-->
स्वागतार्ह निर्णय

स्वागतार्ह निर्णय

संपादकीय पान गुरुवार दि. ०३ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वागतार्ह निर्णय
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीची विश्रामगृहे महिला बचत गटांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा माथेरान येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्व पातळीवर स्वागत व्हावे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असावी. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या मुरुड तालुक्यातील मुरुड, बोर्ली तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर ही विश्रामगृहे महिला बचत गटांना देण्याचा विषय सभेत आला. त्यावेळी राजीव साबळे यांनी असा निर्णय घेताना पुढे आपली वास्तू नंतर त्यांच्याच मालकीची होते, अशी भीती असल्याने या विषयास विरोध दर्शविला. त्यावेळी माजी अध्यक्षा नीलिमा पाटील यांनी महिलादेखील चांगले रुचकर जेवण देऊन आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करु शकतात. शेवटी निर्णय घेणारे राज्य सरकार असल्याने आपण पुढील निर्णयासाठी त्यांच्याकडे पाठविण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केल्याने तो विषय बंद झाला. परंतु जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाला राज्य सरकार पाठिंबा देईल व हा ठराव संमंत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही. रायगड जिल्हा हा पर्यटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मुंबई-पुण्यापासून अतिशय जवळ असल्याने तसेच किनारपट्टी लाभल्याने येथे पर्यटकांचा चांगला ओढ असतो. मांढवा जेट्टीपासून ते अलिबाग, रेवदंडा, मुरुड पर्यंत हे पर्यटक जात असतात. यातून अनेकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे. येथील अनेक रिसॉर्टमध्ये महिला बचत गट जेवण, खाणे पुरवितात. त्यामुळे अनेक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे. तसेच येणार्‍या पर्यटकांना चांगले घरगुती अन्न खावयास मिळते. यातून पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. याच धर्तीवर जर जिल्हा परिषदेची विश्रामगृहे अशा बचत गटांना चालविण्यास दिली तर त्यांची देखभाल तर चांगली होईलच तसेच येणार्‍या पाहुण्याचा चविष्ट खाद्याचा आस्वाद घेता येईल. त्यादृष्टीने विचार करता हा निर्णय महत्वाचा आहे. जर भविष्यात ही विश्रामगृहे कुणी बळकाविणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी योग्य त्या कायदेशीर बाबी पूर्ण करणे योग्य आहे. परंतु केवळ अशा प्रकारची भीती दाखवून या निर्णय लांबवू नये. जिल्ह्यातील अनेक खाड्या या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, त्यामुळे तेथे खासगी लोकांना बोटिंगसाठी देण्याऐवजी जिल्हा परिषदेने पर्यटनाला चालना देण्यासाठी तेथे हाऊसबोट तसेच बोटिंग सुरु केल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होइल, अशी सदस्यांनी केलेली मागणीही स्वागतार्ह आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाचे एक महत्वाचे केंद्र आहे. त्यादृष्टीने पर्यटन कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यातून जिल्ह्यातील लोकांचे उत्पन्नाचे साधन निर्माण तर होतेच शिवाय जिल्हा केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अग्रभागी येऊ शकतो. सध्या ज्या प्रामाणे गोवा व केरळने आपले नाव पर्यटनामध्ये जगात कमविले आहे त्या धर्तीवर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे पर्यटन चांगल्या प्रकारे विकसीत होऊ शकतात. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याला लागून असल्याने तेथे आता पर्यटन वाढत चालले आहे. मात्र त्यामुळे गोव्यातील पर्यटन काही कमी झालेले नाही. अशा स्थितीत रायगड जिल्ह्यात पर्यटन चांगल्या तर्‍हेने विकसीत झाल्यास चांगली प्रगती साधता येईल. या सभेत १९ कोटी रुपयांच्या पुरवणी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यात जिल्हा परिषदेच्या नावाने असलेले सात बारा उतारे तयार करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून जिल्हा परिषदेच्या नेमक्या जागा, मालमत्ता कुठे आहेत त्याचे स्वरुप निश्‍चित होऊल व त्यातून तेथे नेमका कसा विकास करता येईल त्याचा आराखडा आखता येईल. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यासाठी संघर्ष केला तो इथेच. शेतकर्‍यांचा चरीचा क्रांतीकारी संप झाला तो इथल्याच मातीतला. स्वातंत्र्यलढ्याचाही इथे क्रांतिकारी इतिहास या भूमीत घडला. राजकारण, समाजकारण, विकास या प्रश्‍नांनी येथे नेहमीच आपले घर केले. अशा या एतिहासिक भूमीतील जिल्हा परिषदेत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहेत, याचे स्वागत व्हावे.
-------------------------------------------------------------------------------------------------

0 Response to "स्वागतार्ह निर्णय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel