-->
तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा

तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा

तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा कोरनासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही लोकांमध्ये जोश आणून त्यांना टाळया पिटायला, फुले बरसायला व मेणबत्या लावायला सांगून कोरोनाची लढाई आपण किती जोरदारपणे लढत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला असला तरीही वास्तव काही वेगळेच आहे. गेल्या 40 दिवसात आपल्याकडे कोरोनाला नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी ठरलो असलो तरीही अजून रुग्णसंख्या काही कमी झालेली नाही, असे त्याविषयातील तज्ज्ञ सांगतात. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांचे हे मत आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या मते, कोरोनाची लढाई ही दीर्घकालीन आहे. केवळ लॉकडाऊन हा त्यावरील अंतिम उपाय नव्हे. आपल्याकडे आरोग्याविषयी जमजागृती करणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रातील या दोन नामवंत, जागतिक स्तरावरील तज्ज्ञांची मते फार मोलाची आहेत. कोरोनाच्या विरोधात लढताना लॉकडाऊन हे आवश्यकच आहे. मात्र अन्य उपाययोजनांचीही त्याला जोड देणे गरजेचे ठरते असे डॉ. सौम्या म्हणतात. चीनमध्ये लॉकडाऊननंतरही कुटुंबातल्या कुटुंबात संसर्ग सुरु झाला. त्यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यास सुरुवात झाली. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना स्वतंत्र फॅसिलीटीमध्ये ठेवण्यात आले व त्यांच्यांशी ज्यांचा संपर्क आला असेल त्यांना स्वतंत्र क्वारंटाईन करण्यात आले. अशा प्रकारे हाऊस क्वारंटाईन ते फॅसिलीटी क्वारंटाईन असे विविध टप्पे करण्यात आले. आपल्याकडे काहीसा ठोकळेबाज पध्दतीने विचार केला जात आहे. लोक जर गर्दीच्या ठिकाणी राहत असतील त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, लक्षणे नसलेल्यांकडून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण जेमतेम 15 टक्केच आहे. मास्क वापरल्याने त्या माणसाचे नव्हे तर इतरांचे संरक्षण होते असा पाहणी अहवाल सांगतो. मास्क घालणाऱ्या व्यक्ती स्वतच्या चेहऱ्याला स्पर्श करतात, त्यामुळे मास्क घातला म्हणजे आपण सुरक्षित असा गैरसमज आहे. चीनने जसे लॉकडाऊन प्रभावीपणे केले तसेच चाचण्याही मोठ्या प्रमाणात केल्या. या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी माहिती गोळा करुन त्याच्या पृथकरणाच्या अहवालानुसार वेळोवेळी कोरोनावरील हल्ला बदलणे गरजेचे आहे. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्याविषयी लोकांचे भान वाढविण्याचीही गरज सौम्या स्वामीनाथन यांनी गरज व्यक्ती केली आहे. डॉ. गुलेरिया यांनी देखील अलिकडेच इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. आपल्याकडे टाळेबंदी सुरु झाली त्यावेळी 500 ते 600 रुग्ण होते. टाळेबंदीनंतर आता 40 दिवसांनी रुग्णांची संख्या आता 45 हजारांवर गेली आहे. ही बाब चिंताजनक आहे. सध्याची ही चिंता परवडली परंतु डॉ. गुलेरिया यांनी आणखी एक व्यक्त केलेली शंका फारच धोकादायक दिसते. त्यांच्या सांगण्यानुसार, कदाचित कोरोनाची दुसरी लाटही नजिकच्या काळात येऊ शकते. अशाच प्रकारची लाट शंभर वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लूच्यावेळी आली होती. व दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा जास्त लोक दगावले होते. त्यावेळी दुसऱ्या लाटेत सुमारे 70 लाख लोक दगावले होते. अशा स्थितीतही त्यावेळी लोकांना विलगीकरणात ठेवले होते. त्यामुळे लॉकडाऊन हाच एकमेव उपाय आहे असे समजू नये हे त्यांचे म्हणणे योग्यच आहे. आपण जिल्हा पातळीवर तीन प्रकार म्हणजे, हिरवा, नारिंगी व लाल असे पाडले असून केंद्र सरकार कोरोनाच्या प्रभावानुसार हे रंग ठरविते. हे काही चुकिचे नाही, परंतु आपल्याला वस्त्यांच्या पातळीवर नियोजन करावे लागणार आहे, हे डॉ. गुलेरिया यांचे म्हणणे रास्तच आहे. उदाहरणार्थ सध्या मुंबईत धारावीसह काही झोपडपट्या तसेच काही हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. तो भाग पूर्णपणे सील करुन तेथे लॉकडाऊन सक्तीचे केले पाहिजे. अशा कृतीमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे, जनतेत याविषयी जागृती करणे गरजेचे ठरले आहे. आपल्याकडे तीन दिवसांपूर्वी काही नियमात शिथीलता दिल्यावर लगेचच लोकांचे घोळके रस्त्यावर दिसू लागले. लोकांना आपण मुक्त झाल्याचा व कोरोनाचा पराभव केल्याचा भास झाला. दारु विक्री सुरु झाल्यावर वाईन शॉपच्या पुढे लांबच लांब रांगा लागल्या. त्यात व्यक्तीतील अंतराचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. यातून कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका जास्त आहे. यासंबंधी केरळ सरकारने प्रत्येकाने छत्री घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन छत्रीतील अंतर हे एक मीटर असते, त्यामुळे आपोआप दोन व्यक्तीतील अंतर कमी होते. त्यासाठी त्यांनी सवलतीच्या दरात छत्र्या दिल्या आहेत व त्या छत्र्या बनविण्यासाठी महिलांचे बचत गट सक्रिय करण्यात आहेत. केरळातील हे प्रयोग फार महत्वाचे ठरले आहेत. त्याचे आपण अन्य राज्यात का अनुकरण करीत नाही असा प्रश्न आहे. खरे तर केंद्राने केरळाच्या या कृतीचे स्वागत करुन सर्व राज्यात त्याचे अनुकरण करण्यास सांगितले पाहिजे. शासकीय पातळीवरुन धाकदपडशहाने लॉकडाऊन करण्यापेक्षा जनतेत जागृती करुन लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. त्यातून जनता ही बंधने पाळण्यासाठी स्वतहून पुढे येऊ शकतील. डॉ.गुलेरिया व डॉ. स्वामीनाथन यांनी केलेली ही टिपणे फार महत्वाची आहेत. अशा प्रकारे तज्ज्ञांचा सल्ला एकून आपल्या कारभारात बदल करण्याचे केंद्र सरकारने ठरविले पाहिजे, याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Related Posts

0 Response to "तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel