-->
संपादकीय पान--२६ऑक्टोबर २०१३च्या अंकासाठी चिंतन--
------------------------------
टाटांची हवाई भरारी 
---------------------
देशातील आघाडीचा टाटा उद्योगसमूहाने सिंगापूर एअरलाईन्सशी भागिदारीत हवाई सेवा सुरु करण्याच्या प्रस्तावाला विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाने मंजुरी दिल्याने तब्बल ६० वर्षांच्या अवधीनंतर पुन्हा एकदा टाटा या क्षेत्रात उतरणार आहेत. यापूर्वी त्यांनी एअर एशिया या कंपनीच्या सहकार्याने लो-कॉस्ट हवाई सेवा सुरु करण्याचा सरकारला दिलेला प्रस्तावही मंजूर झालेला आहे. त्यामुळे टाटा समूह आता लो-कॉस्ट व परिपूर्ण हवाई सेवा अशा दोन्ही क्षेत्रात दोन स्वतंत्र कंपन्या घेऊन उतरत आहे. महत्वाचे म्हणजे सध्या इंडिगो ही कंपनी वगळता सर्वच हवाई कंपन्यांना जबरदस्त तोटा सहन करावा लागलेल्या वातावरणात टाटांचा प्रवेश होत आहे.
आपल्याकडे हवाई क्षेत्र खासगी उद्योगांना खुले झाल्याला आता एक दशकाहून जास्त काळ लोटला आहे. त्यापूर्वी आपल्याकडे सरकारी हवाई कंपनी इंडियन एअर लाईन्स व एअर इंडिया यांची मक्तेदारी होती. परंतु खासगी कंपन्यांना हे क्षेत्र खुले केल्याावर त्यांची मक्तेदारी मोडीत निघाली आणि पावसाळ्यात उगवणार्‍या कुत्र्याच्या छत्रीसारख्या अनेक विमान कंपन्या निघाल्या. त्यातील बहुतांशी कंपन्यांना आपला गाशा तरी गुंडाळावा लागला किंवा अन्य कंपन्यांत विलिन व्हावे लागले. जेट एअरवेज ही मात्र कंपनी स्थापनेपासून आजपर्यंत तग धरुन आहे. अर्थात त्यांना गेल्या तीन महिन्यांत तब्बल ९९० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सरकारी कंपनी एअर इंडियाचा संचित तोटा तर पाच हजार कोटींच्यावर पोहोचला आहे. केवळ ही कंपनी सरकारी असल्यामुळेच एवढा तोटा सहन करुनही टिकली आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला दोन हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आणि ही विमानसेवा ग्राऊंडेड झाली. आता ही कंपनीही विदेशी सहकारी कंपनीच्या शोधात आहे.
टाटांनी मात्र या क्षेत्रात प्रवेश केल्याने देशातील हवाई क्षेत्राचे चित्र पालटू शकते. या क्षेत्रातील जगातील नामवंत कंपनी सिंगापूर एअरलाईन्सशी त्यांनी सहकार्य करार केल्याने त्यांना जोडीदार चांगला मिळाला आहे. त्यांच्या व्यवसायिक कौशल्याचा टाटांना फायदा होईल. मुळातच विमान सेवा या कंपन्या नेहमीत तेजी-मंदीच्या कालखंडावर सतत हिंदोळे खात असतात. मंदीत सुरु झालेल्या हवाई सेवांना याचा नेहमीच फायदा मिळतो. एअर एशिया ही अनिवासी भारतीयाने अशाच प्रकारे अमेरिकेत अतिरेक्यांनी हल्ला केल्यावर आलेल्या मंदीत सुरु केली होती. आता देखील उद्योगात मंदीचे वातावरण असताना तसेच अनेक विमान कंपन्या तोट्यात असताना टाटांच्या या दोन विमान कंपन्या कार्यान्वित होत आहेत. खरे तर टाटांचे हे एक मोठे रिस्क आहे. परंतु उद्योगातला माणूस हा रिस्क उचलतोच आणि त्याच जीवावर तो आपला उद्योग वाढवितो. गेल्या काही दिवसात आपल्याकडे इंधनांचे दर वाढल्याने तसेच मंदीमुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने अनेक विमान कंपन्यांना आपल्या खर्चात कपात करावी लागली आहे. ही कपात करुनही या कंपन्यांना आपला तोटा काही कमी करता आलेला नाही. अशा वेळी टाटांनी नवीन विमान सेवा सुरु करणे हे एक मोठे धाडसच आहे. सरकारने आता या क्षेत्रात ४९ टक्के विदेशी भांडवल गुंतविण्यास परवानगी दिली आहे. यानुसारच ही गुंतवणूक होत आहे. मात्र करोडो रुपयांता तोटा असलेल्या सरकारी विमान कंपनीत अशी विदेशी गुंतवणूक सरकार स्वीकारणार किंवा नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. सरकारने या कंपन्यांचे खासगीकरण करु नये. मात्र या कंपन्यांत ४९ टक्के विदेशी गुंतवणूक घेऊन या कंपन्या स्वबळावर कशा उभ्या राहातील हे तरी पहावे.
----------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel