-->
मोदीमुक्त भारत!

मोदीमुक्त भारत!

मंगळवार दि. 20 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोदीमुक्त भारत!
येत्या 14 महिन्यांनी 2019 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांची आता राजकीय पक्षांनी आपापल्या दृष्टीने आखणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आपल्याकडे ही निवडणूक मोदी विरोधक व मोदी समर्थक अशी दोन प्रकारात थेट लढत होणार हे आता स्पष्ट होत आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एक तर हिंदुत्ववादी भाजपाच्या भोवती असलेले पक्ष व त्यांच्या विरोधात असलेल्या सेक्युलर पक्ष यांची एकत्र मोट बांधली जाणार आहे. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांची जी कॉग्रेस विरोधी आक्रमक भाषा चलनी नाणे कसे चालले होते, आता मात्र ही भाषा यावेळी चालणार नाही. म्हणजेच यावेळी कॉग्रेसला शीव्या घालून किंवा त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा सांगून भाजपाला व नरेंद्र मोदींना यावेळी मते मिळणार नाहीत. कारण यावेळी त्यांच्या पाच वर्षांच्या कारभाराचा जनता हिशेब मागून त्यावर मते देणार आहे. अर्थातच त्यामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी नाही हे शंभर टक्के सत्य आहे. याची तुतारी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबई व दिल्लीत फुंकली गेली. दिल्लीत कॉग्रेसच्या महाअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर कडाडून हल्ला केला तसेच मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात तोफ डागून एका नव्या राजकारणाची नांदी केली. गेल्या चार वर्षात मोदींच्या विरोधात फार मोठे वातावरण तयार झाल्याचे आता दिसत आहे. भाजपाच्या आघाडीतील चंद्राबाबू नायडू यांनी देखील त्यांना रामराम करुन मंत्रिपदांचा त्याग केला. त्यातून मोदींच्या या बोटीतील उंदीर आत पळण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातची निवडणूक भाजपाने जेमतेम कशीबशी जिंकली. खरे तर सत्ताधार्‍यांचा तो एक प्रकारचा पराभवच होता. त्यातून भाजपा सावरतो तोच ईशान्येतील मोठा विजय त्यांच्या हाती लागला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला गगन ठेगणे वाटू लागले. परंतु या विजयाचा हर्ष त्यांना फार काळ काही टिकविता आला नाही. उत्तरप्रदेश व बिहारमधील जनतेने पोटनिवडणुकीत भाजपाला घरचा रस्ता दाखविला आणि पार त्यांची हवाच काढून घेतली. ज्या उत्तरप्रदेशात एका वर्षापूर्वी भाजपाने सत्ता ग्राहण केली होती त्या ठिकाणी त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. विशेष म्हणजे हा पराभव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणे ही बाब महत्वाची होती. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाचा अनादर करीत पुन्हा एकदा भाजपासोबत जाण्याचे ठरविले, त्या धोरणाच्या विरोधात यावेळी जनतेने लालूप्रसाद यांच्या पक्षाला विजयी करुन त्यांच्या उमेदवाराला संसदेत पाठविले. मोदी सरकारला दिलेली ही एक मोठी चपराकच म्हणावी लागेल. आता सर्वांचे लक्ष कर्नाटकातील निवडणुकीकडे लागले आहे. त्यापेक्षाही येत्या वर्षात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. तेथे जर कँाग्रेसने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले तर तो कॉग्रेससाठी मोठा विजय व भाजपासाठी एक मोठा दणका असेल. या निवडणुकीचा निकाल काहीही लागो परंतु मोदी विरोधी लाटेवर स्वार होण्यासाठी आता विरोधकांची मोट बांधण्याची तयारी आता सुरु जाली आहे. गेल्याच काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींनी बोलाविलेल्या जेवणासासठी 18 विरोधी पक्षांचे नेते आले होते. त्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही उपस्थित होते व त्यानंतर दुसर्‍याच दिवशी राहुल गांधी यांनी पवारांची भेट घेऊन गुफ्तगु केले होते. एकूणच सध्या विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. परंतु याचे नेतृत्व आता कोण करणार हा सवाल अजुनही अनुत्तरीत असला तरीही निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्‍चित केला जाईल असे दिसते. सध्या मोदी विरोधी जनमत आहे ते संघटीत करुन विरोधकांना सत्तेपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. काँग्रेस सध्या कमकुवत आहे, हे मान्य परंतु चंद्राबाबू नायडूंसारखे काही नेते विरोधकांच्या गटात आले तर ताकद वाढू शकते. शरद पवारांना याची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे त्यांनी आता याची जुळवाजुळव सुरु केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या क्षीण झालेली ताकत जर ते विरोधकांच्या गटात आले तर वाढू शकते. मराठी माणसांची शिवसेनेची मते फोडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. कारण शिवसेना कितीही गप्पा केल्या तरी सध्या तरी सत्ता सोडू शकत नाही. कारण सत्ता सोडल्यास शिवसेनेत फूट पडणार याची कात्री आहे. निवडणुका जवळ आल्यावर शिवसेना कदाचित अशा प्रकारचे पाऊल उचलेलही. मात्र शिवसेना ही भाजपाच्या बरोबरीनेच जाणार आहे. अशा वेळी मनसेने जर मोदी विरोधात भूमिका घेतली तर त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळेच याची सुरुवात राज ठाकरे यांनी केली आहे. बहुदा विरोधकांच्या मोदी विरोधी आघाडीत राज ठाकरे सामिलही होतील असे दिसते. याचा लाभ निश्‍चितच विरोधकांना होणार आहे. राज यांनी एकेकाळी मोदींची स्तुती केली होती, परंतु आता ते ठाम विरोधात उभे राहिले आहेत. अर्थातच याची कारणेही त्यांनी सांगितली. मोदींनी जी थापेबाजी केली आहे, त्याची चिरफाड राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावरुन एक बाब स्पष्ट झाली आहे की, मोदींमुक्त भारत होण्यासाठी आता कंबर कसली जात आहे व त्याला यश मिळू शकते. चार वर्षापूर्वी जर कोणाला हे सांंगितले असते तर त्याला मूर्खात काढले असते. परिस्थीती वेळेनुसार बदलते हेच खरे.
----------------------------------------------------------------------

0 Response to "मोदीमुक्त भारत!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel