-->
पूर...महापूर

पूर...महापूर

बुधवार दि. 13 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पूर...महापूर
महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात समाधानकारकर पाऊस पडला नसताना पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर परिसर गेले आठ दिवस पूर नव्हे तर महापुराची परिस्थिती अनुभवतो आहे. या भागात अनेकांच्या पाहाण्यात एवढा पूर कधी आलेला नाही. अनेक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे तर काही भागातील पाणी पाऊस थांबला तरी चार-पाच दिवस काही आटलेले नाही. त्यामुळे तेथील जनता सध्या भीतीच्या छायेत वावरत आहे. त्यात अजूनही जोरदार वृष्टी होण्याच अंदाज वर्तविण्यात आला आहे. या भागात यापूर्वी 1989 आणि 2005 मध्ये महापूर आला होता. पण आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे असे जाणकार सांगतात. सह्याद्री पर्वतरांगांमधून उगम पावणार्‍या सुमारे दोन डझन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत होता. पाणलोट क्षेत्राच्या बाहेरदेखील होणार्‍या पावसाचे पाणी नदीपात्रात येत होते. या नद्यांवर असलेली धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. कृष्णा खोर्‍यातील या नद्यांवर असलेल्या धरणांतून सुमारे दोन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. परिणामी, महापुराचा धोका अधिकच वाढला. एकीकडे कोसळणारा प्रचंड पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे महापुराची तीव्रता खूपच वाढली. सांगली आणि कोल्हापूर शहरांसह ग्रामीण भागातील 400 हून अधिक गावे धोक्याच्या विळख्यात येत होती. पण ज्या गतीने प्रशासनाने राज्य पातळीवरून ज्या हालचाली करायला पाहिजे होत्या, त्या केल्या नाहीत. मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागण्यात गर्क होते. तर या भागातील जनता सहाय्याच्या प्रतिक्षेत होती. दोन दिवसांनंतर जी मदत सुरु झाली त्यावर मुख्यमंत्र्यांचे व पालकमंत्र्याचे फोटो लावलेले पाहून पूरग्रस्त भागातील जनता संतप्त होणे स्वाभाविकच होते. या भागात पाऊस भरपूर पडला हे वास्तव कुणीच नाकारणार नाही. मात्र हे पाणी बाहेर जाण्यास कुठेच वाव नसल्याने त्याचा निचरा न झाल्याने पूरस्थिती गंभीर झाली हे सर्वात मोठे वास्तव आहे. त्यामुळे हा पूर निसर्ग निर्मित नव्हता तर मनुष्यनिर्मित होता. कोल्हापूर व सांगली ही शहरे गेल्या तीस वर्षात झपाट्याने विकसीत झालेली आहेत. हा विकास होताना कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. सांडपाण्याचा तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली गटारे नाहीत. अनेक इमारती अनधिकृतरित्या बांधलेल्या आहेत. शहर विकसीत होताना जे नियोजन केलेले आहे त्याचा पूर्णपणे अभाव येथे दिसतो. या दोन्ही शहरात पूरनियंत्रण रेषेमध्येच अनेक इमारतींची बांधकामे करण्यात आली आहे. या सर्वाचा सूड निसर्गाने उगवला आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचे वाईट परिणाम मानवी आरोग्य, शेती आणि बागायतीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्यावर होऊ लागलेले आहेत. नद्यांच्या जलसंचय क्षेत्रात सातत्याने बेसुमार वृक्षतोड चालू आहे. परिणामी मातीची प्रचंड धूप होत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अल्प होत चालले आहे. त्यात भर म्हणून की काय शेतकरी, बागायतदारांना जलसिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे, पाटबंधारे उभारले जात आहेत.  पावसाळी हंगाम वगळता या नदीनाल्यांची पात्रे कोरडी पडत चालली आहेत. एकेकाळी बारमाही वाहणार्‍या नद्या पूर्णपणे हंगामी स्वरूपाच्या झाल्याने, पिण्याचे पाणी आणि जलसिंचनाची समस्या वाढत चालली आहे. मुसळधार पावसाचे पाणी वाहून नेताना नद्यांची पात्रे दुर्बल, अपुरी पडू लागली. केरकचरा, मलमूत्र आणि सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात आजतागायत अपयश आल्याने बर्‍याच ठिकाणी हे सारे नद्यांच्या पात्रात वळवले जाते. त्यामुळे या नद्या जीवनदायी होण्याऐवजी गटारगंगा होऊन वाहत आहेत. मंदिरांच्या, घाटांच्या शेजारी राहती घरे, हॉटेल्स, दुकाने, मोठ्या प्रमाणात उभी राहिली आणि त्यामुळे लोकांना नदीच्या पर्यावरणीय दृष्टीने संवेदनक्षम असणार्‍या पूरप्रवण क्षेत्रांचे विस्मरण झाले. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नियोजनबद्ध वृक्षारोपण, वृक्षसंगोपन करणे, गवताची कुरणे, रानफुलांचे वैभव मिरवणारी पठारे, माळराने गुराढोरांच्या चरण्यापासून मुक्त ठेवणे, पावसाचे कोसळणारे पाणी जमिनीत योग्य रीतीने मुरण्यासाठी प्रयत्नरत असणे, वाहते पाणी नैसर्गिकरीत्या अडवणे आणि भूजलाची पातळी वाढवणे अशा उपक्रमांकडे आपले सातत्याने दुर्लक्ष झाले. नद्यांचे दोन्ही काठ सुरक्षित राहतील, यासाठी लोकसहभागाबरोबर कायदेशीर व्यवस्था करणे आता अगत्याचे झाले आहे. परंतु या सर्व प्रयत्नांकडे गेल्या तीन दशकात पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यानेत हे महापूर अनुभवावे लागत आहेत. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोर्‍यातील निर्माण झालेला पर्यावरणीय असमतोलाचा हा परिपाक आहे. त्यामुळे यापुढे या भागातील नद्यांवर आवश्यक असणारे पूल बांधताना नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारला व अधिकार्‍यांना हे माहित नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु ही सर्व कामे भ्रष्टाचार करुनच झाली आहेत. त्यामुळे जनतेने आता याबाबत सावध झाले पाहिज. अशी कामे केली जाताना त्याला जनतेतून उठाव झाला पाहिजे. तरच भविष्यात आपली शहरे वाचतील. अन्यथा हे पूर...महापूर येतच राहातील.
-----------------------------------------------------

0 Response to "पूर...महापूर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel