-->
सोनियांच्या द्वारी

सोनियांच्या द्वारी

सोमवार दि. 12 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
सोनियांच्या द्वारी
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या दारुण झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहूल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्या निर्णयावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. शेवटी शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड हंगामी असली तरी नजिकच्या काळात त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या काँग्रेस पक्षापुढे भविष्याविषयी अंधार दिसत असताना तसेच कार्यकर्त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण झालेले असताना गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कुणाची अध्यक्षपदी नियुक्ती करणे म्हणजे पक्षात फूट पडून परिस्थिती अधिकच गंभीर झाली असती. सोनिया गांधींना हा धोका दिसत असावा त्यामुळेच त्यांनी त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ही जबाबदारी स्वीकारली असावी. सध्याच्या स्थितीत काँग्रेस पक्षाला एकसंघ ठेवणारे नेतृत्व हे गांधी घराण्यातीलच पाहिजे हे वास्तव आहे. राहूल गांधी यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही हे स्पष्ट केले होते. प्रियांका गांधी या ती जागा घेऊ शकल्या असत्या परंतु त्यांनी सावकाश जाण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळे फक्त सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. दोन वर्षापूर्वी सोनिया गांधींनी आपली खुर्ची खाली करुन राहूल गांधींचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा केला. माञ राहूल गांधी हे त्यात शंभर टक्के यशस्वी झाले नाहीत म्हणजे पक्षाला सत्तेच्या शिखरावर नेण्यास असमर्थ ठरले. माञ त्यांनी त्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले हे ही तेवढेच खरे. अतिशय कठीण काळात राहूल यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले. मध्यप्रदेश, राजस्थान व पंजाब या मोठ्या राज्यात काँग्रेसकडे सत्ता आली. कर्नाटकात विरोधकांचे सरकार आणले (नंतर ते पाडले) व गुजरात विधानसभा निवडणकीत भाजपाच्या नाकी नऊ आणले हे राहूल गांधीचे मोठे यश होते. माञ लोकसभा निवडणुकीत त्यांनी जिवाचे रान करुनही यश लाभले नाही. याचे कारण त्यांची लढाई एकखांबी होती. सर्व काँग्रेस कार्यकर्ते व नेते देखील सत्व गमावून बसले होते व सत्ताधार्‍यांविरोधात लढण्याची त्यांची मानसिकताच संपली होती. राहूल गांधींनी आपल्या राजीनामापञात हे वास्तव मांडले होते. भाजपाने त्यांच्या विरोधात सोशल मिडियातून एवढी जबरदस्त मोहीम उघडूनही राहूल आपल्या वैचारिक बैठकीपासून ढळले नव्हते. परंतु लोकसभेतील पराभवानंतर त्यांचेही मनोधैर्य खचले. शेवटी त्यातूनच ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. शेवटी पक्षाला अशाच काळात नेतृत्व दिले पाहिजे याची जाणीव सोनिया गांधीना झाली आणि त्यांनी हे नेतृत्व स्वीकारले आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी या तब्बल सात वर्षे राजकारणात नव्हत्या. त्या आपल्या दोघा मुलांना घेऊन विदेशात जातील अशाही कंड्या त्यावेळी पिकविण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या कोणत्याही आरोपाला त्यांनी उत्तर दिले नाही. विदेशात जन्म होऊनही त्या एखाद्या भारतीय स्ञी प्रमाणे या देशात राहिल्या. इथेच राहून त्यांनी मुलांना मोठे केले आणि त्यांच्या भारतियत्वावर सवाल करणार्‍यांना चोख उत्तर दिले. 98 साली त्यांनी काँग्रेस पक्षाची सुञे हाती घेतली त्यावेळी पक्ष सत्तेवर नव्हता. विस्कळीत झालेला होता. पक्षातील बड्या धेंडांना आवर घालणे या बाईला जमेला का असे सर्वांना वाटत होते. परंतु या सर्व नेत्यांच्या मुसक्या आवळत पक्ष संघटना मजबूत केली. 2004 साली पक्षाला सत्तेच्या दारात नेऊन ठेवले. त्यानंतर पाच वर्षांनी पक्षाला पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली. काँग्रेससोबत समविचारी पक्षांची मोट बांधली व सत्तेचा गाडा हाकण्याची सुञे डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या पारदर्शी, अभ्यासू व अर्थतज्याच्या हाती दिली. पक्षाची सुञे त्यांच्याकडे तब्बल 19 वर्षे होती. यात त्यांनी 2014 चा पराभवही पाहिला. आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला आहे. यातून पुन्हा पक्षाला सावरुन गतवैभव प्राप्त करुन देतील का, हा मोठा सवाल आहे. सध्या प्रतिगामी शक्ती देशात कधी नव्हे एवढ्या आक्रमक झाल्या आहेत. सोशल मिडियाने देशात एक नवे वळण घेतले आहे. सत्तेतील भाजपा आजवर देशाचा असलेला इतिहास फुसून नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. खोटे सतत बोलून ते खरे वाटावे अशा स्थितीला जनतेला आणत आहे. स्वातंञ्यानंतर देशाने जी मूल्ये पाळली त्या तिलांजली देण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला जात आहे. अशा स्थितीत सोनिया गांधींपुढे अनेक आव्हाने आहेत. पक्षाला सत्तेत बसवणे हे आव्हान दुय्यम आहे. त्यापेक्षाही विस्कटलेली संघटना पुन्हा मजबूत करावी लागेल. तसेच गांधी-नेहरुंच्या विचारांची बैठक पक्की करत पक्षाला बळ द्यावे लागेल. 98 साली त्यांनी ज्यावेळी पक्षाची सुञे हाती घेतली होती त्यापेक्षा सध्याची आव्हाने फार मोठी आहेत. त्यावेळी त्यांनी धीरगंभीरपणाने कामे करीत वाटचाल केली पक्षाला वैभव प्राप्त करुन दिले. आता पक्ष त्यांच्याकडून वयाच्या 72 व्या वर्षी हीच अपेक्षा करीत आहे. सोनियांच्या द्वारी पुन्हा एकदा पक्ष गेला आहे. पक्षाला सोनियांचे दिवस खरोखरीच येतील का ते आता सांगणे कठीण आहे. माञ सोनिया गांधी यांना याबाबत विश्‍वास असावा त्यामुळेच त्यांनी सुञे पुन्हा हाती घेतली आहेत. काँग्रेससाठी हा विश्‍वासच आश्‍वासक ठरावा.
--------------------------------------

0 Response to "सोनियांच्या द्वारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel