
एक नवीन स्वप्न!
एक नवीन स्वप्न!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॉकडॉऊन सुरु झाल्यापासूनचे पाचचे भाषण (खरे तर ते किर्तन) मंगळवारी रात्री झाले. पंतप्रधानांनी एकीकडे आत्मनिर्धरतेचे धडे लोकांना शिकवले तर दुसरीकडे 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. लोकांना जर आत्मनिर्भय करायवयाचे असेल तर त्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज नाही. वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज देऊन आत्मनिर्भय करायचे असेल तर ती आत्मनिर्भयता कसली, असा प्रश्न उपस्थित होतो. आत्मनिर्भयतेने वाटचाल करणारा माणूस कोणत्याही सवलती, मदत या पासून अलिप्त राहून स्वतच्या पायावर, वाटचाल करतो. त्याला कोणत्याही सरकारी कुबड्याची मदत नको असते. आपल्याकडे आत्मनिर्भयतेने आपल्या आयुष्याची वाटचाल केलेले काही कमी लोक आहेत का? ते मोदींनी सांगण्याची काय गरज? त्यामुळेच पंतप्रधानांचे भाषण हे एक देशाला दाखविलेले एक मोठे दिवा स्वप्न आहे. यापूर्वी मोदींनी अशी अनेक स्वप्ने देशाला दाखविली. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात टाकणे, विदेशातील काळा पैसा भारतात चुटकीसरशी आणणे, अच्छे दिन, मेक इन इंडिया, 56 इंचाची छाती, पाकिस्तान संपवून टाकू, पेट्रोल-डिझेल स्वस्त करु, रुपया डॉलरच्या तुलनेत 40 रुपयांवर नेऊ अशी अनेक स्वप्ने दाखविली गेली. परंतु त्यातील एकही प्रत्यक्षात उतरले गेले नाही. अर्थात ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरणारही नव्हती. कारण अशक्य गोष्टींची स्वप्ने दाखवून त्यात जनतेला गुंगवून टाकणे यात आपल्या पंतप्रधानांची ख्याती आहे. मोदींच्या या स्वप्नातच देशातील जनता रममाण होते आणि कालांतराने त्याला झोपेतून उठून लक्षात येईपर्यंत विलंब झालेला असतो. मोदींचे नेमके तसेच आहे. मोदींनी दिलेली स्वप्ने प्रत्यक्षात झाली का हे विचारायला कुणी जात नाही. कारण ते कोणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. पत्रकार परिषदही त्यांनी गेल्या सहा वर्षात एकही न घेतल्याने त्यांना जाब विचारायला कोणी नाही. ज्यांना स्वप्ने विकली तो काही आता या पाहरेकऱ्याकडे दारात जाऊ शकत नाही. अशा स्थितीत नवीन स्वप्ने दाखविण्याचा खेळ सुरु आहे. सध्या जगाला कोरोनाने ग्रासले आहे. आपल्याकडे कोरोनावर उपाय सुरु करायला मुळातच विलंब केला. आधी ट्रम्प यांचे जंगी स्वागत, त्यानंतर मध्यप्रदेशातील कॉँग्रेसचे सरकार पाडणे यात बराच वेळ निघून गेला. कोरोना वाढण्याचा धोका दिसू लागल्यावर लगेचच लॉकडाऊन सुरु झाले. आता जे वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे त्यात नेमक्या काय तरतुदी आहेत ते काही सांगण्यात आलेले नाही. ती जबाबदारी अर्थमंत्र्यांवर सोपविली आहे. मग आज घोषणा करुन काय मिळविले? त्यातून नेमका कोणाला फायदा मिळणार आहे ते सर्व गुलदस्त्याच ठेवण्यात आले आहे. आजवर मोदींनी जी गेल्या सहा वर्षात देशातील 130 कोटी जनतेला स्वप्ने दाखविली त्याच मालिकेतील हे एक नवीन स्वप्न ठरावे. लॉकडाऊनच्या काळात लाखोंच्या संख्येने भुकेकंगाल कष्टकरी जनता भर उनातून चालत शहरातून आपल्या गावी निघाली आहे. त्यांचे भविष्य अंधकारमय आहे. मात्र ते आत्मनिर्भयपणे आपली वाटचाल करीत आहेत. ही आत्मनिर्भयता त्यांच्यात मोदींनी सांगितल्यावर आलेली नाही, ती त्यांच्यात उपजतच आहे. स्थलांतरीतांच्या या हालाखीची देशाच्या पंतप्रधानांनी चकार शब्द आपल्या किर्तनात काढू नये याचे आश्चर्य वाटते. मोदींना या जनतेच्या हालअपेष्टंची, त्यांच्या जिवन मरणाच्या लढ्याची कल्पनाच नाही. या कष्टकरी जनतेला आत्मनिर्भरतेचे डोस पाजणाऱ्या या राज्यकर्त्यांची किव करावीशी वाटते. आज मोदींनी आत्मनिर्भारतेचे देशाला जे स्वप्न दाखविले आहे तो आत्मनिर्भारपणा आपल्याकडे आजवर नसता तर आपण गेल्या 70 वर्षात एवढी वाटचाल करुच शकलो नसतो. आपण मंगळावर केलेली वाटचाल, आजवर आपले व जगाचे सोडलेले उपग्रह व त्यातून जनतेला मिळालेले लाभ, वादळाची-पूराची पूर्वसुचना हे आत्मनिर्भयतेतूनच आपण कमावले आहे. विज्ञान, संशोधन, उद्योग, औद्योगिक उत्पादन, शेती या तसेच विविध क्षेत्रात जी आपण भरारी मारली आहे ती आत्मनिर्भयता नव्हे का? आपल्या आय.टी. उद्योगातील कंपन्यांनी जगात आपले एक मानाचे स्थान निर्माण केले आहे, ते आत्मनिर्भयतेशिवाय शक्य झाले का? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. त्यामुळे मोदीनी आपल्या देशातील लोकांना आत्मनिर्भयेतेचे धडे देणे म्हणजे आजवर आपण केलेल्या यशस्वी वाटचालीची थट्टा करण्याचा प्रकार आहे. आता पंतप्रधांनानी आपल्या देशातील उत्पादीत लोकल वस्तू वापारण्याचे आवाहान केले आहे, परंतु आपल्या वस्तू जगात जातात तेथील जनतेने आपल्या वस्तूंवर अशा प्रकारे बहिष्कार घातला तर आपली निर्यात होईल का? चीन जर जगात स्वस्त वस्तू देऊन बाजारपेठ काबीज करीत असेल तर त्यापेक्षा स्वस्तात ती वस्तू आपण देऊन त्यांच्यावर मात करणे हे त्यावरील उत्तर ठरु शकते. आता कोणत्याही मालाचा दर्जा व किंमत महत्वाची ठरणार आहे. मग ते उत्पादन लोकल असो किंवा ग्लोबल. जनतेला त्या उत्कृष्ठ उत्पादनाची किंमत वाजवी पाहिजे आहे. अर्थात हा जगाचा फंडा आहे. आपल्या लोकल उत्पादकांनी हे सूत्र मान्य केले तर ते यशस्वी होतील यात काही शंका नाही. अनेक जण याच विश्वासावर आजवर यशस्वी झाले देखील आहेत. अनेक भारतीय उत्पादकांनी बहुराष्ट्रीय उत्पादनांशी स्पर्धा केली आहे, ती याच जोरावर. त्यामुळे मोदी यांच्या या भाषणात नवीन असे काहीच नाही. त्यांनी भाषणकलेच्या जोरावर नवीन स्वप्न दाखविले आहे एवढेच.
0 Response to "एक नवीन स्वप्न!"
टिप्पणी पोस्ट करा