फंड संसदेला किंवा अन्य कोणालाही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही. त्यामुळे हा फेअर कोणाची केअर करतो हे आपल्याला कळणार नाही. पी.एम.केअर्सचे सोडून द्या परंतु आपल्याकडे सी.एम. मात्र सर्वांची केअर घेत आहेत, असेच दिसते. सी.एम. फंडाची केंद्राने आर्थिक गोची केल्याने त्यांच्याकडे कमी निधी जमा होतो आहे, मात्र तरीही मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने सर्वांची केअर घेत आहेत, असे त्यांच्या कृतीवरुन दिसते. त्यामुळे सी.एम.केअर्स हे कृतीतून आपल्याकडे सिध्द झाले आहे. कारण सध्याच्या संकटाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन याचा मुकाबला एकत्रित करण्याचा त्यांचा मनोदय सर्वांचे मानसिक धैर्य वाढविणारा आहे. त्यामुळे त्यांचे वैचारिक विरोधकही त्यांच्या या सौजन्यशिल स्वभावाने त्यांच्याजवळ आकर्षित होत आहेत. परिणामी राज्यात एक सर्वसमावेशक व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व राज्याला लाभल्याचे आपल्याला दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांची काल बोलाविलेली बैठक. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांनी कोरोनीवर व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला, प्रत्येकांची मते जाणून घेतली, त्यांचे विचार शांत चित्ताने एकले व त्यांच्या मतांवर विचार करुन या संकटाचा मुकाबला करण्याचे आश्वासन दिले. खरे तर उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रशासकिय कामाचा अनुभव जवळपास नाहीच, ते आमदारही नव्हते, अशा स्थितीत अनेकांनी ते काम कसे करतील याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु सर्वांची यासंदर्भातील मते ठाकरे यांनी खोटी ठरविली आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपण कोरोनाच्या विरोधात लढा देत आहोत, एप्रिल महिन्यात आपण लॉक़ाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी झालो, मे महिन्यात कोरोनावर कसे नियंत्रण मिळवायचे यावर विचार करु असे सांगत सर्व पक्षीयांची मते आजमावून विरोधकांच्या मतालाही आपण महत्व देतो हे प्रतिपादीत केले. कोरोनाची ही अभूतपूर्व परिस्थिती केवळ आपल्या राज्यावरच नाही तर जगावर, देशावर आहे. यावर आपल्याला लढा द्यावाच लागेल व यात आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत असताना प्रत्येक पक्ष नेत्यांची या लढ्यात साथ देण्याचे आवाहन केले. अशा कठीण काळी सर्वांना एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सर्वांशी सहकार्याने वागण्याच्या भूमिकेने सर्वच पक्षीयांना समाधान वाटले. आपल्या म्हणजे आपण विरोधात असो किंवा सत्तेतील आघाडीतील पक्ष असो आपल्या मतांची दखल घेतली जाते हे पाहून सर्वांनाच आनंद वाटणे स्वाभाविक आहे. सरकारपुढे आजही मोठी आव्हाने आ वासून उभी आहेत. प्रामुख्याने रुग्ण संख्या वाढत जात असल्यामुळे विलगीकरण कक्ष उभारण्याची गरज आहे, ऑक्सीजनची गरज व्हेंन्टिलेटरपेक्षा जास्त जाणवत आहे. एप्रिल महिन्यात आपण लॉकडाऊन कडकरित्या पाळल्याने आपल्याकडे रुग्ण संख्या आटोक्यात राहिली. लोकांचाही घरी राहून धीर सुटत चालल्याने सरकारने गेल्याच आठवड्यात काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. मात्र त्यामुळे रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सोय करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सरकारने बोलाविलेल्या या बैठकीचे स्वागत करुन अनेक महत्वाच्या सूचना केल्या. आम्ही सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत व आम्ही यात कसलेही राजकारण करणार नाही असे सांगून सकारात्मक भूमिका घेतली. यानिमित्ताने आपल्या विभागातील मते मांडण्याची संधी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना मिळाली. शेतकऱ्यांची समस्या, त्यांची कर्जे यासंबंधी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी आपली मते मांडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी, स्थलांतरीतांचे प्रश्न मांडले. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार पट्यातील आदिवासींच्या समस्या सांगितल्या व त्यावर करावयाचे उपाय सुचविले. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कापसाची खरेदी सुरु करावी, लघुउद्योजक व स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी पावले उचलावीत अशी सूचना केल्या. अशा प्रकारे विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचना कोरोनाविरोधी लढाईत फार महत्वाच्या ठरणार आहेत. आता सरकारला मुंबईतील कोरोना कसा नियंत्रणात आणावा यासाठी तातडीने उपाय योजले पाहिजेत. मुंबईतील अनेक भागात कोरोनाचा फैलाव ज्या गतीने होत आहे ते फार चिंतदायक आहे. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास सरकारने मुंबईत कडक नियम जारी करण्याची आवश्यकता आहे. गुजरात सरकारने अहमदाबाद शहरात ज्या प्रकारे कडक नियम जारी केले आहेत त्याधर्तीवर मुंबईतही नागरिकांना कडक शिस्तीत ठेवण्याची गरज आहे. अहमदाबादमध्ये सात दिवस औषधे व दूध वगळता कोणतीही दुकाने उघडी राहाणार नाही. तसेच घराबाहेरही नागरिकांना पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आता पुढील पंधरा दिवस कोरोनाच्या लढाईतील महत्वाचे दिवस ठरणार आहेत. त्यादृष्टीने मुख्यमंत्री काही खास उपाययोजना करण्याच्या तयारीत असावेत. त्यासाठीच त्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावून सर्वांचीच मते आजमावली आहेत. सरकार या संघर्षात सर्वांना बरोबर घेऊन जात आहे, सध्याचे सी.एम हे सर्वांची केअर घेत आहेत हेच यातून ध्वनीत होते. अशा प्रकारे राज्य सरकारची वाटचाल पाहता कोरोनाच्या लढाईत आपण निश्चित विजयी होऊ यात काही शंका नाही.

Related Posts

0 Response to "सी.एम. केअर्स"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel