-->
शोध जगातील मराठी मनाचा...

शोध जगातील मराठी मनाचा...

रविवार दि. 12 डिसेंबर 2020 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
शोध जगातील मराठी मनाचा...
----------------------------------------
जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या अलिबागमधील शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती हे खरे. जगभरात आपली पताका पोहोचविणारे मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट, नाट्य कलावंत, दिग्दर्शक यांच्या झालेल्या मुलाखती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, कवींची व्यक्त झालेली भावना हे सर्व पाहता मराठी विषयी सध्या असलेले अनेक नकारात्मक संदेश पार धुवून गेले. आपल्याकडे नेहमीच माराठी माणसे उद्योगात मागे पडतात असे सांगितले जाते, परंतु जगात आपली उद्योजकतेची पताका फडकाविणारे उद्योजक पाहता मराठी ही काही संपणार नाही तर अदिकच जोमाने फोफावणार आहे, असा संदेश या परिषदेतून सर्वांना मिळाला. मातृभाषा टिकवायची असेल तर मराठी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच मातृभाषेतून शिक्षण देणे अनिवार्य आहे. जागतिक पातळीवर पाहता जपान, जर्मनी, चीन या देशात मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. अर्तात हे शिक्षण प्रथमपासूनच ते उच्च शिक्षणापर्यंत हे शिक्षण त्या भाषेत दिले जाते, इंग्रजीत नव्हे. इंग्रजी ही जगाची भाषा असली तरीही मातृभाषेत शिक्षण घेणारी मुले पुडे इंग्रजीतून व्यावहार करताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत, असा सूर यावेळी विविध वक्त्यांनी लावला. आपल्या या विधानाला पोष क उदाहरणे त्यांनी दाखवून दिली. देशाची भावी पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांना माणूस बनवा, रोबो नको, असे ठाम प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील खराशी गावातील प्रयोगशील शिक्षक मुबारक सय्यद यांनी केले. सय्यद यांचे भाषण हे अतिशय प्रभावी व अनुभवातून बेतलेले होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक प्रयोगशील शिक्षक म्हणून काम करताना आलेले चांगले, वाईट अनुभव त्यांनी उपस्थिताना सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरु केलेल्या या प्रयोगशील उपक्रमाचे उपस्थितांकडूनही स्वागत आणि कौतुक करण्यात आले. मी ज्या भागात शिकवितो तो भाग नक्षलप्रवण, पण तेथेही मी जिद्दीच्या जोरावर काहीतरी बदल करुन दाखविले. त्यासाठी अनेकांकडून विरोधही झाला.अनेकदा विरोध करणारे माझे सहकारीच होते हे पाहून अचंबितही झालो. पण त्याच तक्रारखोरांमुळे मी नेहमी यशस्वी होत राहिलो हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. आपल्याकडे मातृभाषेची मोठी देणगी आहे, मते, विचार मांडता येतात त्यामुळे आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज मी ज्या शाळेत शिकवितो त्या शाळेतील मुलांना मुक्तपणे वावरण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ते खूप आनंदित आहेत, त्यांचे चेहरेही खुलले असल्याचा दावाही त्यांनी केला. इंग्रजी भाषेला माझा मुळीच विरोध नाही, पण ती येण्यापूर्वी आधी मातृभाषा म्हणजे मराठी बळकट करा, असा सल्लाही त्यांनी दिला.आपला विद्यार्थी हा लिहिणारा असला पाहिजे, तो माणूस म्हणून यशस्वी झाला पाहिजे, त्याला केवळ रोबो बनवून चालणार नाही, असेही सय्यद म्हणाले. यावेळी त्यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुबारक सय्यद यांनी आपण शाळेतील 148 पोरांचा बाप असल्याचे आवर्जून नमुद केले. या शाळेत अनेक प्रयोग केल्याने गावकर्‍यांचा एवढा विश्‍वास बसलाय की एखाद्याला आपल्या मुलीचे लग्न जरी करायचे असेल तर तो नवरा मुलगा जर सय्यद गुरुजींना पसंत पडत असला तरच मुलीचे बाप तिचे लग्न लावून देण्यास तयार होतात असा किस्साही त्यांनी सांगितला. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्कूल बँक हे सुद्धा आपल्या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. आज त्या बँकेत विद्यार्थ्यांचे 5 लाख 64 हजार रुपये जमा आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, कपडे खरेदीसाठी मदत होते असे ते म्हणाले. हे उपक्रम पाहून गावातील ग्रामस्थांनी देवळातील दानपेटीच शाळेत आणून ठेवली आहे. शिवाय मुलांना मुक्त शिक्षण मिळावे म्हणून आम्ही शाळेतील घंटा देखील काढून टाकल्याचे सय्यद म्हणाले. सय्यद यांचे हे अनुभव म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्था बदलण्याचा मूलमंत्र काय आहे हे त्यांनी दाखवून दिले. असे गावोगावी सय्यद सर तयार झाले तरच देश प्रगती करेल यात शंका नाही. योग्य संधी ओळखायला हवी, त्या संधीचा आपल्या विकासासाठी उपयोग करुन घ्यायला हवा आणि संघर्षाची तयारी ठेवावी, तरच परदेशात यश मिळविणे शक्य आहे, असा संदेश सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवणार्‍या उद्योजकांनी मराठी मनाचा शोध घेणार्‍या युवकांना दिला. यात नीलिमा बेर्डे (ऑस्ट्रोलिया), विद्या जोशी (शिकागो), दीपक घाणेकर (बहारिन), रवी जठार (जर्मनी) आणि रिचर्ड न्यून (ऑट्रेलिया) हे प्रतिभावान सहभागी झाले होते. भारत विरुध्द इंडिया परिसंवादात बोलताना गिरीश गांधी व राजू शेट्टी यांनी आपली परखड मते मांडली. गेल्या सात दशकात प्रगती झालीच नाही असे म्हणता येणार नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी हा मात्र विकासगंगेपासून दूर राहिला हे वास्तव आहे. कृषी क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करावयास हवा. काही ठिकाणी कायद्यातही बदल करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना भेडसाविणार्‍या विविध प्रश्‍नांसाठी केंद्र सरकारचा जबाबदार आहे, असे ठाम प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले तर गिरीश गांधी यांनी शेतीतूनच मोठी रोजगार निर्मीती होऊ शकते, आज आपल्यापुढे अनेक प्रश्‍न उभे आहेत. सहकारातील दुष्ट प्रवृत्तींमुळे सहकार अयशस्वी ठरला हे वास्तव आहे. मात्र त्याचबरोबर अमूल सारखी संस्थाही यशस्वी होते, हे देखील विसरता येणार नाही, असा सूर गांधी यांनी लावला. एकूणच परिषदेत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. मात्र अलिबागकरांनी येथे लावलेली किरकोळ उपस्थिती ही खटकणारी बाब होती. मात्र या परिषदेसाठी जगभरातून आलेल्या मराठी बांधवांनी आपल्या मातीशी नाते जोडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांनी इकडच्या लोकाना आपल्या अनुभवाची शिदोरी खुली करुन दिली व त्यातून बोध घेऊन पुढील आयुष्य कसे जगावे व आपला विकास करुन घ्यावा हा मोलाचा संदेश दिला. जी मराठी माणसे तरुणपणात विदेसात जातात, दोन-तीन दशकानंतर तेथे स्थिरावतात, तरी देखील त्यांना मायदेश काही सोडवत नाही. आपल्या मायदेशातील जनतेने आपल्याकडून काही शिकावे असे वाटते. डॉ. नेरुरकर यांनी सिध्ाुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय सेवेचे मोठे काम सुरु केले आहे. आज मातृभूमीची ओढ त्यांना परत घेऊन येतेय. अशा या दिग्गजांकडून आपण शिकून घेऊन आपण आपली जनता समृद्द करु शकतो. विदेशात स्थायिक झालेल्या भारतियांकडून जसे आपल्याला विदेशी चलन पाहिजे आहे तसेच त्यांच्या ज्ञानाचा खजिनाही पाहिजे आहे. त्यांच्या अनुभवाच्या आधारावर आपण आपल्या नव्या पिढीचे सेतू बांधू शकतो. अलिबागमधील या परिषदेने याकामी एक पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणण्यास जागा आहे.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "शोध जगातील मराठी मनाचा..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel