-->
वाटचाल आठ दशकांची...

वाटचाल आठ दशकांची...

रविवार दि. 09 जून 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
वाटचाल आठ दशकांची...
-------------------------------------
शेतकर्‍याच्या लढ्याचे अस्त्र म्हणून जन्म झालेल्या कृषीवलने आता तब्बल आठ दशकांची वाटचाल केली आहे. शेतकर्‍यांचे नेते स्व. नारायण नागू पाटील यांनी 1937 साली कृषीवलचा पहिला अंक प्रसिध्द केला. त्यावेळी कृषीवल साप्ताहिक होते. त्याकाळी पेझारीसारख्या ग्रामीण भागात साप्ताहिक सुरु करणे हे फार मोठे धाडसच होते. प्रत्येकाकडून 100 रुपये जमवून त्यांनी 2800 रुपयांना छपाईचे यंत्र मुंबईहून खरेदी केले आणि पेझारीत हे यंत्र धडधडू लागले. लोकमान्यांनी पुण्यातून केसरी काढला. त्यासाठी त्यांना अनंत अडचणी आल्या हे जरी खरे असले तरी पुण्यासारख्या त्याकाळच्या सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध असलेल्या शहरातून केसरी प्रकाशित होत असे. मात्र नारायण नागू पाटील यांनी त्याच्याही दोन पावले पुढे जाऊन कृषीवल पेझारीसारख्या ग्रामीण भागातून सुरु केला. त्याकाळी छापखाना म्हणजे केवढे कौतुक होते. त्यानंतर तब्बल तीस वर्षानंतर चिपळूणहून स्व. नाना जोशींनी सागर सुरु केला. कोकणातील या दोन्ही दैनिकांना एक दैदिप्यमान परंपरा आहे. कृषीवल सुरु झाला आणि याच दरम्यान खोतीविरुध्दचा लढा सुरु झाला आणि कृषीवलची गरज प्रत्येक कार्यकर्त्याला पटू लागली. आज 80 वर्षांनी छपाई तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात विकसीत झाले आहे. मात्र त्याकाळी छपाईचे तंत्रज्ञानही मागासलेले होते व त्याचबरोबर वृतपत्र पोहोचविण्यासाठीही त्रोटक यंत्रणा. असे असले तरीही गावागावात कृषीवल एस.टी.ने जाई व तेथे आलेल्या एका प्रतीचे जाहीर वाचन होई. त्याकाळी साक्षरताही कमी होती व प्रत्येकाची वृत्तपत्र खरेदी करण्याची आर्थिक ताकदही नव्हती. त्याकाळी रायगडात लोकमान्य टिळकांचा केसरी व आप्पासाहेबांचा कृषीवलच जवळजवळ प्रत्येक गावात पोहोचे. दर सोमवारी कृषीवलचा अंक वाचण्यासाठी गावात गर्दी होई. खोतीचा लढा यशस्वी होण्यामागे कृषीवलचा मोलाचा हातभार होता. यातूनच कृषीवलने आपली रायगडातील पावले घट्ट रोवली ती आजवर. कृषीवलच्या नंतर अनेक दैनिके सुरु झाली परंतु टिकली नाहीत. स्व. नारायण नागू पाटील यांच्या निधनानंतर कृषीवलची सुत्रे रायगडचे भाग्यविधाते प्रभाकर पाटील यांच्याकडे आली. स्व. प्रभाकर पाटील यांच्या वाणीला जशी धार होती तशी लेखणीलाही होती. स्व. भाऊंनी कृषीवलवर पोटच्या पोरासारखे प्रेम केले. अनेक संकटे आली तरी त्यांनी त्याचा मुकाबला केला व कृषीवलची वाढ होत राहिली. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य कृषीवलचे होते व त्याला अनुसरुनच भाऊंची लेखणी आग ओकायची. कष्टकर्‍यांच्या, श्रमिकांच्या बाजूने त्यांनी नेहमीच लिखाण केले व या पिडीत वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्व. भाऊंच्या निधनानंतर कृषीवलची सुत्रे आमदार जयंत पाटील यांच्या हाती आली. त्यांनी कृषीवलचा अंतबाह्य कायापालट करण्यास सुरुवात केली. जे जगातील उत्कृष्ट तंत्रज्ञान असेल ते आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे याचा ध्यास त्यांनी घेतला. मुंबईहून नामवंत संपादकांना आमंत्रित करुन त्यांच्या हातात सुत्रे दिली व कृषीवलचा दर्ज्या उंचाविण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात कृषीवलचे स्वरुप पालटत गेले. कृषीवलचे कार्यालही पेझारीहून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागला आणले. नव कृषीवल, कोकण कृषीवल, दैनिक कृषीवल व कृषीवल असे नावातही बदल झाले. अगोदर हाफ डेमी आकारातील साप्ताहिक, त्यानंतर पूर्ण आकारातील साप्ताहिक, नंतर चार पानी दैनिक, सहा पानी, आठ पानी व आता बारा पानी दैनिक असे स्वरुप पालटत गेले. कृषीवलला संपादकांची जाज्वल्य परंपरा लाभली, मात्र कष्टकर्‍यांचे, शेतकर्‍यांचे हित जपण्याची भूमिका काही बदलली नाही. प्रवाहाच्या विरोधात सतत लढा देण्याची परंपरा कृषीवलने जोपासली आहे. पाटील कुटुंबियांची चौथी पिढी आता याचे व्यवस्थापन पाहत असली तरीही हे धोरण काही बदललेले नाही, हे कृषीवलचे वैशिष्ट्य ठरावे. स्वंतत्र्यपूर्व काळातील ब्रिटीशांच्या विरोधातला लढा, स्वातंत्र्यानंतरची कॉँग्रेसची राजवट, विरोधकांची वेळोवेळी आलेली सरकारे, आता आलेले उजव्या विचारसारणीचे भाजपाचे सरकार, त्याचबरोबर 1991 सालापासून सुरु झालेले आर्थिक उदारीकरण असे अनेक टप्पे कृषीवलने पाहिले. हे बदल पाहत असताना कृषीवलने छपाई क्षेत्रातले बदलही अनुभवले. खिळे जुळविण्याच्या प्रक्रियेपासून ते आता संगणकावर अत्याधुनिक पान लावण्याची प्रक्रिया गेल्या 81 वर्षात कृषीवलने पाहिल्या. कृषीवलने नवीन तंत्रज्ञान आणण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. मोबाईलने तर आता क्रांतीच केली आहे. संगणाकावरुन थेट बातम्या पाठविण्यापासून ते व्हॉट्स अ‍ॅपवर फोटो किंवा बातम्या पाठविण्याचे युग सुरु झाले. व्हॉट्स अ‍ॅॅपवर बातम्या पाठविण्याचा उपक्रम कृषीवलने जिल्ह्यात सर्वात प्रथम सुरु केला आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला. केवळ कृषीवलचे वार्ताहरचे नव्हे तर वाचकांनीही त्यांच्या विभागातल्या बातम्या याव्दारे पाठविण्यास सुरुवात केली. पाच वर्षांपूर्वी कृषीवलने आपली स्वतंत्र वेबसाईट सुरु केली. जगात ही वेबसाईट 56 देशांतील वाचक दररोज पाहातात. आता सुधारित वेबसाईट कालपासून सुरु झाली आहे. प्रत्येक तासाला आता ही वेबसाईट अपडेट केली जाईल. अशा प्रकारे केवळ राज्यातीलच नव्हे तर जगातील रायगडच्या बातम्या पाहाणार्‍यांना विश्‍वासार्ह बातम्या वेगात उपलब्ध होतील. अमेरिका व युरोपातील विकसीत देशात ज्या प्रमाणे वाचक वृत्तपत्रे ही मोबाईलवर किंवा संगणकावर वाचतात. तो काळ आपल्याकडे यायला अजून बराच काळ जाणार असला तरीही कृषीवलने त्यासाठी आत्तापासून पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे. कृषीवल हे केवळ वृत्तपत्र नाही तर ती एक चळवळ आहे. व ही चळवळ संपूर्ण कोकणात आता पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. रत्नागिरी आवृत्ती नंतर आता संपूर्ण कोकणात आणखी विस्तार करण्याच्या योजना हाती आहेत. आपल्या तत्वज्ञानाशी कोणतीही तडजोड न करता कृषीवलने आजवर वाटचाल सुरु ठेवली आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत बदलत्या काळाशी मुकाबला केला आहे. कृषीवलची ही वाटचाल अशी जोमाने सुरु राहील यात काही शंका नाही. कृषीवलने आपला स्वतंत्र बाणा कायम राखला आहे. सध्याच्या काळात वृत्तपत्र चालविणे ही काही सोपी बाब नाही. प्रामुख्याने नोटाबंदीनंतर अनेक वृत्तपत्रांना वाईट दिवसांना सामोरे जावे लागले. कृषीवलही त्यात अपवाद नव्हता. परंतु त्यातूनही आता हळूहळू बाहेर पडून नवीन उभारी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील कामगार, कष्टकर्‍यांचे हक्काचे व्यासपीठ ही कृषीवलची ओळख आज 82 वर्षानंतरही कायम आहे, व तोच त्याचा आत्मा आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "वाटचाल आठ दशकांची..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel