-->
अवयवदानाचे महत्व

अवयवदानाचे महत्व

संपादकीय पान सोमवार दि. २७ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अवयवदानाचे महत्व
अवयवदानाबाबत गेल्या काही वर्षात जनजागृती वाढत चालली आहे. केवळ अवयव उपलब्ध होऊन भागत नाही तर तर ते स्वीकारणार्‍या रोग्याला ते वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करुन झपाट्याने हे अवयव एका शहरातून दुसर्‍या शहरात हलवावे लागतात. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागते. त्यात आता आपल्याकडील प्रमुख शहरातील पोलिस यंत्रणा आता झपाट्याने कामाला लागल्याचे एक सकारात्मक चित्र दिसते. मेंदू मृत व्यक्तींच्या अवयवदानांची संख्या पुण्यात वाढत चालली आहे. गेल्या दहा महिन्यांत चार हृदय प्रत्यारोपणे व सहा यकृत प्रत्यारोपणांसाठी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पुण्यात ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला. यातील, चार हृदयं पुण्यातून बाहेर प्रत्यारोपणासाठी नेण्यात आली, तर बाहेरुन पुण्यात आलेल्या यकृतांची संख्या पाच होती. पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरअंतर्गत २००४ सालापासून आतापर्यंत ८० मेंदू मृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले असून त्यातून १३१ मूत्रपिंड प्रत्यारोपणे, ४९ यकृत प्रत्यारोपणे व चार हृदय प्रत्यारोपणे झाली आहेत. या वर्षी आतापर्यंत २३ मेंदू मृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले असून त्यातून २७ मूत्रपिंड प्रत्यारोपणे व २१ यकृत प्रत्यारोपणे झाली. २०१४ मध्ये आठ मेंदू मृत रुग्णांचे अवयवदान झाले होते, तर गतवर्षी ही संख्या १६ झाली होती. मेंदू मृत अवयवदात्यांची संख्या वाढली असून समाजात याबाबत जागृती वाढल्याचा हा परिणाम आहे. गेल्या दहा महिन्यात दहा वेळा हृदय व यकृतांसाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले होते. यात पुण्यातून तीन वेळा मुंबईतील रुग्णासाठी हृदय नेण्यात आले, तर एकदा दिल्लीतील एम्समधील रुग्णासाठी हृदय पाठवले गेले. याच कालावधीत औरंगाबादहून चार यकृतं पुण्याला आणण्यात आली, नाशिकहूनही एक यकृत मिळाले, तर एक यकृत पुण्यातील एएफएमसीमधून दिल्लीला नेण्यात आले. औरंगाबादहून यकृत साडेतीन तासांत पुण्यात औरंगाबादहून मंगळवारी सकाळीही साडेतीन तासांत एक यकृत पुण्यात आणण्यात आले. औरंगाबाद ते नगर व नगर ते पुणे अशा यकृताच्या प्रवासासाठी स्थानिक पातळीवर वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यत आला होता. ३३ वर्षांच्या अपघातग्रस्त रुग्णाला मेंदू मृत घोषित केल्यानंतर या रुग्णाचे अवयवदान करण्यात आले. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल असलेल्या ५५ वर्षांच्या रुग्णावर या यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षात अनेकांचे अवयव प्रत्यारोपण यशस्वी होऊ लागले आहे. पूर्वी हे केवळ विदेशातच शक्य होते. आपल्याकडे याविषयीचे तंत्रज्ञान उपलब्ध होते, परंतु ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध नव्हते. आता ते देखील उपलब्ध झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास सुरुवात झाली आहे. अवयवदानाच्या या वाढत्या महत्वाबद्दल आपण स्वागतच केले पाहिजे.
-------------------------------------------------------------

0 Response to "अवयवदानाचे महत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel