-->
कोरोनाचा वाढता विळखा

कोरोनाचा वाढता विळखा

कोरोनाचा वाढता विळखा रायगड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा अखेर वाढत चालला असून प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. पनवेल व उरण या दोन तालुक्यात कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्याखालोखाल महाड शहरात जास्त रुग्ण आहेत. महाड शहरातील 12 हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यात गेल्या आठवड्यात आढळलेले दोन रुग्ण वगळता अजूनतरी सुदैवाने या संख्येत भर पडलेली नाही. श्रीवर्धन तालुक्यात काही रुग्ण आढळले होते, मात्र त्यात फारशी वाढ झाली नाही. रायगडातील अन्य तालुके कोरोनामुक्तच आहेत. मात्र मुंबईपासून जवळ असलेल्या तालुक्यात जास्त धोका वाढत चालला आहे व त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गेल्या दोन दिवसात उरण व परिसरातील भागातील रुग्ण संख्या अचानक वाढत गेली आहे. उरणमध्ये एकूण रुग्णसंख्या 56 वर गेली असून पनवेल या महानगरात रुग्णसंख्या अजूनतरी आटोक्यात आले. मात्र शहरातील दाट वस्ती पाहता ही रुग्णसंख्या वाढत जाण्याचा धोका नाकारता येत नाही. जिल्ह्यात आजवर 300च्या वर रुग्ण झाले असून त्यात 10 मृत्यू झाले आहेत. तर 103 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी असली तरी सर्वात धोका रुग्ण वाढत चालले आहेत त्यात आहे. सुरुवातील जिल्हा रेड झोनमध्ये होता, मात्र रुग्णसंख्या मर्यादीत राहिल्याने त्याचे रुपांतर अँरेंजमध्य़े करण्यात आले. मात्र तसे केल्याने रहदारी वाढली व लोकांमधील शिस्त भंग पावल्याचे दिसते. आता अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये जाण्याचा धोका आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा जिल्ह्यातील सुरु झालेल्या कामांवर अनेक मर्यादा येणार आहेत. तसे होऊ नये यासाठी जनतेने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे हे प्रत्येकाच्या हातात आहे, प्रशासन फक्त आपल्यावर जबरदस्तीने निर्बँध लादू शकते, परंतु अशी जबरदस्ती करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागल्यास ही साथ आटोक्यात ठेवली जाऊ शकते. रायगड जिल्हा हा मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्या सीमेवर असून हे विभाग सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे येथून रायगड जिल्ह्यात रोगाचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका आहे. रायगड जिल्ह्याचा एक पट्टा समुद्रकिनारपट्टी असल्याने मांडवा-मुरुड-श्रीवर्धन पर्यंत पर्यटन व्यवसाय जोरात असतो. मात्र तेथील पर्यटन उद्योजकांनी धोका ओळखून वेळीच आपले व्यवसाय बंद केले. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी त्यांनी दाखविलेल्या सांजस्यपणामुळे जिल्ह्यातील कोरोनाची लागण या पट्यात थोपविण्यात यश आले. मुंबई, पुण्याचे लाखो पर्यटक या काळात येत असतात. मात्र कोरोनाचा जागतिक पातळीवरील असलेला धोका वेळीच ओळखून हा पर्यटन व्यवसाय बंद करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम या किनारपट्टीच्या भागात आता दिसत आहेत. जिल्ह्यात जसा पर्यटन उद्योग आहे तसे औद्योगिक पट्टा देखील मोठ्या प्रमाणात आहे. या औद्योगिक पट्यातील बहुतांशी कामे ही मुंबईशी जोडलेली आहेत. त्यामुळे येथे येणारा कच्चा माल, माल तयार होऊन बाहेर जाणे, कामगारांचे दळणवळण हे सर्व मुंबईशी निगडीत आहे. त्यामुळे येथे देखील प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे 57 हजार उद्योगांना परवाने दिले आहेत व 25 हजारहून जास्त उद्योग सुरु झाल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र यातील रायगड जिल्ह्यातील किती उद्योग किती आहेत त्याची आकडेवारी काही उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठी कंपनी जे.एस.डब्ल्यू. स्टील ही कंपनी अत्यावश्यक सेवेतील असल्यामुळे ती काही बंद झालेली नाही. मर्यादीत कामगारांना कामावर ठेऊन ती सुरुच ठेवण्यात आली आहे. या कंपनीत मुंबई, पनवेल येथून येणारे कामगार थांबविण्यात आले आहेत. त्यासंबंधी जनतेने वेळीच जाग्रुकता दाखवून कंपनीत येथून येणारे कामगार थांबविण्यात आले. त्याचबरोबर अशा अनेक औषध, रसायन निर्मिती तसेच अन्य अत्यावश्यक सेवेतील कंपन्या रायगडात सुरु आहेत. अर्थात त्या बंद करुन चालणारही नाहीत. मात्र त्यांनी पुरेशी खबरदारी घेतलेली दिसते. अन्यथा या भागात कोरोनाचा प्रसार वाढला असता. जिल्ह्यात अनेक भागातील जत्रा, देवांचे उत्सव लोकांनी सध्यपरिस्थितीचे भान राखून बंद केले आहेत. आता दरवर्षी सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा केला जातो. हजारो शिवप्रेमी येथे या सोहळ्यासाठी आवर्जुन दरवर्षी उपस्थित असतात. परंतु यंदा काही मोजकीच मंडळी साजरा करणार असून त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी गडावर येऊ नये असे खासदार संभाजीराजे यांनी आवाहन केले आहे ते योग्यच आहे. त्यामुळे शिवप्रेमींचा हिरमोड होणार असला तरी सध्याच्या परिस्थितीत त्याची आवश्यकताच आहे. औद्योगिकीकरण, पर्यटन व आता शिल्लक राहिलेली शेती असा अनोखा संगम रायगड जिल्ह्यात आहे. जे.एन.पी.टी. हे मोठे बंदर असल्याने आयात-निर्यातीचे एक केंद्र आहे. भविष्यात येथे आन्तरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे. मुंबईला लागून जिल्हा असल्याने तसेच येथील व्यापारी, उद्योजकीय घडामोडींमुळे रायगडाकडे लक्ष सर्वांचे लागलेले असते. रायगडाचे हे वैविध्यीकरण आपल्याला टिकवायचे आहे. हे टिकविण्यासाठी आपल्याला कोरोनापासून जिल्हा मुक्त करावयाचा आहे. सध्या कोरोना वाढत असला तरी त्याला आळा घालण्याचे आपल्याच हातात आहे. पुन्हा जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही हे पाहिले पाहिजे.

Related Posts

0 Response to "कोरोनाचा वाढता विळखा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel