-->
परखड रघुराम राजन / थंडीचे आगमन

परखड रघुराम राजन / थंडीचे आगमन

मंगळवार दि. 10 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
परखड रघुराम राजन
भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपकारक आहे, असे परखड मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखात व्यक्त केले आहे. या लेखात भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची कारणे विशद करताना राजन यांनी म्हटले आहे की, सध्याच्या सरकारमध्ये निर्णय, कल्पना, योजना या सर्वच पातळ्यांवर केंद्रीकरण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयातील काही लोक सर्व निर्णय घेतात. सत्ताधारी पक्षाचा राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांचे निर्णय उपयुक्त ठरत असतीलही, पण यात आर्थिक सुधारणा बाजूला ठेवल्या गेल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर कशी काम करते यापेक्षा राज्यांच्या पातळीवर कशी काम करते याचे ज्ञान संबंधित तज्ज्ञ व्यक्तींना नाही. त्यामुळे त्यांनी आखलेला कार्यक्रम अर्थव्यवस्थेसाठी सुसंवादी नाही. याआधीची सरकारे अनेक आघाड्यांची होती हे खरे असले तरी त्यांनी आर्थिक उदारीकरणाचा मार्ग सोडलेला नव्हता. सध्याच्या सरकारमध्ये सगळे अधिकार हे पंतप्रधान कार्यालयातील व्यक्तींकडे एकवटले आहेत. मंत्र्यांना अधिकार नाहीत, त्यामुळे अर्थव्यवस्थेस लाभदायी धोरण राबवण्याची दूरदृष्टी सरकारला दाखवता आली नाही. किमान सरकार, कमाल प्रशासन अशी घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आले होते. पण सरकारने त्याउलट पद्धतीने काम केले, सगळ्या गोष्टी सरकारच ठरवू लागले. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेत समस्या आहे हे आधी मान्य केले पाहिजे, तरच त्यावर उपाय करता येतील, असे राजन यांनी मत व्यक्त केले आहे. रघुराम राजन हे जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशाच्या सध्य स्थितीवर केलेले भाष्य म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजण घालण्याचा प्रकार आहे. राजन यांचे मत सरकारने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे तसे न केल्यास भविष्यात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील यात काही शंका नाही. परंतु सरकार आपल्याकडील दोष समजावून घेऊन त्यात सुधारणा करुन देशाच्या विकासाच्या दिशेने काम करण्याची शक्यता दिसत नाही. आज देश मंदीच्या अवस्थेत असून ग्रामीण भागांत आर्थिक दुरवस्था आहे. स्थावर मालमत्ता, पायाभूत क्षेत्र अडचणीत असून बँकेतर वित्त संस्था अडचणीत आहेत. अनुत्पादक कर्जाच्या समस्येने आता बँकांनी कर्ज देताना आखडता हात घेतला आहे. सध्याच्या स्थितीवर उपाय योजले जाऊ शकतात. मात्र सरकारची तसे करण्याची मानसिकता पाहिजे. भांडवली उदारीकरण, जमीन व कामगार सुधारणा, गुंतवणूकवाढ हे उपाय अवलंबण्याची गरज आहे. भारताने मुक्त व्यापार करारात सहभागी होऊन स्पर्धेला उत्तेजन देण्याची गरज आहे. तसेच देशांतर्गत क्षमता व गुणवत्ता वाढवली पाहिजे. सरकारने हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर देशाला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचे काम करीत आहे. सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठे उभी केली पाहिजेत. यामुळे लहान मुलांना चांगले शिक्षण देत त्यांना सहिष्णू आणि इतरांप्रती आदर व्यक्त करणारे म्हणून घडवण्यास मदत मिळेल. तसेच उद्याच्या स्पर्धात्मक जगात ते स्वत:चा टिकाव धरु शकतील. परंतु मोदी सरकारचे भरकटल्यासारखे काम सुरु आहे. त्यावर नेमके बोट राजन यांनी ठेवले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आपल्या सध्या होत असलेल्या चुका हेरुन त्यात सुधारणा केल्यास देशाच्या अर्थकारणाला वेग येऊ शकेल. रघुराम राजन यांनी हे खडे बोल सरकारला सुनावले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्याकडे सरकार लक्ष पुरवेल व आपल्यात काही बदल करेल अशी अपेक्षा ठेऊ या.
थंडीचे आगमन
ढगाळ हवामान दूर झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून ही वाढ नजिकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत रविवारी 29.4 अंश सेल्सिअस कमाल व 14.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद नागपूर येथे (11.4 अंश सेल्सिअस) झाली. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रावर एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले होते. परिणामी राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला. तसेच हवेतील आर्द्रता वाढून तापमानात वाढ झाली होती. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला होता. आता मात्र, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात घट रविवारी नोंदली गेली. महाबळेश्‍वर, मालेगाव, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अकोला या शहरातील पारा उतरु लागला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचे आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी थंडी लांबली असली तरी एकदा का पारा उतरु लागला की झपाट्याने उतरेल, असा अंदाज आहे. एकूणच थंडीचे आगमन सुखकारक ठरणार आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "परखड रघुराम राजन / थंडीचे आगमन "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel