-->
नराधमांना अखेर शासन

नराधमांना अखेर शासन

बुधवार दि. 12 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
नराधमांना अखेर शासन
जवळपास दोन वर्षापूर्वी जम्मू-काश्मिरमधील कथुआ येथील सामूहिक बलात्कार व त्यानंतर हत्या करण्याचे प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारेच होते. हे प्रकरण आजही आठवले तरी सरकन आंगावर काटा उभा राहतो. सर्वात दुर्देवाची बाब म्हणजे, या सर्व प्रकरणात पोलीसही सामिल होते. तसेच या घटनेचे निर्लजपणे भाजपाचे तत्कालीन मंत्र्यांनी या घटनेचे मोर्चा काढून समर्थन केले होते. या दोन मंत्र्यांना यातून राजीनामा द्यावा लागला होता. हे खरे असले तरी सत्तधार्‍यांमध्ये कोणत्या प्रवृत्ती आहेत याचे दर्शन यानिमित्ताने झाले होते. या सर्वच प्रकरणानंतर हे प्रकरण देशात गाजले होते. खरे तर हा बलात्कार व त्यानंतर करण्यात आलेली हत्या हे सर्व दाबून टाकण्याचा कट होता. परंतु शेवटी हे सर्व उघड झाले होते. आता या नराधमांना अखेर शासन झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार व त्यानंतर हत्या प्रकरणात पठाणकोटच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. न्यायालयाने या कृत्याचा म्होरक्या सांझीरामसह तीन दोषींना जन्मठेप व एक-एक लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली. तीन पोलिस कर्मचार्‍यांना पाच-पाच वर्षांची शिक्षा व 50-50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने एकूण सात आरोपींपैकी सहांना दोषी ठरवले. घटनेच्या 17 महिन्यांनंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे जनतेच्या दबावामुळे अखेर हे प्रकरण फास्ट ट्रँक न्यायलयात दाखल करुन लवकर निकाल लावण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 7 मे 2018 रोजी कथुआहून पंजाबच्या पठाणकोटमध्ये हस्तांतरित केले होते. हे प्रकरण संवेदनाक्षम असल्याने या खटल्याची बंद खोलीत सुनावणी करण्यात येत होती. ही सर्व सुनावणी तीन जून रोजी पूर्ण झाली. आरोपपत्रानुसार, कथुआ जिल्ह्यातील रसाना गावातील आठ वर्षांच्या मुलीचे 10 जानेवारी 2018 रोजी अपहरण केले व मंदिरात ठेवले. तिला बेशुद्ध केले व तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. तिला जिवे मारण्याआधी चार दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. हत्येनंतर मृतदेह जंगलात फेकून देऊन हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जाहीर झालेली ही शिक्षा भारतीय दंड संहितेअंतर्गत नसून जम्मू-काश्मीरमध्ये रणबीर दंड संहितेअंतर्गत आहे. यामध्ये 12 वर्षांपेक्षा लहान मुलींवरील बलात्काराच्या दोषीस फाशीची तरतूद 24 एप्रिल 2018 रोजी कथुआ घटनेनंतर जोडली आहे. ही घटना 10 जानेवारीची आहे. सुनावणी नव्या तरतुदीनुसार होऊ शकत नव्हती त्यामुळे नराधमांची फाशीची शिक्षा टळली. यात तीन नराधम, ज्यांना जन्मठेप सुनावली त्यांच्यावरील अपहरण, अत्याचार व हत्या करण्याचे आरोप सिध्द झाले आहेत. सांझीराम हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो  मंदिराचा पुजारी होता. त्यानेच मंदिरात मुलीला तीन दिवस ओलीस ठेवले होते. निवृत्त महसूल कर्मचारी, सरपंच व मंदिराचा संरक्षक असलेल्याच्या सांगण्यावरुन या दुर्दैवी मुलीचे अपहरणकरण्यात आले होते. या नराधमांनी तीन दिवस मंदिरात सामूहिक बलात्कार केला व अखेर हत्या केली. दीपक खजुरिया या पोलिस अधिकार्‍याने हत्येआधी मुलीवर बलात्कार केला होता. मुलीचा खून करण्याआधी या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जंगलात नेऊन चेहरा दगडाने ठेचला. प्रवेशकुमार या सांझीरामच्या जवळच्या माणसाने गाडीतून मृतदेह जंगलात नेला होता. अपहरणकर्त्यांमध्ये याचा समावेश होता. चिमुरडीच्या हत्येनंतर प्रवेशकुमारच्या गाडीत मृतदेह जाळण्यात आला. यानेही या चिमुरडीवर बलात्कार केला होता. मुलीला ओलीस ठेवले. हत्येतही त्याचा सहभाग होता हे सिद्द झाले आहे. ज्यांनी आरोपींना मदत केली त्या तीन पोलिसांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. आनंद दत्ता या सब इन्स्पेक्टरने चार लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तीन हप्त्यांत चार लाख रुपये घेतले. मुलीचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यापूर्वी धुऊन स्वच्छ केले. खोटे साक्षीदार बनवले. याला पाच वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंड झाला आहे. या प्रकरणी जनतेचे संरक्षण करणारे पोलिसच भक्षक झाले होते. यातील आणखी एक गुन्हेगार तिलक राज या हेड कॉन्स्टेबलने हे प्रकरण मिटविण्यासाठी लाच घेतली होती व मुलीला मादक द्रव्य दिले होते. पैसे घेऊन हत्या करण्यात आलेल्या मुलीचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यापूर्वी स्वत: धुतले. इतर पुरावे नष्ट केले. यानेही मुलीला मादक द्रव्य देऊन जखमी केल्याचे कोर्टाने ग्राह्य धरले. सुरेंद्र वर्मा या विशेष पोलिस अधिकार्‍याने पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती. नराधम सांझीरामला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलिसांना साथ दिली. अमली पदार्थही उपलब्ध केले. तपास अधिकार्‍याची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. एकूणच या प्रकरणातील नराधमांना अखेर फाशी नसली तरी जन्मठेप भोगण्यासाठी न्यायालयाने जेलमध्ये पाठविले आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "नराधमांना अखेर शासन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel