
मानवताशून्य योगी
मानवताशून्य योगी
महाराष्ट्रातून तसेच विविध भागातून आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांना कोरोना चाचणी करुनच पाठवा अन्यथा त्यांना तिकडेच ठेवा अशी मानवताशून्य भूमिका उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी घेतली आहे. योगी यांच्या पाठोपाठ बिहारनेही अशीच मिळतीजुळती भूमिका घेतली आहे त्यामुळे आपल्या घरच्या ओढीने जाणाऱ्या लाखो मजुरांवर आता इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती झाली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, ओरिसा या रोजगार नसलेल्या राज्यातून प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात या राज्यात लाखो मजूर आपली पोटाची खळगी भरण्यासाठी येतात. दरवर्षी हे मजूर महिनाभर आपल्या गावी जात असतात. त्यांचे हे गावी जाणे व पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतणे असे चक्र वर्षानुवर्षे सुरुच असते. आता कोरोनाची साथ आल्यावर या मजुरांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे त्यांच्यावर रोजच्या खाण्याची मारामार आली. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विविध उपाय केले परंतु एवढ्या लाखो मजुरांची भूक भागविणे काही शक्य नव्हते. खरे तर केंद्राने राज्यांना पूर्ण सहकार्य केले असते व पुरेसे अन्नधान्य पुरविले असते तर त्यांना राज्यातही ठेवणे शक्य झाले असते, परंतु तसे काही झाले नाही. मोदी सरकारने एका झटक्यात घोषणा केली व सर्वांना घरी बसविले. त्यांना गावी जाण्यासाठी कालावधी काही दिला नाही. शेवटी काही जण चालत निघाले, मजलदलमजल करीत पोहोचलेही. पंरतु सर्वांनाच अशा प्रकारे जाणे शक्य नव्हते. या मजुरांना राज्य सरकारने त्यांची व्यवस्था करणे जेवढे शक्य होते तेवढे केलेही. मात्र या मजुरांची गावाकडे जाण्याची व आपल्या घरच्यांना भेटण्याची ओढ होतीच. त्यातून त्यांच्यातील अस्वस्थता वाढली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अशा मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची सूचना पंतप्रधानांना केली होती. ही विनंती केंद्राने मान्य केली असली तरी त्यांच्याकडून तिकीटाचे पैसे वसुल करण्याचा निर्णय घेतला. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉँग्रेस पक्ष त्यांच्या तिकिटाचे पैसे भरेल असे जाहीर करताच भाजपाची हवाच गेली, शेवटी या प्रकरणी सावरासारव करण्यात आली. आत्तापर्यंत महाराष्ट्रातून 70 हजार रोजंदारीवरील मजूर आपल्या गावी रवाना झाले आहेत, त्यांची तिकटे नेमकी कोणी दिली हे काळाच्या ओघात समजेलच. आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांच्या नावातच योगी आहे, खरे तर ते मानवताशून्य योगी आहेत असेच खेदाने म्हणावे लागते. कारण याच योगी महाशयांनी त्यांची कोरोना चाचणी करुनच पाठवा असे कळविल्यामुळे हे मजूर पुन्हा अडचणीत आले आहेत. शेवटी या बिचाऱ्या मजुरांना कोणी वालीच नाही हे खरे आहे. त्यांच्याकडे एक मतांची बँक म्हणून आजवर अनेक पक्षांनी पाहिले. त्यांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, राज्यात ज्यावेळी निवडणुका होत्या त्यावेळी हेच योगी येथे येऊन त्यांच्या मतांचा जोगवा मागीत होते. बिहारमधील भैयांच्या छटपुजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी भाजपासह अनेक पक्षांची स्पर्धा चालत होती. आता मात्र त्यांच्या कठीण काळात त्यांच्या सोबत कोणीही नाही असेच चित्र दिसते. त्यांच्याकडे एक व्होट बँक म्हणून पाहिले गेले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणच पुढे येईनात असे दुर्दैवी चित्र आज आहे. त्यामुळे कष्ट करणाऱ्या या मजुरांच्या सोबत आज कोणीही नाही. निवडणुका आल्या की त्यांना पैसे देऊन आपलेसे करुन घेऊ असा विचार ते करीत असावेत. सोनिया गांधींनी आपला पक्ष त्यांच्या तिकिटाचे पैसे देईल अशी घोषणा करताच उत्तरेतील या राज्यांची चांगलीच हवा गेली. सरकार किती भेदभाव करते ते पहा, याच राज्यातील अडकलेल्या पैसेवाल्यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मात्र उत्तरप्रदेश, बिहार सरकारने खास गाड्या पाठविल्या आहेत. कोटा येथून मुलांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी जी तत्परता दाखविली जात आहे ती या मजुरांच्या बाबतीत दाखविली गेली नाही. उलट केंद्र सरकारने याच मजुरांकडून रेल्वे भाडे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर विदेशात अडकलेल्या प्रामुख्याने आखाती देशातून येणाऱ्यांना मात्र मोफत आणले जात आहे. विदेशातून येणारी ही माणसे आहेत, त्यांना माणूसकी दाखविण्याची गरज आहे, मात्र देशात राबणाऱ्या या मजुरांच्या बाबतीत ही समानुभूती दाखविण्याची गरज सरकारला वाटत नाही. अर्थात या दोन्ही जणांना सध्याच्या कठीण काळात सरकारने माणूसकी दाखविण्याची गरज आहे. येथील हे मजूर बाहेरच्या राज्यात जातात तेथे काबाडकष्ट करतात आणि आपली पुंजी जमा करुन गावी पैसा पाठवितात, हा पैसा राज्याला फायदेशीर ठरतोच. विदेशातील नागरिक आपले पैसे विदेशी चलनातून पाठवितात त्याची देशाला जशी मदत होते तशीच मदत या मजुरांच्या गावी येणाऱ्या पैशाची होत असते. यातूनच गावचे अर्थकारण चालत असते. उत्तरेतील ही राज्ये वर्षानुवर्षे मागास राहिल्याने या मजुरांना अन्य राज्यात जाऊन राबावे लागते हे वास्तव आहे. जर त्यांना तेथे काम मिळाले असते तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. म्हणजेच आपल्या देशाच्या नियोजनाच्या चुकीमुळे या मजुरांना स्थलांतर करावे लागत आहे. आता याच कष्टकऱ्यांना हे सरकार लाथाडत आहे. योगी म्हणवून घेणाऱ्या या मानवताशून्य मुख्यमंत्र्याचे हे खरे स्वरुप आहे.
0 Response to "मानवताशून्य योगी"
टिप्पणी पोस्ट करा