-->
संन्यासाश्राम अखेर संपला

संन्यासाश्राम अखेर संपला

संपादकीय पान सोमवार दि. २७ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
संन्यासाश्राम अखेर संपला
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते असलेल्या कामत यांनी दोन आठवड्यांपूर्वी वैयक्तिक कारण देत कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला पण कामत त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली व अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला.  गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या प्रभारीपदी कामत कायम राहणार आहेत. मुंबईतून पाच वेळा खासदार राहिलेल्या गुरुदास कामत यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. तशा आशयाचे पत्र त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविले होते. त्या पत्राला काहीही उत्तर न आल्याने ६ जून रोजी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी हा निर्णय जाहीर करताच कॉँग्रेसमध्ये एकच हलचल माजली होती. मुंबई कॉंग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही गेल्या वर्षात जगजाहीर झाले होते. निरुपम यांनी कामत यांच्या समर्थकांना कमी महत्व देत त्यांच्याकडील पदे काढून घेण्यास सुरुवात केली होती. त्यावरुन या दोन्ही गटात मध्यंतरी हाणामारी होईपर्यंत टोकाला गेले होते. त्यातच मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते. राहूल गांधी यांना पक्षात तरुण पिढीला पुढे आणावयाचे आहे व त्यात कामत हे बसणार नाहीत. त्यामुळे भविष्यात त्यांचे पक्षातील स्थान डळमळीत होणार हे नक्की होते. त्यामुळे कामत यांनी राजीनामा अस्त्र काढले होते. अर्थात कामतांसाठी हे अस्त्र काढण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. कामत यांनी एकेकाळी मुंबई एनएसयूआय, मुंबई विभागीय युवक कॉंग्रेस, अ. भा. युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा असाच अचानक राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. यूपीएच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात खाते बदलल्याने नाराज होऊन ते शपथविधी समारंभालाच गेले नव्हते. आता देखील त्यंानी पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानत आपली सन्यासअस्त्रे मागे घेतली आहेत. निरुपम गटाला हा धक्का मानला गेला असला तरीही आगामी महानगरपालिकेसाठी कामत यांच्या आधाराशिवाय पक्ष पुढे जाऊ शकतच नाही हे देखील वास्तव आहे. सध्या मृतावस्थेत जात असलेल्या कॉँग्रेससाठी कामतांनी राजीनामा मागे घेतल्याची बातमी येणे ही चांगली घटना म्हटली पाहिजे. कामतांनी आपले राजीनामा अस्त्र काढून आपली अस्तित्वाची लढाई जिंकली आहे असे म्हणता येईल.

0 Response to "संन्यासाश्राम अखेर संपला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel