कोरोना पसरतोय
कोरोना पसरतोय
राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळावा यासाठी सोमवारपासून काही निर्बंध शिथील झाले आहेत. परंतु त्यामुळे आता कोरोना आपल्यापासून पळाला व संपुष्टात येईल असे काही चित्र सध्या तरी नाही. रायगड जिल्ह्यात आजवर बहुतांशी पनवेल व उरण या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात होते. त्याखालोखाल किरकोळ सख्येने काही रुग्ण श्रीवर्धन, पोलादपूर येथे आढळले होते. मात्र तेथील कोरोना रुग्ण वाढल्याचे चित्र नाही. आता अलिबागमध्ये कोरनाचे रुग्ण आढळल्याने कोरोना रायगड जिल्ह्यात पसरत चालला आहे असेच दिसते. पनवेल, उरण हे रायगड जिल्ह्यात असले तरीही ते मुंबईशी जोडले गेलेले असल्यामुळे तेथे कोरोनाची लागण होणे आपण समजू शकतो. तसेच पनवेल हे आता महानगर झालेले असल्यामुळे तेथे कोरोना पसरण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याच्या शेजारच्या उरणमध्येही याहून काही वेगळी स्थिती नाही. मात्र मुंबईशी समुद्रमार्गाने जवळ असलेला अलिबाग शेवटपर्यंत कोरोनामुक्त राहिल असे वाटले होते, परंतु ते आता खोटे ठरले आहे. अलिबागला कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता पर्यटकांची ही पंढरी आता कोरोनाच्या नकाशावर आली आहे. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन अलिबाग तालुक्यात कोरोनाला अटकाव करता येईल. नवी मुंबईतही कोरोनाचा धोका वाढलेला आहे, अशा स्थितीत एकीकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा शेजारी असलेल्या जिल्ह्यातून कोरोना रायगडमध्ये येणे स्वाभाविकच होते. गेले 40 दिवस ल़ॉकडाऊन असल्यामुळे कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परंतु त्याचा प्रसार धीमेगतीने का होईना होतोय हा कल देखील धोकादायक आहे. मुंबईत तर अनेक भागात धोकादायक स्थिती आहे. वरळी, मलबार हिल, दादर, पश्चिम उपनगर, धारावी या सर्व भागात कोरोनाने आता स्वैर संचार सुरु केला आहे. मुंबईतील ही स्थीती धोकादायक वाटत असली तरी नियंत्रणात देखील आहे. सोमवारपासून सरकारने नियंत्रणे सैल केल्यामुळे लोक सैरावैरा धावू लागले आहेत. प्रामुख्याने तळीरामांसाठी अच्छे दिन सुरु झाल्याने ते खूष आहेत व सरकारही महसुल मिळू लागल्याने आनंदी आहे. नाही तरी केंद्राने आर्थिक कोंडी राज्य सरकारची केली आहे, त्यामुळे महसूल मिळविण्यासाठी सरकारला तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. त्यात दारुवरील महसूलाचा वाटा मोठा असतो. त्यामुळे सरकारी तिजोरीत आता आवक सुरु झाली आहे. दिल्ली सरकारने तर दारुवरील कर 70 टक्क्याने वाढविला आहे. महाराष्ट्र सरकारला देखील अशीच काही युक्ती लढवावी लागणार आहे. कालच्या दिवशी चॅनेल्सवरती वाईन शॉप्ससमोरील लांबच लांब रांगा दाखविण्यात दिवस गेला. त्याअगोदर पुष्पवृष्टी दाखवून मोदी सरकारचा उदोउदो करण्यात पूर्ण दिवस साजरा केला. दारु पिणाऱ्यांचे समर्थन करण्याचा भाग नाही, परंतु तळीरामांवर बरीच टिका या निमित्ताने झाली. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, दारु पिणारे हे असभ्य असतात व दारु न पिणारे लोक चांगले असे चित्र रंगविणे चुकीचे आहे. सभ्य व असभ्यतेसाठी दारु पिणे हा निकष ठरु नये. दारु पिणे किंवा न पिणे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे, मात्र दारुमुळे ज्यावेळी समाजघातक कृत्ये होतात, घरे उध्दवस्थ होतात त्यावेळी तो सामाजिक प्रश्न निर्माण होतो. लॉकडाऊनमुळे बऱ्याच मद्यपींना अस्वस्थ वाटू लागले होते, आता त्यांना हायसे वाटेलही मात्र दारु विक्रीस खुली केल्यामुळे नवीन प्रश्न उद्दभवण्याची स्थिती आहे. सध्याच्या कठीण काळात पोलिसांवरील जबाबदारी आता आणखीन वाढली आहे. कोरोनावर मात करायची असेल तर व्यक्तींमध्ये अंतर, स्वच्छता पाळणे हाच सध्या आपल्यापुढे उपाय आहे. कारण अद्याप यावरील औषध, लस काही आलेली नाही. किमान आठ महिने तरी औषध येण्याची शक्यता दिसत नाही. तोपर्यंत आपल्याला कोरोनाचा वाढणारा प्रसार रोखायचा आहे. ग्रामीण भागात हा प्रसार रोखणे एकवेळ शक्य आहे, परंतु गर्दीची ठिकाणे पावलोपवली असणाऱ्या महानगरात काय करायचे, असा सवाल आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होईल हे नाकारता येणार नाही. राज्याची आर्थिक राजधानी व देशाची अर्थकारणातील जीवनवाहिनी असलेली मुंबई फार काळ बंदही ठेवता येत नाही अशा कोंडीत राज्य सरकार अडकले आहे. केंद्र सरकार एकीकडे मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी टपले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील कोरोना वाढत चालला आहे. अनेक उद्योग मुंबईतून, राज्यातून गेल्या काही वर्षात हद्दपार झाले. याचा राज्याच्या अर्थकारणावर परिणाम झाला. आता कोरोना हद्दपार झाल्यावर राज्य व केंद्र सरकार संधीचे सोने करुन दाखविण्याचे धारिष्ट्य दाखविल का, असा प्रश्न आहे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन व्यापक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे. चीनने कोरोना संपुष्टात आल्यावर लगेचच जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आपण तशा प्रकारे सध्या कोरोनाच्या काळात व कोरोनानंतर काय करायचे याची ब्ल्यू प्रिंट का तयार करीत नाही? आपल्यातून कोरोना पुढील वर्षभर तरी जाणार नाही अशी खूणगाठ बांधून आपल्याला आता पुढील वाटचाल करावयाची आहे. मात्र त्यासाठी संकूचित राजकारण बाजूला ठेवले पाहिजे व देश म्हणून विचार केला पाहिजे.


0 Response to "कोरोना पसरतोय"
टिप्पणी पोस्ट करा