
तिसरा लॉकडाऊन संपायला आता जेमतेम आठ दिवस राहिले आहेत. आता पुढे काय होणार असा सवाल जनतेच्या मनात आहे. सरकार हा लॉकडाऊन वाढविणार की तो अंशत उठविणार की पूर्णपणे उठवू पुन्हा सर्वांना कामाला लागायला सांगणार याविषयी सरकार काहीच बोलत नाही. पंतप्रधान नेहमी आयत्या वेळी घोषणा करतात त्यामुळे त्यांच्या पोटात नेमके काय आहे हे सांगणे कठीण आहे. अनेक उद्योजकांना हा लॉकडाऊन उठवावा असे वाटते. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे त्यांचे मते आजमाविली आहेत, परंतु कोणताच निर्ण दिलेला नाही. अशा स्थितीत जनतेत अनिश्चततेचे वातावरण आहे. जनता घरात बसून कंटाळली आहे तर दुसरीकडे ज्यांना घरे नाहीत असे विस्थापित कष्टकरी घरी जाण्यासाठी मैलोनमैल चालत आहेत. ज्येष्ठ उद्योगपती नारायणमूर्ती यांनी त्याविषयी आपली मते स्पष्ट केली आहेत. आता लॉकडाऊन उठविला नाही तर त्याचे दुसरेच परिणाम भोगावे लागतील असे त्यांचे मत आहे. परंतु दुसरीकडे कोरोना तर झपाट्याने वाढत चालला आहे. आता पुढील काही दिवस कोरोनाचे पेशन्ट झपाट्याने वाढतील व त्यानंतर घसरण सुरु होईल असे काही डॉक्टरांचे मत आहे. गेली 47 दिवसात आपण लॉकडाऊनमध्ये कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले आहे हे काही वास्तव नाकारता येणार नाही परंतु त्याचा प्रसार काही रोखता आलेला नाही. उलट त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली यासारख्या अनेक महानगरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या महानगरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी येत्या चार दिवसात विशेष धोरण आखावे लागणार आहे. येथील जनजीवन पुन्हा सुरु केल्यास तेथे कोरोनाचा प्रसार वाढेल यात काही शंका नाही. त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्याची अनेक शहरातील नाले सफाईपासूनची अन्य कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरे पाण्याखाली जातील. पावसाळा सुरु झाल्यावर हवमानातील बदलामुळे होणारे विविध रोग येणार आहेत. त्याच्याशी मुकाबला करायला आपल्याकडील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का, हा सवाल आहे. आपण सध्या कोरोनावर लक्ष केंद्रीत केलेले आहे तसेच त्यासाठी अनेक ठिकाणी सरकारने जागा मिळवून तेथे कोरोनाग्रस्तांची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर अन्य गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी सरकारने अन्य रोगांसाठी रुग्णालये सरकारने सुरु ठेवण्यास सांगितली आहेत, परंतु तेथील अनेक प्रश्न आहेत. काही ठिकाणी अशा रुग्णालयात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालये क्वॉरंटाईन करण्याची पाळी आली आहे. आपल्याकडील शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे लंगडी असताना त्यात जान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यात फारसे सरकारला यश येईल असे काही दिसत नाही. एकीकडे तोंडावर आलेला पावसाळा, ठप्प झालेली अर्थव्यवस्था नव्याने करभरणा होत नसल्याने तसेच केंद्राने राज्यांचे कर परतावे रोखून धरल्याने झालेली आर्थिक कोंडी अशा स्थितीत राज्याचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने विकास कामांना कात्री लावण्यास सुरुवात करणे हे ओघाने आलेच. त्यातच अर्थव्यवस्था सध्या शून्यावर आली आहे. विकास दर गोठला आहे. नारायणमूर्ती सांगतात त्यानुसार जर लॉकडाऊन उठविले आणि लोकांचा मुक्तसंचार सुरु झाला तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढणार हे ओघाने आलेच. रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते काही मर्यादीत स्वरुपात का होईना आपल्याकडे अर्थकारणाला गती देण्याची गरज आहे. कोरोना आपल्या सोबत दीर्घकाळ राहाणार आहे हे गृहीत धरुन आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे. मात्र शिथीलता देताना कोरोनाचा प्रसार होणार नाही ते देखील पहावे लागणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लॉकडाऊन मधून बाहेर पडण्यासाठी योजना तयार केल्याचे सांगितले असले तरी ही योजना नेमकी काय आहे ते सांगितलेले नाही. कदाचित मोदींना ती जाहीर करावयाची असेल. आता त्यांच्या जादुई पोताडीतून ही योजना नेमकी काय आहे ते कधी बाहेर पडणार ते समजावयास काही मार्ग नाही. एकीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री अशी घोषणा करतात तर विविध राज्य सरकार आपल्याकडील लॉकडाऊन अधीक घट्ट करण्याशिवाय काही पर्याय नसल्याचे बोलतात. त्यामुळे राज्य व केंद्र यात समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसते. केंद्र सरकारच्या धोरणात सातत्य नसल्याचे अनेकदा आढळले आहे. राज्यांना त्यांच्या विभागात असलेली स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे राज्यांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची मूभा देणे आवश्यक ठरते. चार दिवसांपूर्वी दारु तसेच काही अन्य खरेदीत सूट दिल्यावर लोकांनी दुकानात ज्या प्रकारे गर्दी केली ते पाहता आपल्याकडे लोकांना सुट दिल्यास त्याचे गैरफायदाच घेतला जातो, असे दिसते. प्रामुख्याने महानगरात कोरोनाचा प्रसार ज्या झपाट्याने होत आहे ते फारच गंभीर वाटते. आपल्याकडे ग्रामीण भागात सूट दिल्यास त्याचा फारसा उपयोग होणार नाही, कारण आपले ग्रामीण भाग काही स्वयंपूर्ण नाहीत. प्रत्येक बाबतीत ते शहराशी निगडीत आहेत, त्यांची नोकरीपासून ते खरेदीपर्यंतचे सर्व व्यवहार शहरातूनच होतात. त्यामुळे अनेक अडचणी आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला असताना सरकारला आता ठोस भूमिका घेऊन नेमकी पुढील वाटचाल कशी करावयाची याचे धोरण आखले पहिजे.
0 Response to "पुढे काय?"
टिप्पणी पोस्ट करा