-->
कॉग्रेसयुक्त भाजपा!

कॉग्रेसयुक्त भाजपा!

सोमवार दि. 19 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कॉग्रेसयुक्त भाजपा!
देशातील 31 राज्यांपैकी 21 राज्यात भाजपा सत्तेत आली आहे. जिथे कॉग्रेसला सर्वाधिक जागा असूनही त्यांना सरकार स्थापन करता आले नाही व दोन जागा जिंकल्या त्या मेघालयातही आता भाजपा सत्तेत आल्याने एक नवा चमत्कार गोव्यासारखा इथे करुन दाखविला आहे. त्रिपुरातील डाव्यांची गेली 25 वर्षे सत्ता असलेली राजवट भाजपाने संपुष्टात आणली. मात्र त्यांच्या 34 पैकी 31 जण हे पूर्वाश्रमीचे कॉग्रेसजन आहेत हे वास्तव काही विसरता येणार नाही. त्यामुळे कॉग्रेसमुक्त देश करण्याची घोषणा पूर्ण करण्यास निघालेला भाजपा कॉग्रेसयुक्त झाला आहे. कर्नाटक, पंजाब, मिझोरम आणि पाँडीच्चेरी अशी अवघी चार राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर दिल्ली, बंगाल, केरळ, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा अशी अन्य सहा राज्ये बिगरकाँग्रेसी पक्षांच्या हाती आहेत. ही चार आणि सहा मिळून दहा राज्ये वगळता उर्वरित 21 राज्यांमध्ये आता भाजप सत्तेत आहे. त्यात पूर्वोत्तर राज्यातील सात राज्यांपैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीमचा अंतर्भाव आहे, तर अन्य राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात भाजप सत्तेत आहे. यातील अनेक लहान राज्यात भाजपाने धनशक्तीचा वापर करीत आपली सत्ता खेचून आणली आहे. अर्थात भाजपाने हे कॉग्रेसचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून केले आहे. कारण अशा प्रकारे सत्ता काबीज करण्याचे तंत्र कॉग्रेसनेच जन्माला घातले होते. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारे सत्ता मिळविणे, त्यासाठी विरोधकांची फाटाफूट करणे हे कॉग्रेसने केले होते. हे सर्व पाहता भाजपा हा कॉग्रेसहून काही वेगळा पक्ष आहे असा त्याच अर्थ होत नाही. महाराष्ट्रातही भाजपाचे अर्ध्याहून जास्त सदस्य हे राष्ट्रवादी व कॉग्रेसमध्ये आले आहेत. आपल्याकडे अशा प्रकारे वारे पाहून सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी रातोरात पक्ष बदलणारे नेते काही कमी संख्येने नाहीत. अशा या नेत्यांनी आता भाजपात गर्दी केली आहे. 1984 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन जागा मिळाल्या होत्या. आता 2014 साली भाजपाच्या खासदारांची संख्या 282वर पोहोचली आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तर 336 जागा प्राप्त झाल्या आहेत. एकूणच गेल्या तीस वर्षाच्या राजकारणात अशा प्रकारेे एकाच पक्षाला बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 1984 ला काँग्रेस सर्व राज्ये आणि लोकसभेत सत्तास्थानी होती आणि भाजप कुठेच उरला नव्हता. त्यावेळापासून भाजपाचा हा प्रवास मोठा कठीणच होता. परंतु नरेंद्र मोदींनी कॉग्रेसच्या विरोधात असलेले जनमत ओळखून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा केलेला सपाटा व जनतेला अनेक आश्‍वासनांची केलेली खैरात यामुळे सत्ता काबीज करता आली. एकदा का केंद्रात सत्ता आल्यावर लहान राज्यात सत्ता आणणे काही कठीण बाब नसते हे गोवा व मेघालयाने आपल्याला दाखवूनच दिले आहे. एक प्रकारे लोकशाहीची ही थट्टाच आहे. पक्षांतर बंदीचा कायद्याची पूर्ण विल्हेवाट राजकीय पक्षांनी लावली आहे. त्याचबरोबर राज्यपाल हे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या हातातील बाहुले ठेवण्याचा एक नवीन प्रघात सुरु झाला आहे. काँग्रेसच्या राजवटीतही अशा घटना घडत होत्या, त्यामुळे कॉग्रेसपेक्षा काही वेगळे करुन दाखविण्याची अपेक्षा असलेल्या भाजपाकडून तरी अशाच प्रकारे घटना घडू नयेत असे वाटत होते. परंतु भाजपाने कॉग्रेसमुक्त देश करण्याच्या नादात सर्व काही सोडून डोक्याला बांधले व भाजपा कॉग्रेसयुक्त झाला. सत्तेसाठी आलेलीही पाखरे कधी भूर्रकन उडून जातात हे कॉग्रेसला गेल्या पाच वर्षात जसे समजले तसेच भाजपालाही समजायला वेळ लागणार नाही. परंतु यातून लोकशाहीची जी थट्टा चालते ती थांबविण्याची गरज आहे. राजीव गांधींच्या काळात उद्दात हेतू डोळ्यापुढे ठेवून पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला. परंतु यातून भरपूर पळवाटा काढल्या जात आहेत. अर्थात या सर्वांच्या मागे धनशक्ती कार्यरत असते. नरेंद्र मोदी हे स्वच्छ कारभार व काळ्या पैशाला हद्दपार करण्याची भाषा करतात. परंतु असा प्रकारे पक्षांतर करण्यासाठी जो धनशक्तीचा वापर आज सत्ताधार्‍यांकडून होतो ते पाहता या काळ्या पैशाचे उगमस्थान कुठून आहे याचा छडा लावण्याची गरज आहे. भाजपाची 1984 ते 2018 ही 37 वर्षांच्या वाटचालीतली अत्यंत लक्षवेधी ठरावी अशीच आहे, यात काहीच शंका घेण्याचे कारण नाही. केवळ दोन सदस्यांतून दोनतृतीयांश राज्यांवर सत्ता स्थापण्याच्या क्षणापर्यंतची रोमहर्षक ठरावी अशी ही वाटचाल आहे. कॉग्रेसचा भ्रष्ट कारभार व त्यांच्यात आलेली शिथीलता, उजव्या शक्तींचा वाढत चाललेला प्रभाव कमी लेखल्यामुळे व त्यानुसार आपल्या धोरणात कोणता बदल केला पाहिजे यावर लक्ष न दिल्यामुळे आज कॉग्रेसवर केंद्रातून सत्ताभ्रष्ट नव्हे तर बहुतांशी राज्यातून सत्ताभ्रष्ट होण्याची पाळी आली आहे. त्रिपुरात देखील माकप पाव शतक सत्तेत आहे, त्यांची पाळेमुळे राज्यात खोलवर रुजली आहेत असे हा कॅडरबेस पक्ष सांगत होता. परंतु भाजपाचा प्रभाव वाढत चालला आहे हे माकपला कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांनी देखील आपल्या विरोधी शक्तीला कमी लेखले होते. आज भाजपाची देशात जी ताकद वाढली आहे, ती कॉग्रेसच्या बळावरच वाढली आहे. मूळ भाजपाची ताकद किती आहे ते त्यांची सत्ता गेल्यावर सांगता य्ेईल. तोपर्य्ंत कॉग्रेसयुक्त भाजपा पहायला मिळत आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "कॉग्रेसयुक्त भाजपा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel